| | |

नाश्त्यात खा डोश्याचे पौष्टिक प्रकार आणि दूर ठेवा सर्व विकार; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। नाश्त्यामध्ये आंबवणाचे प्रकार खाणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगले मानले जाते. यामध्ये इडली आणि डोसा हे दोन प्रकार अतिशय प्रसिद्ध आणि चवीने खाल्ले जाणारे आहेत. त्यातल्या त्यात डोसा म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. अनेकदा साधा डोसा खाऊन कंटाळा येतो मग अश्यावेळी काय करायचे? असा साधा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. तर आजचा हा लेख आपल्या गृहिणींसाठी. कारण घरातली गृहिणी प्रत्येकाचं पोट भरेल आणि अन्नातून प्रत्येकाला योग्य पोषण मिळेल याची काळजी घेत असते. म्हणूनच आज आम्ही सांगणार आहोत रोजचा डोसा कंटाळवाणा झाला तर डोश्यातले पौष्टिकपण टिकवून आणि वाढवून डोसा कसा बनवता येईल. चला तर जाणून घेऊयात डोश्याचे अन्य पौष्टिक आणि चविष्ट प्रकार जे आपल्या शरीराला उत्तम पोषण देण्यास सहाय्यक ठरतील.

१) मिश्र धान्यांचा डोसा

० साहित्य – तांदूळ ३ वाटी, उडीद डाळ १ वाटी, गहू १ वाटी, ज्वारी १ वाटी, बाजरी १ वाटी , हिरवे मूग १/२ वाटी, हरभरा डाळ १/२ वाटी, पोहे मूठभर, दही/लिंबाचा रस १ चमचा, मीठ, कोथिंबीर, तेल, उकड बटाट्याची भाजी

० कृती – वरील सर्व धान्य स्वच्छ धुवून दिवसभर पाण्यात भिजवून ठेवा. यानंतर मिक्सरच्या साहाय्याने याची भरड बनवा. दरम्यान यात लिंबाचा रस किंवा दही मिसळून घ्या. आता चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून हे मिश्रण एकाच बाजूने ढवळा. नॉनस्टिक पॅनल तेल लावून आता डोसा घाला. यानंतर ३ ते ४ मिनिटांनी डोसा कडा सोडताच उकड बटाट्याची भाजी ठेवून डोसा फोल्ड करा. तुमचा चविष्ट आणि पौष्टिक डोसा तयार.

० फायदे – या डोश्यामुळे शरीराला विविध धान्यांमधून मिळणारे पोषण एकत्र मिळते. शिवाय शारीरिक ऊर्जा कायम राहते. रोग प्रतिकारक शक्तीत वाढ होते.

२) मिक्स व्हेजी डोसा

० साहित्य – तांदूळ ३ वाटी, उडीद डाळ १ वाटी, मेथी दाणे ५, गाजर – फरसबी – सिमला मिरची – कोबी या भाज्या १ वाटी, मका १ वाटी, लिंबाचा रस २ चमचे, मीठ, कोथिंबीर, जिरा पावडर, तेल.

० कृती – तांदूळ उडीद डाळ ५ तास भिजवून वाटून घ्या. यात मेथीदाणे घालून रात्रभर ठेवा. यानंतर सकाळी सर्वफ भाज्यांचे सारण बनवून घ्या. (वरील सर्व भाज्या हलक्या परतून यात आवडीनुसार मसाले, मीठ आणि लिंबू पिळा) आता तयार मिश्रणात मीठ, जिरं पावडर आणि कोथिंबीर घालून घ्या. व्यवस्थित ढवळून गुठळ्या न ठेवता या पिठाचे डोसे बनवा. डोसा कडा सोडताच मिश्र भाजी ठेवून डोसा फोल्ड करा. तुमचा पौष्टिक डोसा तयार.

० फायदे – हा डोसा अगदी लहान मुलांना देखील सर्व भाज्या खायला प्रवृत्त करतो. यामुळे भाज्यांमधून मिळणारे सत्त्व मुलांना प्राप्त होतात.

३) चीज डोसा

० साहित्य – जाड तांदूळ ३ वाटी, उडदाची डाळ १ वाटी , मेथीचे दाणे ५-६, २ चीज क्यूब, उकड बटाट्याची भाजी, चवीनुसार मीठ, मिरची फ्लेक्स, कोथिंबीर

० कृती – प्रथम तांदूळ व उडीद डाळ स्वच्छ धुऊन ६ तास भिजवा. यानंतर मिक्सरला वाटून घ्या. यात मेथी दाणे घालून रात्रभर ठेवा. आता दुसऱ्या दिवशी चमच्याच्या मदतीने हे मिश्रण मिक्स करून यात चवीनुसार मीठ , मिरची फ्लेक्स, कोथिंबीर घाला आणि आता याचे डोसे पसरवा. डोसा पसरवल्यानंतर उकड बटाट्याची भाजी ठेवून यावर चीज किसून घाला. झाला तुमचा डोसा तयार.

० फायदे – हा डोसा खायला अतिशय चविष्ट असून लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो. हा डोसा खाल्ल्यामुळे चीज खाल्ले जाते. आणि चीजमध्ये आपल्या शरीराला आवश्यक बरेच घटक असतात. फक्त चीजचे प्रमाण अधिक घेऊ नये.

४) नीर डोसा

० साहित्य – तांदूळ २ वाटी, खोवलेलं खोबरे १ वाटी, हिरव्या मिरच्या २-३, आलं १ तुकडा, आवश्यकतेनुसार पाणी, मीठ, तेल

० कृती – तांदूळ व्यवस्थित धुवून ४ तास भिजवत ठेवा. त्या नंतर मिक्स मध्ये वाटून घेताना यात खोवलेले खोबरे, मिरची आणि आलं घाला. आता यात मीठ टाका आणि आवश्यकतेनुसार पाणी मिसळा. पुढे नॉन स्टिक पॅनवर मस्तपैकी डोसा तयार करा.

० फायदे – नीर डोसा पचायला हलका असल्यामुळे पोटाला त्रास होत नाही. तसेच नाश्त्याला नीर डोसा खाल्ल्यास शारीरिक ऊर्जादेखील कायम राहते.