|

उत्तम आरोग्यासाठी नक्की किती तास झोपावे? ‘हे’ आहेत पूर्ण झालेल्या झोपेचे फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन : ‘लवकर झोपे, लवकर उठे त्यास आरोग्य भेटे’ अशी एक उत्तम म्हण आपल्याकडे चांगल्या वापरली जाते. आरोग्य उत्तम असावे असे सर्वांनाच वाटते. मात्र उत्तम आरोग्यासाठी काय आवश्यक आहे असे विचारल्यास पटकन उत्तर दिले जाते, उत्तम आरोग्यासाठी उत्तम झोप आवश्यक आहे. म्हणजे उत्तम झोप ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट सांगितली जाते की, उत्तम आरोग्य कशावरून ओळखावे? ज्याला उत्तम झोप लागते त्याचे आरोग्य उत्तम, असे खुशाल समजावे. म्हणजे झोप हे उत्तम आरोग्याचे साधनही आहे आणि उत्तम आरोग्याचे लक्षण सुद्धा आहे. मग झोप कशी घ्यावी, किती घ्यावी असे अनेक प्रश्न निर्माण होतात. लंडनमध्ये एका मानसशास्त्रज्ञाने केलेल्या अभ्यासात असे दिसून आलेले आहे की, जे लोक रात्री बरोबर दहा वाजता झोपतात त्यांचे आरोग्य उत्तम असते. तसे सगळेच लोक दहा वाजता झोपू शकत नाहीत. कारण प्रत्येकाच्या व्यवसायाचे स्वरूप वेगळे असते. मात्र ज्यांना शक्य असेल त्यांनी रात्री दहाच्या आत झोपण्याचा प्रयत्न करावा.

खरे म्हणजे दहाला झोपून सहाला उठलो की, आरोग्य चांगले राहते हे सर्वांनाच माहीत आहे. पण दहा वाजता झोपच येत नाही. बळबजरीने दहा वाजता अंथरुणावर पडलोच तर लवकर झोप लागत नाही आणि लागली तरी सात-आठ तास शांत झोप होत नाही. मधेच झोप चाळवली जाते. एकदा मधेच जाग आली की, नंतर तासभर झोप येत नाही. काही काही लोकांना तर मधेच बारा-एक वाजता जाग येते आणि नंतर पहाटेपर्यंत ते टक्क जागे राहतात. यावर काय इलाज करावा?  झोप कशी लागावी हे झोपेपूर्वीच्या तीन-चार तासातील घटनांवर अवलंबून असते. आपण संध्याकाळचे जेवण किती वाजता घेतो आणि दिवसातला शेवटचा चहा कधी घेतो यावर आपली झोप किती शांत असेल हे अवलंबून असते. त्यामुळे रात्रीचे जेवण झोपण्याच्या किमान दोन तास आधी केले पाहिजे.

म्हणजे उशीरात उशीरा साडे आठ वाजता जेवण संपले पाहिजे आणि अन्न पचनाची प्रक्रिया बरीचशी पूर्ण झालेली असली पाहिजे. अन्यथा नऊ साडेनऊ वाजता जेवण करून दहा वाजता झोपायला गेेलो तर पोटात गडबड सुरू राहते आणि झोप शांत लागत नाही. त्याचबरोबर रात्रीचे जेवण हलके असावे, हेही आवश्यक आहे. रात्रीचा चहा कधी घ्यावा? दिवसातला शेवटचा चहा नऊ वाजता घ्यावा. उशीरात उशीरा नऊ वाजता घ्यावा. खरे म्हणजे संध्याकाळी सहा नंतर चहा, कॉफी असे उत्तेजक पेय पिऊच नये. कारण उत्तेजक पेयाने तरतरी येत असते आणि झोप उडत असते. म्हणून नाईलाज झाला तरच ङ्गार तर नऊ वाजता चहा घ्यावा. त्यानंतर चहा घेतल्यास दहा वाजता झोपच लागत नाही. तेव्हा खाण्या-पिण्याची पथ्ये पाळूनच झोपेची उत्तम आराधना करावी लागते आणि तरच आरोग्य चांगले राहते.

पूर्वी मनोरंजनाची साधने फारशी नव्हती. रात्रीच्या जेवणानंतर लोकांना झोपण्याशिवाय गत्यंतर नसायचे त्यामुळे लवकर उठून शारीरिक कष्टाची कामे केली जायची. खाण पान पण आरोग्यदायी असायचे. एकंदरीत उत्तम प्रकारे झोप पूर्ण व्हायची. पण हल्ली स्मार्टफोन ने अक्षरशः झोपेचा ‘केमिकल लोचा’ केला आहे. मोबाईल च्या स्क्रीन मधून निघणाऱ्या ब्लू लाईट डोळ्यावर पडल्यामुळे झोप येणारे हार्मोन्स स्त्रवू शकत नाहीत. परिणामी झोपेचे ‘खोबरे’ होते. रात्री झोपायच्या अर्धा तास आधीपासून कॉम्प्युटर किंवा मोबाईल चा वापर करणे थांबवावे. त्याऐवजी मन शांत करणारे आपल्या आवडीचे एखादे चांगले पुस्तक वाचावे, किंवा शांत संगीत ऐकावे. त्यामुळे शांत झोप लागण्यास मदत मिळते.

झोप आणि आरोग्य यांचा फार जवळचा संबंध आहे. अपुऱ्या झोपेमुळे शारीरिक आणि मानसिक अशा विविध समस्या जडतात. तसंच यामुळे आपली कार्यक्षमता आणि आरोग्य खालावते. प्रत्येकाला आपल्या वय, प्रकृतीनुसार आवश्यक असणाऱ्या झोपेचे प्रमाण कमी-अधिक आहे. आवश्यकतेनुसार झोप न मिळाल्यास त्याचे शरीरावर दुष्परिणाम होऊ लागतात. तर आज जाणून घेऊया कोणत्या वयात किती झोपेची आवश्यकता आहे.

व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने प्रत्येकाची एक झोपायची स्टाईल असते. काही जणांना ५ तास झोपले तरी फ्रेश वाटते तर काही जण १० तास झोप घेऊनही पेंगुळलेले दिसतात.  पण सध्याच्या धकाधकी आणि धावपळीमुळे लोकांची झोप पूर्ण होत नाही. यामुळे आरोग्यविषयक अनेक आजार होऊ शकतात. अमेरिकेच्या नॅशनल स्लीप फाऊंडेशनच्या संशोधनानुसार, वयानुसार प्रत्येकाला झोपेची आवश्यकता वेगवेगळी असते. म्हणून पुरेशी झोप झाल्याने तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकतात. या संशोधनानुसार, कोणत्या वयासाठी किती तास झोप आवश्यक आहे, हे जाणून घेऊया.

  • नवजात बाळ (३-११ महिने) – कमीत कमी १४-१५ तास.
  • १२-३५ महिन्यांचे बाळ- १२-१४ तास.
  • ३-६ वर्षांचे मुल- ११-१३ तास.
  • ६-१० वर्षांचे मुल- १०-११ तास.
  • ११-१८ वर्षात- ९:३० तास.
  • मध्यम वयात- ८ तास.
  • वृद्ध- ८ तास.

आता आपल्या लक्षात आलेच असेल कि आपल्याला किती झोपेची आवश्यकता आहे. त्यामुळे जर आपणास चांगले आरोग्य जपायचे असेल तर मात्र वरील शेड्युल प्रमाणे झोपायचा प्रयत्न करा आणि चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली मिळवा.