| | |

चॉकलेट खाणं भितीदायक का आरोग्यदायक?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। चॉकलेट एक असा पदार्थ आहे जो खाताना मनात गिल्ट आलं तरीही गोडच लागतो. याचे कारण म्हणजे अगदी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच चॉकलेट खायला आवडतं. पण चॉकलेट खाल्ल्यामुळे आपले वजन वाढेल किंवा आपल्याला आरोग्यविषयक काही समस्यांना तोंड द्यावे लागेल अशी भीती अनेकांना चॉकलेट पासून खूप लांब करते. पण आम्ही सांगू, मनात आलंच तर एखादा चॉकलेटचा तुकडा खायला काहीही हरकत नाही. आता तुम्ही म्हणाल, छे! असं कसं? तर मित्रांनो चॉकलेट खाणं आरोग्यासाठी हानिकारक आहे मुळात हा समज नव्हे तर गैरसमज आहे. कारण चॉकलेटबाबत तज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, चॉकलेट खाणं वजन कमी करण्याचा उत्तम पर्याय आहे. पण अर्थातच चॉकलेट किती, कोणतं आणि कसं खावं? याचं एक प्रमाण ठरलेलं असणे गरजेचे आहे. फक्त तेव्हढं जपालं तर चॉकलेट खाताना भीती वाटणार नाही.

० दररोज किती चॉकलेट खाणे आरोग्यासाठी लाभदायक आहे?
– मुख्य म्हणजे तुम्हाला आरोग्याच्या फायद्यांसाठी चॉकलेट खायचे असेल तर डार्क चॉकलेट खाण्यास प्राधान्य द्या. कारण, डार्क चॉकलेट हे कोको बीन्सपासून बनवले जाते. यामध्ये लोह, तांबे, झिंक, फॉस्फरस यांसारखे अनेक पोषक घटक समाविष्ट असतात. त्यामुळे लो कॅलरी स्वीट म्हणून डार्क चॉकलेट खाता येईल. शिवाय डार्क चॉकलेटमध्ये खूप फायबर्स असतात. हे फायबर पोटात गेल्यानंतर बराच वेळ भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी होण्यासाठी मदत होते. त्यामुळे डार्क चॉकलेटचा एक छोटासा तुकडा खायला हरकत नाही. याबाबत तज्ञ सांगतात कि, दररोज ५० ग्रॅम डार्क चॉकलेट खाणे योग्य आहे.

० डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे :-

१) ऊर्जात्मक शक्ती – डार्क चॉकलेटमुळे शरीराला आवश्यक तितकी ऊर्जा मिळते. कारण डार्क चॉकलेटमध्ये झिंक, मॅग्नेशियम, तांबे अशा पौष्टिक घटकांचे प्रमाण खूप चांगले असते. शिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आवश्यक झिंक डार्क चॉकलेटमध्ये असल्यामुळे शरीराला अतिशय लाभ होतो.

२) मानसिक आरोग्यासाठी उत्तम – डार्क चॉकलेट खाल्ल्यामुळे शरीरातील हॅपी हार्मोन्सचे स्वास्थ्य सुधारते. म्हणून डार्क चॉकलेट खाणे मानसिक आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. याशिवाय डार्क चॉकलेट खाल्ल्याने ताणतणाव कमी होतो.

३) मेंदूसाठी लाभदायक – डार्क चॉकलेटमध्ये असणारे तांबे हे मेंदूचे काम अधिक वेगवान करते. त्यामुळेच कधी मेंदूवर ताण येत असेल असे जाणवले तर डार्क चॉकलेट नक्की खा. यामुळे उत्साह तर येतोच पण अधिक सकारात्मक वाटू लागते.

४) शुगर कंट्रोल – शरीराला योग्य प्रमाणात मॅग्नेशियम मिळाले तर रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात राहते आणि डार्क चॉकलेटमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण उत्तम असते. त्यामुळे ते शरीरासाठी उपयुक्त ठरते.

५) पचनशक्ती सुधारते – डार्क चॉकलेटमध्ये असे काही घटक असतात, जे पचन क्रियेसाठी उपयुक्त ठरणाऱ्या एन्झाईम्सला सक्रिय करतात. त्यामुळे शरीरातील चयापयच क्रिया सुधारते आणि चयापचय क्रियेचा वेग वाढल्यामुळे पचनशक्ती सुधारते.

६) हाडे मजबूत होतात – डार्क चॉकलेटमध्ये मँगनीज, पोटॅशियम, फॉस्फरस असे घटक जास्त असतात. हे घटक हृदय, मज्जासंस्था यांचे कार्य उत्तम ठेवण्यास मदत करतात. तसेच फॉस्फरसमुळे हाडांना आणि दातांना मजबूती मिळते.

७) बॅड कोलेस्टरॉल कमी होते – आपल्या शरीरात बॅड कोलेस्टरॉल (cholesterol)आणि गुड कोलेस्टरॉल असे दोन प्रकार असतात. यापैकी बॅड कोलेस्टरॉलमूळे शरीराला घातक रोगांची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे हृदयाचे स्वास्थ्य बिघडते. यावर उत्तम उपाय डार्क चॉकलेट मानला जातो. कारण डार्क चॉकलेट खाल्ल्यामुळे बॅड कोलेस्टरॉल कमी होण्यास मदत मिळते आणि हृदय निरोगी राहते.

८) वजनावर नियंत्रण – डार्क चॉकलेटमध्ये ७०% असे पदार्थ असतात, जे वजन कमी करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे जर तुम्ही वेटलॉससाठी प्रयत्न करत असाल, तर डार्क चॉकलेटचा १ छोटा तुकडा दररोज खाण्यास हरकत नाही. यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी साठत नाही. परिणामी वजन कमी होते.