| | | |

सोयाबीन वडी खाल्ल्याने आरोग्याला होतात ‘हे’ फायदे; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सोयाबीनमध्ये असे अनेक पोषक घटक असतात जे प्रोटिन्सने परिपूर्ण असतात. त्यामुळे शाकाहारी लोकांसाठी सोयाबीन प्रोटीन मिळवण्यासाठी एकदम उत्तम पर्याय म्हणून ओळखला जातो. यामुळे आपल्या आहारात सोयाबीनपासून टोफू, सोया मिल्क, सोयाबीन सीड्स, सोयाबीन तेल आणि सोयाबीन वडी असे सर्व पदार्थ असणे गरजेचे आहे. सोयाबिनच्या पिठाचा वापर करून सोया वडी वा सोया चंक्स बनवले जातात. हे सोया चंक्स आपल्या शरीरातील चरबी आणि तेल काढून टाकण्यात सहाय्यक असतात. यात भरपूर पोषण असते. म्हणून आहारात सोयाबीन वडी खाणे फायदेशीर आहे. जाणून घ्या फायदे खालीलप्रमाणे:-

१) निरोगी हृदय – ह्रदयाचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल कमी आणि गुड कोलेस्ट्रॉल गरजेइतके असणे आवश्यक असते. कारण कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येतो आणि ह्रदयाच्या कार्यात अडथळा निर्माण होतो. परिणामी हृदयाचे कार्य अस्थिर होते आणि हृदय विकारांची शक्यता बळावते. अशावेळी सोयाबीन वडी आवडेल तश्या पद्धतीने खाणे फायदेशीर आहे. कारण सोयाबीनमध्ये असणाऱ्या लेसीथीनमुळे रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल साचत नाही. शिवाय यामुळे शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. यामुळे हृदयाचे रोगांपासून संरक्षण होते.

२) पचनास सहाय्यक – सोया चंक्स फायबरमध्ये समृद्ध असतात आणि फायबर पाचन तंत्रात महत्वाची भूमिका बजावते. यामुळे तुम्हाला बऱ्याच काळासाठी पोट भरल्यासारखे वाटते. हे बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास सक्षम आहे. याव्यतिरिक्त, सोयामध्ये ऑलिगोसेकेराइड नावाचे कार्बोहायड्रेट असते जे निरोगी आतड्यांच्या जीवाणूंच्या वाढीस उत्तेजन देते

३) कमकुवत हाडांसाठी फायदेशीर – सोयाबीन वड्यांमध्ये मिनरल, कॅल्शियम, तांबे, जस्त, जीवनसत्वे आणि सेलेनियमने समृद्ध असतात. यामुळे शरीरातील हाडे कमजोर वा कमकुवत झाली असतील तर सोयाबीन वडी खाणे फायदेशीर आहे. शिवाय सोयाबीन ते नवीन हाडांच्या वाढीस मदत करते. हाडांमध्ये कॅल्शियम टिकवून ठेवते. यामुळे हाडे मजबूत बनवतात तसेच हाडांच्या समस्या देखील दूर होण्यास मदत होते.

४) मधुमेहींसाठी फायदेशीर – मधुमेहींना अनेकदा हे खाऊ का नको? असे प्रश्न पडत असतात. कारण त्यांच्या रक्तातील साखर वाढली तर त्याचा परिणाम थेट ह्रदय, किडनी आणि अगदी मेंदूवर होतो. पण सोयाबीन खाण्यामुळे मधुमेंहीच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. शिवाय कोलेस्ट्रॉल वाढत नाही. त्यामुळे मधुमेहींनी सोयाबीन पासून बनवलेल्या पोळ्या खाव्या किंवा गव्हात सोयाबीन मिसळून दळलेले पीठ पोळ्यांसाठी वापरावे.

५) वजनावर नियंत्रण – सोयाबीन वडी खाणे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. कारण सोयाबीन इंद्रियांभोवती अतिरिक्त चरबी जमा होण्यापासून रोखते. अशा प्रकारे, वजन कमी करण्यास त्याची मदत होते. याशिवाय, सोयाबीन वडी प्रथिनसमृद्ध असते. त्यामुळॆ दुबळ्या स्नायूंच्या विकासासाठी सोयाबीन खाणे फायदेशीर आहे. याशिवाय सोयाबीन खाल्ल्याने चयापचय गतिमान होते. परिणामी वजन नियंत्रित करण्यास सहाय्य मिळते.

६) त्वचा आणि केसांसाठी आवश्यक – सोयाबीन वडीचे सेवन हे त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. कारण यामुळे त्वचा आणि केस सुंदर होण्यास मदत मिळते. यामुळे त्वचा हलकी आणि सुंदर होते. शिवाय सुरकुत्या कमी होतात. तसेच कोरड्या केसांची समस्या देखील कमी होते. सोयाबीन खाल्ल्याने केस मजबूत होतात. यामुळे केस गळणे कमी होते.