| | |

ड्रिंकसोबत अश्या पदार्थांचे सेवन कराल तर मजामस्तीचा प्याला करेल घात; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। खूप दिवसांनी मित्र भेटला..चला पार्टी करूया. अरे वाह प्रमोशन झालं.. चला पार्टी करूया. बायकोचा बर्थडे.. चला पार्टी करूया. अरे यार ती सोडून गेली.. चला दुःख विसरुया. कारणं भले वेगवेगळी असतील पण या सर्वांचे शेवटचे टोक पार्टी आणि दुःख इथेच येऊन थांबते. अगदीच सोप्प्या भाषेत सांगायचं तर मद्यपान अर्थात ड्रिंक करणे. सगळ्या चांगल्या वाईट भावनांची जिथे गोची होते ती गोष्ट म्हणजे दारू पिणे. हा प्रत्येकाचा ब्रँड, सॉफ्ट ड्रिंक, हार्ड ड्रिंक अशी आवड आणि निवड सगळं काही वेगळं असलं तरीही निमित्त तीच तीच असतात. अनेकांना यात आनंद मिळतो तर काही जण मिळतात ताण दूर होतो. त्यामुळे कुणीही कितीही ओरडून ओरडून सांगितलं कि बाबा रे दारू पिऊ नका यामुळे आरोग्याचा ऱ्हास होतो. तरीसुद्धा लोकं काही ऐकणार नाहीत हे नक्की.

आता ड्रिंक करणार म्हटल्यावर त्यासोबत हवा तो चकणा. चकणा म्हणजे काय यासाठी काही विशेष व्याख्या सांगायची गरज नाही कारण ते आपण सारेच जाणतो. मग यात रुचकर स्टार्टर्स हवे. जस कि- कबाब, लेग पीस, चिप्स, सुका मेवा, चॉकलेट्स असलं काहीही. पण किती जण हे जाणतात कि, रिकाम्या पोटी मद्यपान करणे, जास्त तेलकट, जास्त तिखट पदार्थ मद्यासोबत खाणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे? हो हे खरं आहे. कारण, अल्कोहोल आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी करून आपल्याला डिहायड्रेड करते. शिवाय अल्कोहोलमुळे शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी होते आणि यामुळेच मद्यपान केल्यानंतर दुसर्‍या दिवशी डोकेदुखीचा त्रास होतो. याशिवाय असे काही पदार्थ आहेत जे मद्यपान करताना खाल्ले तर हा एकच प्याला शेवटचा व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून आवडीने पिणाऱ्यांसाठी हा लेख आवश्यक आहे. पूर्ण वाचा आणि फायद्याच्या गोष्टी जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) तेलकट पदार्थ – ऑईली चिप्स, फ्राईज, कबाब अश्या तेलकट पदार्थांची चव कितीही भारी असली तरी ते पचायला जड असतात. मद्यासोबत अशा पदार्थांचे सेवन आपली काळजी वाढवू शकते. याशिवाय पचायला जड असणारे कोणतेही अन्न पदार्थ म्हणजे बटाटा, कांदा यांपासून बनवलेले पदार्थ मद्यासोबत खाल्ले तर पचनसंस्थेवर त्याचा ताण येतो. रेड वाईन सोबत बीन्स, बीयर सोबत ब्रेड असे कॉम्बिनेशन पचन संस्था बिघडवून मोठ्या आजारांना आमंत्रण देतात.

२) खारे पदार्थ – हलके फुलके स्नॅक्स, चिप्स, पॉपकॉर्न यांसारखे मिठाचे जास्त प्रमाण असणारे पदार्थ आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी करते. त्यामुळे अधिकाधिक मद्याचे सेवन करणे हानिकारक असते. म्हणून मद्यपान करताना मिठाचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ जास्त खाऊ नये.

३) दूध व दुग्धजन्य पदार्थ – मद्यपान करताना दूध वा दुग्धजन्य पदार्थ खाणे टाळा. कारण जेव्हा मद्य प्यायले जाते तेव्हा शरीरातील आम्लाचे प्रमाण वाढलेले असते. अशावेळी जर अल्कलीयुक्त असणारे दूध वा दुग्धजन्य पदार्थ खाल्ले तर अपचनाचा त्रास होतो. म्हणून मद्यपान केल्यावर किंवा करण्याआधी दूध वा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करू नये.

४) पिझ्झा – मद्य आणि पिझ्झा हे कॉम्बिनेशनच चुकीचे आहे. कारण पिझ्झा मैद्यापासून तयार होतो आणि मैदा पचायला जड असतो. यामुळे मद्यासोबत पिझ्झा खाणे म्हणजे आपल्या पचनसंस्थेवर स्वतःच ताण आणण्यासारखे आहे.

५) डार्क चॉकलेट – डार्क चॉकलेट खाणे खरंतर आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण ड्रिंक केल्यावर किंवा ड्रिंकसोबत? नाही. नो. नकोच. कारण इतर आम्लयुक्त पदार्थांप्रमाणे केफेन, फॅट आणि कोको हे चॉकलेटमधील पदार्थ मद्यासोबत खाल्ले तर गॅस्ट्रीक प्रॉब्लेम होतो. परिणामी पोटाच्या तक्रारी वाढतात.

० महत्वाचे – मद्यपान करायचेच असेल तर सॅलड, उकडलेले अंड्याचे पदार्थ अश्या आरोग्यदायी पदार्थांचे कॉम्बिनेशन घ्या आणि आरोग्याची काळजी घ्या!