|

बिनधास्त खा !!! मटण,चिकन,मासे किंवा अंडी; प्रत्येकाचे ‘हे’ आहेत फायदे

शाकाहार चांगला कि मांसाहार हा वाद अतिप्राचीन काळापासून चालत आला आहे. आपल्याला वादांमध्ये पडायचे काहीच कारण नाही. कोण शाकाहाराचे गुणगान गातो आणि मांसाहार आणि तो मांसाहार करणारे किती वाईट यांचा तिरस्कार करतो. काही ठिकाणी तर मांसाहार करणाऱ्या व्यक्तीला घर सुद्धा मिळत नाही असे नेहमी आपण वर्तमानपत्रात वाचले असेल. याउलट मांसाहारी व्यक्ती ह्या प्युअर व्हेजिटेरियन लोकांचा ‘घास फूस’ खाणारे म्हणून टर उडवतात. तसे प्रत्येक गोष्टीचे फायदे तोटे असतातच. मग इथे तरी नियमाला अपवाद कसा असेल. तसे बघायला गेलो तर नॉनव्हेज मध्ये सुद्धा उपप्रकार आहेत. कुणाला मटण आवडते, तर कुणाला चिकन. कोण मासे खाण्याचा शौकीन तर कुणाला नुसती अंडी आवडतात. अस्सल नॉनव्हेजवाल्याला सर्व काही चालते. आज आपण जाणून घेणार आहोत कि आपल्या शरीराला नक्की चांगले काय? चिकन,मटण,मासे कि अंडी !!!

चिकन/मटण खाण्याचे फायदे
चिकनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतं. त्यामुळे जिम करणाऱ्यांना तसंच डाएट करणाऱ्यांना चिकन खाण्याचा सल्ला दिला जातो. प्रोटीनमुळे आपल्या मांसपेशींना ताकद मिळते. ज्यांना शरीराची ताकद वाढवायची असेल त्यांनी चिकन खाण्याला प्राधान्य दिलं पाहिजे. सुदृढ आहारात चिकनचा समावेश केला जातो. हे लीन मीट आहे. याचा अर्थ असा की यात फार फॅट नसतात. त्यामुळे नियमित स्वरुपात चिकन खाण्याने वजन कमी होण्यास मदत मिळू शकते.
अनेक लोकांना ऑफिसमध्ये वा घरात खूप काम करून ताण तणावाला सामोरे जावे लागते. अश्याने मानसिक स्थिती खूप बिघडू शकते आणि आयुष्यातला खरा आनंद हिरावला जातो. या ताणतणावावर योग्य उपचार न केल्यास माणूस डिप्रेशनमध्ये सुद्धा जाऊ शकतो. पण तुम्ही चिकन खाल्लं तर मात्र हीच गोष्ट टाळता येऊ शकते. चिकन मध्ये ट्रिप्टोफन हा घटक आढळतो जो कि ताण तणाव दूर करण्यास खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. चिकनमध्ये विटामिन ‘बी6’ ची मात्रा आढळते जी मेटाबॉलिज्म म्हणजेच चयानपचन क्रियेमध्ये मोठी सुधारणा आणू शकते. ही पोटाशी संबंधित अशी क्रिया असते जी पचन तंत्रावर सुद्धा सक्रीय रुपात प्रभावशाली ठरते, परंतु ही क्रिया कमकुवत झाल्यास व त्यात काही समस्या उद्भवल्यास तुम्हाला पोटाशी सबंधित विकार आणि आजार होऊ शकतात. म्हणून मेटाबॉलिज्म क्रियेमध्ये सुधारणा होत राहावी असं वाटत असेल तर नियमितपणे चिकनचे सेवन करायला हवे. नियमित मटण खाणाऱ्या लोकांची शरीररचना हि इतरांच्यापेक्षा नेहमीच मजबूत दिसते.

Ingredients for protein diet

मासे खाण्याचे फायदे
मासे खाल्ल्याने डायबिटीजचा धोका कमी होण्यास मदत होते.याचबरोबर हार्ट अटॅक होण्याचा धोका टळण्यास मदत होते. जगात सगळीकडेच हार्ट अटॅक आणि स्ट्रोक ह्यामुळे अकाली मृत्यू होण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. पण अनेक अभ्यासांत असे सिद्ध झाले आहे की मासे हे हार्ट हेल्दी फूड आहे.
माशांमध्ये ई.पी.ए. आणि ओमेगा 3 या फॅटी अॅसिड्सचे प्रमाण असल्यामुळे शरिरातील मेटाबोलिजमचे स्तरवाढत जातो. ओमेगा थ्री फॅटी ऍसिडचे पोषण शरीराला नियमित मिळाल्यामुळे शरीराचे चक्र व्यवस्थित सुरु राहते. आणि सर्व अवयवांचे कार्य देखील सुरळीत चालते. तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी मासे अतिशय लाभदायी आहेत. ओमेगा-3 ऍसिडमुळे तुमच्या डोळ्यांची चमक वाढत जाते. काही माश्यांमध्ये मर्क्युरीचे प्रमाण जास्त असल्याने अर्भकाच्या वाढीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच गरोदर स्त्रियांनी व स्तनपान करण्याऱ्यांनी मातांनी असेच मासे खाल्ले पाहिजेत ज्यांच्यात मर्क्युरीचे प्रमाण खूप कमी असेल.

अंडी खाण्याचे फायदे
संडे हो या मंडे रोज खाओ अंडे!! या उक्तीप्रमाणे अंडी शरीरासाठी सर्वात स्वस्त व मस्त असा जीवनसत्वांचा खजाना आहे. आहारात पालेभाज्या, दुध यांचा वापर करण्याबरोबरच अंडेही गरजेचे आहे. अंड्याच्या वापराने प्रथिने, विविध जीवनसत्वे, खनिजे, लोह,आयोडीन, झिंक, असे बहुतांशी घटक मिळतात. अंड्याच्या बलकापासून व्हिटॅमिन्स, क्षार, लोह मिळते.अंड्याच्या बलकातील ‘कोलीन’ हा घटक बौद्धिक विकासात उपयुक्त ठरतो. अंड्यातील बलक डोळे निरोगी राखण्याबरोबरच स्नायूंची झीज रोखण्यासाठीही उपयुक्त. अंड्यांमधून ऊर्जा, प्रथिने, काबरेहायड्रेट, कोलीन, व्हिटॅमिन ए, डी, बी-६, बी १२, – अंड्यातून फॉस्फेट, आयर्न, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम पोषणमूल्ये मिळतात.अंड्यामुळे हाडांची मजबुती, निरोगी डोळे, तजेलदार त्वचा, शरीराची वाढ, चेतापेशींना संरक्षण मिळण्यासोबतच सौंदर्य राखण्यासाठीही मदत होते. मानवी शरिरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषणमूल्ये अंड्यातून मिळत असल्याने शारीरिक तंदुरुस्तीसाठी आहारात नियमितपणे अंडी खाणे आवश्यक आहे, असे आहारतज्ज्ञ सांगतात.

आता राहता राहिला विषय की हे पदार्थ किती प्रमाणात खावेत? कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नेहमी घातकच असतो म्हणूनच मासे अथवा चिकन/मटण ह्यांचे सेवन तुम्हाला झेपेल एवढेच करा. शक्यतो ह्या पदार्थांचे सेवन दुपारच्या जेवणात करा. रात्रीच्या जेवणात शक्यतो हलक्या स्वरूपाचा आहार घेणे केव्हाही चांगले.