| | |

ओट्स खा पोटभर आणि निरोगी रहा आयुष्यभर; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। प्रत्येकाला आयुष्य हे एकदाच मिळतं. त्यामुळे ते मनसोक्त जगलेच पाहिजे आणि जगायचे असेल तर निरोगी राहिले पाहिजे. मग निरोगी राहण्यासाठी काय करायचे? तर आहारात सात्विकता आणि पौष्टिकतेचा समावेश करायचा. यासाठी ओट्स अत्यंत महत्वपूर्ण भूमिका निभावतात. कारण ‘ओट्स’ हा एक पौष्टिक आहार आहे. हा पदार्थ गहू खडबडीत दळून तयार केला जातो. ओट्सचे सेवन केल्यास बर्‍याच रोगांपासून दूर राहता येते. मुळात ओट्स खाल्ल्यामुळे पोट लवकर आणि बराच काळ भरलेले राहते. यामुळे वाढत्या वजनावर नियंत्रण आणि मधुमेह प्रकार २ यामध्ये ओट्स फायदेशीर ठरतात. शिवाय ते आपल्या पाचन शक्तीला आणि हाडांना देखील मजबूत करतात. ओट्समध्ये भरपूर जीवनसत्त्वे, फायबर, प्रथिने, खनिजे, पोटॅशियम, लोह, फॉस्फरस, कॅल्शियम, आयोडीन आणि मॅग्नेशियम इत्यादी घटक मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे ओट्स खाणे निरोगी आयुष्याची गरज आहे. चला तर जाणून घेऊयात ओट्सचे खाण्याचे फायदे खालीलप्रमाणे:-

१) हिमोग्लोबिनमध्ये वाढ – ओट्स हा लोहयुक्त पदार्थ असल्यामुळे त्याचे दररोज सेवन केल्यास शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते आणि आपसूकच हिमोग्लोबिनमध्ये वाढ होते. परिणामी ऍनिमियासारखे रोग होत नाहीत.

२) शारीरिक ऊर्जा मिळते – ओट्समध्ये कार्बोहायड्रेट, प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन बी 1, व्हिटॅमिन बी 2, मिनरल मॅग्नेशियम इत्यादी आवश्यक पोषक घटक असतात जे आपल्या शरीरास आवश्यक ऊर्जा प्रदान करतात.

३) पचनप्रणाली सुधारते – दररोज ओट्सचे सेवन केल्यास त्यातून शरीरास पूरक फायबर मिळते. ज्यामुळे आपली पचनप्रणाली तंदुरुस्त राहते. शिवाय त्यात असलेले ऑटमील विद्रव्य घटक बाहेर काढण्यास शरीराला मदत करतात. परिणामी पचनप्रणाली सुधारते आणि निरोगी राहते.

४) हाडांना मजबुती मिळते – दररोज ओट्सचे सेवन केल्यास हाडांना कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात मिळते. परिणामी हाड मजबूत होतात.

५) वाढते वजन आटोक्यात येते – ओट्समध्ये शरीराला भरपूर ऊर्जा देणारे घटक समाविष्ट असतात. ज्यामुळे शरीराला पूरक ऊर्जा मिळते. शिवाय पोट लवकर भरते आणि दीर्घकाळ भरलेले राहते. परिणामी इतर कोणतेही पदार्थ अधेमधे खाणे होत नाही. यामुळे साहजिकच वजनावर नियंत्रण मिळवता येते.

६) स्तन कर्करोगापासून संरक्षण मिळते – ओट्समध्ये फायबर भरपूर प्रमाणात आढळतात. त्यामुळे ओट्स दररोज खाल्ल्याने स्तनाच्या कर्करोगाचा त्रास दूर होऊ शकतो आणि टाळता सुद्धा येतो. मुळात चुकीच्या आहार पद्धतीमूळे स्त्रियांना स्तनाचा कर्करोग होतो. त्यामुळे आहारात बदल करणे आवश्यक आहे हे समजून घ्यावे.