|

कोविशील्ड घेतलेल्या ११ रुग्णांना झाला ‘हा’ आजार; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट सध्या ओसरताना दिसतेय. मात्र हि लाट ओसरतेवेळी तिसऱ्या लाटेची टांगती तलवार आहेच. त्यामुळे देशातील कोरोना प्रतिबंधक लसींच्या लसीकरणाच्या मोहिमेला प्रचंड वेग आला आहे. या लसीकरण अभियानात प्रामुख्याने कोविशील्ड लसींचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मात्र ऍस्ट्राझेनेका – ऑक्सफोर्डची लस घेतलेल्या एक दोन नव्हे तर तब्बल ११ जणांना एक दुर्मिळ आजार झाल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. हि लस घेतलेल्या या ११ जणांना गिलन बार सिंड्रोम नामक मेंदूशी संबंधित आजार झाला आहे. हि बाबा भारत आणि ब्रिटनमधील काही विशेष तज्ज्ञांच्या स्वतंत्र संशोधनातून समोर आली आहे. याबाबतचे मूळ वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.

केरळ राज्यामध्ये कोविशील्डची लस घेतलेल्या सात लोकांना ‘गिलन बार सिंड्रोम’ हा मेंदूशी संबंध असलेला अत्याधिक दुर्मिळ असा आजार झाला आहे. मुख्य बाब अशी कि, या व्यक्तींनी एकाच लसीकरण केंद्रातून हि लस घेतली होती. या लसीकरण केंद्रात आतापर्यंत सुमारे १२ लाखांहून अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे. तर ब्रिटनमधील नॉटिंग हॅम येथे चार लोकांना गिलन बार सिंड्रोम हा आजार झाला आहे. या भागात एकूण सात लाख लोकांना ऍस्ट्रा झेनेकाची लस देण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये ऍस्ट्राझेनेका म्हणून ओळखली जाणारी हि लस भारतात कोविशील्ड नावाने ओळखली जाते. हि सीरमने तयार केलेली लस आहे.

देशातील केरळ राज्यामध्ये सात तर नॉटिंग हॅममध्ये चार जणांना गिलन बार सिंड्रोम आजार झाला असल्याचे समोर आले आहे. या सर्व लोकांनी साधारण १० ते २२ दिवसांपूर्वी कोविशील्डची लस घेतली होती, अशी माहिती मिळत आहे. याबद्दल केरळ आणि नॉटिंग हॅममधील काही विषाणू तज्ज्ञांनी अभ्यास केला आणि हा निष्कर्ष समोर ठेवला आहे कि, ‘गिलन बार सिंड्रोम’ हा आजार झाल्यानंतर शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत होते. यामुळे हा आजार मेंदूच्या आणि पाठीच्या कण्याबाहेर असलेल्या परिघीय मज्जा संस्थेवर आघात करू लागतो. याबद्दलचा अहवाल एका नियत कालिकात १० जून २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता.