| |

ब्रश न करता खाण्याची सवय तोंडाच्या आरोग्याचे करते नुकसान; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेकांना सकाळी उठल्यानंतर अंथरुणातच चहा प्यायची सवय असते. स्टाईल आणि स्टेटस च्या नादात हे लोक अगदी आपल्या आरोग्याची वाट लावायला मागे पुढे पाहत नाहीत. असे म्हणण्याचे कारण म्हणजे, तोंडाची अस्वच्छता. असे बरेच लोक आहेत जे तोंडाच्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. परिणामी विविध समस्यांना सामोरे जावे लागते. लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं कि सकाळी उठल्यावर ब्रश करा आणि मगच ब्रेकफास्ट करा. मग मोठे झाल्यानंतर हा नियम आपण कसे काय विसरतो? काहीही खाण्याआधी दात घासणे तोंडाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. कारण काही अन्नाचे तुकडे असतात जे रात्रीच्या वेळी पाण्याने तोंड स्वच्छ करूनही तोंडात राहतात. हे कण रात्रभर दातांत तसेच राहतात यामुळे तोंडाच्या समस्या होऊ शकतात. म्हणून रोज सकाळी ब्रश करून ते बाहेर काढणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया ब्रश न करण्याचे दुष्परिणाम:-

१) श्वासाची दुर्घंधी – वैज्ञानिकदृष्ट्या श्वासाची दुर्गंधी या समस्येला ‘हॅलिटोसिस’ म्हणतात. हि समस्या अस्वच्छ तोंडामुळे होते. जेवल्यानंतर दीर्घकाळ तोंडात टिकून राहिलेल्या अन्नाच्या लहान कणांना वास येतो आणि तोंडातून घाणेरडा वास येऊ लागतो. यात दात जितके कमी स्वच्छ असतील तितके तोंडात बॅक्टेरिया अधिक जमा राहतील हे समजून घ्या. यात जीभ स्वच्छ करणेदेखील महत्वाचे आहे. अन्यथा श्वासाची दुर्गंधी कायम राहील.

२) दात किडणे – दात किडण्यामुळे एकतर खूप वेदना सहन कराव्या लागतात. त्यामुळे दंत शस्त्रक्रिया करावी लागते. याचे कारण आहे दात व्यवस्थित आणि वेळेत न घासणे. कारण यामुळे प्लाक आणि टार्टर दात व हिरड्यांवर कायम राहतात. परिणामी दात कमकुवत होतात आणि किडायला लागतात, ज्यामुळे पोकळी तयार होते आणि दात गळतात.

३) अस्वच्छ दात – जेव्हा तुम्ही कॉफी, चहा, बीटरूट, वाइन यांसारखे रंग द्रव्ययुक्त अन्न खाता वा पिता तेव्हा दात पिवळे होतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही नाश्ता करण्यापूर्वी दात घासत नसाल तर दातांवर डाग पडतात. परिणामी दात खराबी होऊ लागतात.

४) तोंडाचे रोग – दात आणि हिरड्यांची योग्य काळजी न घेतल्यास तोंडातील बॅक्टरीया तोंडाचे नुकसान करू लागतो. परिणामी आपण कधी तोंडाच्या रोगांना बळी पडतो हे कळतही नाही. म्हणून वेळीच तोंडाच्या आरोग्याकडे लक्ष द्या.