| | |

लिंबू पाण्याचे अधिक सेवन शरीरास करू शकते हानी; जाणून घ्या कारण आणि उपाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन। लिंबू पाणी हे अनेकांचे अत्यंत आवडते पेय आहे. मग कोणताही ऋतू असो लिंबू पानी तोह बनता है..! पण लिंबू पाण्याचे अत्याधिक सेवन शारीरिकदृष्ट्या अत्यंत हानिकारक आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का…? लिंबामध्ये सायट्रिक ऍसिडचे प्रमाण जास्त असते. हे ऍसिड शरीरासाठी काही प्रमाणात गरजेचे असले तरीही याची अधिक मात्रा निश्चितच त्रासदायक आणि हानी पोहोचवणारे ठरू शकते. नेमके कसे ते जाणून घेत पाहूया उपाय.

लिंबू पाण्याचे सेवन करून निश्चितच शरीराला थंडावा जाणवतो आणि तहान भागते. परंतु यामध्ये असलेले आम्ल मानवी शरीरातील हाडं विरघळवतात. यामुळे हाडं ठिसूळ होतात आणि कमकुवतदेखील. तसेच अनेकांना यामुळे मायग्रेनचा त्रास संभवतो. लिंबामध्ये आढळणाऱ्या ऍसिडच्या अंशीय घटकांमुळे पित्ताच्या त्रासांना उभारी येते. यामुळे ज्यांना मायग्रेनचा त्रास आधीपासूनच आहे त्यांची समस्या आणखी गंभीर होऊ शकते. यामुळे एकतर त्यांनी लिंबू पाण्याचे सेवन करणे टाळावे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावे.

अनेक लोकांना जड जेवण झाल्यानंतर लिंबूपाणी पिण्याची सवय असते.  जड जेवणानंतर लिंबू पाण्याच्या सेवनाने पोट हलके होते आणि आराम मिळतो, हे खरं आहे. मात्र लिंबाचे एक निश्चित प्रमाण ओलांडले गेले तर याचा उलटा परिणाम होऊ शकतो. लिंबात आढळणारे ऍसिड एका मात्रेपेक्षा अधिक पोटात गेले असता पोटदुखी आणि जळजळ यांसारख्या समस्या ओढवून आणते. यामुळे शक्यतो जेवण जड असल्यास लिंबाचा जेवणातच योग्य वापर करावा. यामुळे जेवण जडही होत नाही आणि ऍसिडचे अधिक सेवन टाळले जाते.

याचसोबत लिंबू पाण्याचा आणखी एक अपाय आहे. आपल्या दातांचे नुकसान. होय. लिंबाच्या पाण्याचे जास्त सेवन केल्याने दातदुखी आणि हिरड्या कमकुवत होण्याचा त्रास संभवतो. कारण हे पेय पितेवेळी त्याचा थेट आपल्या दातांशी आणि हिरड्यांशी संपर्क होतो आणि लिंबातील ऍसिड त्याच्या गुणधर्मानुसार सक्रिय होते. यामुळे एकतर स्ट्रॉंग लिंबू पाणी पिणे टाळा. शिवाय लिंबू पाणी करतानाच त्यात लिंबाचे कमी थेंब घाला किंवा मग ते पितेवेळी स्ट्रॉचा वापर करा.

हे लक्षात ठेवा: लिंबू पाणी कितीही चविष्ट असले तरीही जिभेवर ताबा आणि मनावर संयम ठेवा आणि त्याचे अत्याधिक सेवन टाळा. तसेच जेव्हा पोटात बिघाड असेल तेव्हाच लिंबाचे पाणी प्या. हे पाणी पितेवेळी त्यात काळे मीठ घाला. याने पोटाच्या समस्येला आराम मिळतो.