| | |

‘इसबगोल’ खाणार त्याला वाढत्या वजनाची चिंता ती काय?; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपण घरातील मोठ्या व्यक्तींकडून इसबगोल हा शब्द ऐकला असेल. कदाचित हा पदार्थ पाहीलाही असेल. पण दैनंदिन जीवनात याचा वापर फार क्वचितच केला जात असल्यामुळे तो निदर्शनास येत नाही. आता शीर्षक वाचून अनेकांना प्रश्न पडला असेल कि, इसबगोल नक्की आहे तरी काय? आणि शीर्षक सांगताय त्या प्रमाणे वाढत्या वजनावर ते खरंच लाभदायी आहे का? तर या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणार. पण त्यासाठी हा लेख तुम्हाला पूर्ण वाचावा लागेल. चला तर जाणून घेऊया इसबगोल म्हणजे काय आणि वजन कमी करण्याच्या त्याच्या सहाय्यक गुणधर्मांविषयी खालीलप्रमाणे:-

० ‘इसबगोल’ म्हणजे काय?
– ‘इसबगोल’ याला ‘सायलियम हस्क’ या नावानेही ओळखले जाते. तर मित्रांनो याची ओळख अशी कि, हा एक विरघळणारा फायबर आहे. जो प्लांटॅगो ओव्हाटा वनस्पतींच्या लहान मोठ्या बियांच्या भुश्यापासून प्राप्त होतो. हे सामान्यतः वापरले जाणारे रेचक आहे आणि बद्धकोष्ठता बरे करण्यास मदत करते. पण त्या व्यतिरिक्त, हा पदार्थ स्वादुपिंड, हृदय आणि आतड्यांसाठी देखील फायदेशीर लाभ देतो. भुसा मुख्यतः भूसी ग्रॅन्युल, पावडर किंवा कॅप्सूलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. हा पदार्थ अत्यंत शोषक असतो. तो पाणी शोषून जाड तसेच चिकट कंपाऊंडमध्ये बदलतो. इसबगोल पचनास मदत करते. त्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी, उच्च कोलेस्टेरॉल आणि ट्राय-ग्लिसराइड्स नियंत्रित करण्यात मदत होते. याशिवाय त्याचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे इसबगोल वजन कमी करण्यासाठी सहाय्यक आहे. कसे ते जाणून घ्या.

० ‘इसबगोल’च्या सहाय्याने वजन कमी करणारे घटक खालीलप्रमाणे:-

१) कोलन स्वच्छ करते – मित्रांनो स्वच्छ कोलन म्हणजे उत्तम जठरांत्रीय आरोग्य आणि यासाठी इसबगोल सहाय्यक आहे. ते सहनशक्ती वाढवते आणि शरीराला रोगांशी लढण्यास मदत करते. इसबगोल तग धरण्याची क्षमता शरीरास प्रदान करते. शिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि वजन कमी करण्यात मोठ्या प्रमाणात मदत करते.

२) फायबर – इसबगोल अघुलनशील आणि विरघळणारे फायबर असा दोन्ही दृष्ट्या समृद्ध आहे. ज्यामुळे हा पदार्थ आरोग्यदायी पर्याय होतो. इसबगोलमधील फायबर आतड्यांसंबंधीत हालचाल सुरळीत करण्यास सक्षम असून ते अतिरिक्त पाणी शोषून पोटात एक थर बसवून अधिक काळ पोटात भर ठेवते. यामुळे बाकी काही खाण्याची इच्छा होत नाही.

३) कॅलरीज – इसबगोलमध्ये कमी कॅलरीज असल्याने आपल्याला वजन कमी करण्यासाठी निश्चितच हा एक उत्तम पर्याय आहे.

४) फाईट बॉडी बल्ज – इसबगोल हे पाचन तंत्र सुधारते शिवाय प्रतिकारशक्ती मजबूत करते आणि कोलन स्वच्छ करण्यास मदत करते. ज्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी वाढण्यास प्रतिकार निर्माण होतो. परिणामी चरबी जाळण्यात आणि वजन कमी करण्यास मदत होते.

५) भूक कमी करते – पाण्यासोबत इसबगोल मिसळल्यास त्याचा आकार दहापट वाढतो आणि यामुळे त्याचे सेवन केल्याने जास्त काळ पोट भरल्याचा अनुभव येतो. परिणामी सतत भूक लागत नाही.

० महत्वाचे –
– प्रौढ व्यक्तीच्या आरोग्य स्थितीनुसार दिवसातून १-२ वेळा इसबगोल घेऊ शकता.
– इसबगोलची पावडर गिळण्यापूर्वी १ ग्लास पाण्यात वा फळांच्या रसात मिसळा आणि मग प्या.
– जेवणानंतर लगेच इसबगोल घेणे उत्तम.
– कोणत्याही दीर्घकालीन आरोग्य स्थितीने ग्रस्त असाल वा गर्भवती असाल तर इसबगोल घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.