| |

गर्भातील बाळाची प्रत्येक हालचाल देते काहीतरी संदेश, जाणून घ्या ‘या’ हालचालीमागील रहस्य

हॅलो आरोग्य ऑनलाईन । बाळाचे आगमन ही कुटुंबासाठी खूप मोठी आनंदाची बातमी असते. घरी नवीन पाहुणा येणार ही गोष्टच त्याच्या आईबाबांसाठी कुतूहल, आनंद, काळजी अशा मिश्र भावनांनी भरलेली असते. सगळ्यात जर कोण खुश असते तर त्या होणाऱ्या बाळाची आई!! गरोदर असताना एक सुखद अनुभव प्रत्येक स्त्रीला मिळतो. तो अनुभव म्हणजे बाळाने पोटात लाथ मारणे होय. बाळाची ही हालचाल प्रत्येक स्त्री साठी एक अवर्णनीय आनंद असतो. बाळाची ही हालचाल जणू आईशी संवाद साधत असते. आईला जणू सांगत असते कि, “मी इथे तुझ्या पोटात सुखरूप आहे. मला लवकरच तुला भेटायचे आहे.” आईला देखील मग साहजिकच आपल्या बाळाच्या भेटीची आतुरता निर्माण होते.

बाळाची पहिली किक ही प्रत्येक आईसाठी खास असते. गर्भातील बाळाने किक मारल्यावर प्रत्येक आई एकतर खूप खुश होते किंवा मग चिंतीत तरी होते. पण आईला हे समजतच नाही की बाळ नक्की लाथ का मारतंय? त्याला नक्की आईला काय सांगायचं आहे? जाणून घेऊया बाळाच्या भावना.

गर्भातील बाळाची प्रत्येक किक देते काहीतरी मौल्यवान संदेश, फक्त आईने घेतलं पाहिजे समजून!

पण या सगळया भावनिक गोष्टी झाल्या ज्या आई आणि बाळाच्या नात्यातून निर्माण होतात. पण बाळाच्या या लाथ मारण्या मागचे कारण आणि त्याचा अर्थ वेगळा असतो जो अनेक स्त्रियांना माहित नसतो. तोच अर्थ आजच्या या विशेष लेखातून आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

बाळाचे आरोग्य

बेबी किक ही बाळाच्या आरोग्याचे संकेत देते. यातून असे दिसून येते की बाळ हे निरोगी आणि सुदृढ आहे. जेव्हा बाळ किक मारत नाही तेव्हा ती एक चिंतेची गोष्ट असते. कारण बाळाची हालचाल व्हायला हवी. त्यातून बाळ अॅक्टीव्ह असल्याचे जाणवते. पण जेव्हा बाळ अशी हालचाल करत नाही तेव्हा एकदा डॉक्टरांशी याबद्दल जरूर बोलावे. त्यामुळे जर तुमचे बाळ पोटात लाथ मारत असले वा बेबी किकची जाणीव तुम्हाला होत असले तर निश्चिंत व्हा कारण तुमचे बाळ निरोगी आणि सुस्थितीत आहे.

 

पदार्थाची चव घेतल्यावर

तुम्हाला मसालेदार चटपटीत पदार्थ खायला आवडतात का आणि ते खाताना पोटात झटका जाणवतो का तर याचा अर्थ असा असू शकतो की बाळाला त्या पदार्थाची चव आवडलेली नाही. आई जे काही खाते ते थेट बाळापर्यंत पोहोचते. त्याच पदार्थांची चव बाळाला देखील घेता येते. पण कधी कधी एखादा पदार्थ आवडल्यास सुद्धा बेबी किक जाणवू शकते. हा तर्क किती प्रमाणात योग्य आहे याबाबत अनेकांची मतमतांतरे आहेत. याशिवाय आईचा आवाज ऐकुन देखील बाळ किक मारते. गरोदरपणाच्या 18 व्या आठवड्यापासून बाळ ऐकायला सुरुवात करते. जेव्हा आई बाळाशी संवाद साधत असते तेव्हा त्याला प्रतिसाद म्हणून बाळ किक मारते. अशावेळी समजून जावं कि बाळ तुमचं बोलणं ऐकतंय.

प्रकाशाचा परिणाम

पोटावर जेव्हा प्रखर प्रकाश पडतो तेव्हा बाळ हालचाल करते आणि किक मारते. गरोदरपणाच्या 33 व्या आठवड्यात बाळाच्या डोळ्यांच्या बुबुळांचा आकार प्रकाशाच्या दृष्टीने बदलत जातो. याचा अर्थ असा की बाळ आता पहिल्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे प्रकाश ओळखू शकतो. पोटात हालचाल होण्याचा अर्थ केवळ किक मारणे असा नसून बाळाला उचकी आल्यावर सुद्धा बेबी किक जाणवते. जर तुम्हाला 30 सेकंद पेक्षा जास्त वेळ पोटात संथ आणि विशिष्ट पद्धतीने किक जाणवत असेल तर बाळ उचकी घेत असण्याची शक्यता जास्त आहे.

कधीपासून बेबी किक सुरु होते?

गरोदरपणाच्या 16 ते 25 व्या आठवड्याच्या दरम्यान आईला बाळाची पहिली हालचाल जाणवू शकते. जर तुम्ही पहिल्या वेळेसच गरोदर असाल तर तुम्हाला गरोदरपणाच्या 25 व्या आठवड्या पर्यंत कोणतीच हालचाल जाणवणार नाही. दुसऱ्या गरोदरपणात काही स्त्रियांना 13 व्या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच हालचाल जाणवायला सुरुवात होते. बसल्यावर, झोपल्यावर किंवा शांत स्थितीत सुद्धा बाळाची हालचाल जाणवू शकते. गरोदरपणाच्या सुरुवातीला तुम्हाला पोटामध्ये फुलपाखरू उडत असल्यासारखी भावना जाणवू शकते परंतु बाळाची वाढ होत असल्यावर आणि सामन्यत: गरोदरपणाची दुसरी तिमाही संपल्यावर ही भावना जास्त वेळ आणि सतत जाणवू शकते. गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये बाळ दर तासाला 30 वेळा हालचाल करते.