| |

सब्जा खाणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर; कसे? ते जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। घराघरांत पूजनीय असणारी तुळस अनेक आजारांवर औषधी म्हणून काम करते. त्यामुळे आयुर्वेदातही तुळशीचे एक वेगळे स्थान आहे. तुळशीमुळे आपले आरोग्य निरोगी राखण्यास मदत होते. इतकेच काय तर तुळशीच्या पानांइतकेच तुळशीच्या बियांचे देखील अनेको लाभ होतात. आता तुम्ही म्हणाल तुळशीचं बी? ते काय असतं? तर तुळशीचं बी म्हणजेच सब्जा आणि तो शरीरासाठी अतिशय गुणकारी असतो. मुख्य म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात सब्जाचे सेवन केल्याने शरीरातील दाह कमी होतो. इतकेच काय तर सब्जा आपल्या शारीरिक विकासासोबतच मानसिक विकासासाठीदेखील फायदेशीर असतो. कारण सब्जामध्ये कॅलरीज, प्रोटिन, कार्बोहायड्रेट, विटॅमिन ए, के, ई, बी, मॅग्नेशियम, फायबर, कॅल्शियम आणि पोटॅशियम हे सर्व घटक समाविष्ट असतात. हे घटक आपल्या शरीराला योग्य तितके पोषण देण्यास सक्षम असतात. त्यामुळे सब्जा खाणे शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. चला तर जाणून घेऊयात सब्जा खाण्याचे आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात ते खालीलप्रमाणे :-

० बद्धकोष्ठतेवर परिणामकारक – बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या लोकांसाठी सब्जा अतिशय लाभदायक आहे. कारण सब्जा शरीरातील डिटॉक्सिफिकेशनच्या प्रक्रियेत अत्यंत लाभदायक ठरतो. कारण सब्जाचे सेवन केल्यामुळे पोट, पचनक्रिया सुरळित होते. परिणामी आतड्यांचे कार्य चांगले राहते आणि अपचनाचा त्रास होत नाही. यासाठी गरम पाण्यात सब्जा भिजवून रोज रात्री दुधासोबत घेतल्याने फायदा होतो. शिवाय सब्जामुळे गॅससंबंधीच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. इतकेच नव्हे तर सब्जामुळे पोटातील जळजळ आणि अॅसिडिटीदेखील कमी होण्यास मदत होते.

० त्वचेसाठी फायदेशीर – वाढते प्रदूषण आणि चुकीची जीवनपद्धती याचा आपल्या त्वचेवर अतिशय घाणेरडा प्रभाव होत असतो. परंतु सब्जा त्वचेला ठीक करण्यासाठी फायदेशीर ठरतो. यासाठी नारळाच्या तेलात सब्जा भिजवून त्याने त्वचेवर मसाज केल्यास त्वचा तजेलदार होण्यास मदत होते. इतकेच काय तर सब्जाचा फेसपॅक वापरल्याने त्वचेवरील डाग आणि माती निघून जाण्यास मदत होते.

० केसांचे आरोग्य राखते – धूळ, माती आणि वाढते प्रदूषण यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात. मात्र सब्जात असणारी विटॅमिन, लोह, प्रोटिन अशी पोषक द्रव्ये केसांसाठी उपयोगी असतात. त्यामुळे सब्जा केसांसाठी अत्यंत लाभदायक उपाय ठरतो. यासाठी नारळाच्या तेलात सब्जा भिजवून ठेवावा आणि तो मुरला कि केसांना लावा. यामुळे केस चमकदार होण्यास मदत होते.

० वजनावर नियंत्रण करते – सब्जाचा फायदा वाढते वजन नियंत्रणात आणि वाढलेले वजन कमी करण्यासाठी होतो. शिवाय सब्जामध्ये अल्फा-लिनोलेनिक अॅसिड असते. यामुळे शरीरातील पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. परिणामी वजन कमी होण्यास मदत होते. शिवाय सब्जामध्ये असलेले फायबर मोठ्या प्रमाणात भूक नियंत्रणात ठेवते. परिणामी आपण गरजेपेक्षा अधिक अन्न खात नाही आणि याचा दुष्परिणाम आपल्याला भोगावा लागत नाही.

० ‘या’ आजारांवर बहुगुणी – सब्जा आपल्या शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. आता मानसिक समस्या म्हणजेच टेन्शन, डिप्रेशन, मायग्रेन यांसारख्या आजारांवर सब्जा फायदेशीर ठरतो. कारण सब्जाचे सेवन केल्यास उत्साह वाढतो. शिवाय उन्हाळ्याच्या दिवसांत पोट थंड राहते आणि सब्जाचे सेवन केल्याने पोटात अॅसिडिसी कमी होते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. शिवाय सब्जामुळे शरीरातील टॉक्सिन दूर होतात. त्यामुळे शरीराला एनर्जी मिळते.