| | |

‘या’ पदार्थांचे अति सेवन देते वाढलेले पोट आणि खूप सारं फॅट; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकाल असे फार कमी लोक असतील ज्यांच्या पोटाचा घेर त्यांच्या नियंत्रणात आहे. कारण बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी यांमुळे पोट सुटणं फारच सर्वसामान्य बाब झाली आहे. वाटेल तेव्हा वाट्टेल ते खाणे आणि मग तेलकट, तिखट जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आरोग्याकडे दुर्लक्ष करणे या सवयी शरीरास चांगलेच नुकसान करतात. प्रामुख्याने अश्या पदार्थांचा पोटावर परिणाम होतो. पोटावरील अतिरिक्त चरबी इतकी वाढते कि काही दिवसांनी पोट खाली गळू लागते आणि मग ते कमी करण्यासाठी धडपड सुरु होते. पण हे कष्ट नंतर करण्यापेक्षा आधी तोंडावर ताबा ठेवला तर हरकत काय आहे? म्हणूनच आम्ही तुम्हाला ते पदार्थ सांगणार आहोत जे तुमच्या पोटाचा घेर वाढवण्यास अधिक कारणीभूत आहेत.

१) वडापाव – वडापाव हा असा पदार्थ आहे. जो कुणीही अगदी आवडीने खाईल. कारण वडापाव चवीने अत्यंत उत्कृष्ट असतो मात्र आरोग्यासाठी तितकाच निकृष्ट असते. अनेकदा काही लोक एकदा वडापाव खायला लागले की, एकामागोमाग एक, दोन, तीन, चार कितीही वडापाव आरामात खातात. पण मुळात वडापावमध्ये असलेला बटाटा आणि पाव हे दोन्ही पदार्थ पोट वाढवण्यासाठी जबाबदार असतात. आठवड्यातून एक वडापाव केवळ चवीसाठी खाणे आणि एकावेळी २ ते मनात येईल तितके वडापाव खाणे यामध्ये जमीन आणि आकाशाइतका फरक आहे. त्यात वडे तळलेले असतात त्यामुळे हृदयाचे नुकसान होते.

२) फ्रेंच फ्राईज – फ्रेंचफ्राईज हा असा पदार्थ आहे जो कोणत्याही वयोगटातील व्यक्ती समोर दिसताच खाऊन टाकेल. त्यात सोबत टोमॅटो केचअप मिळाला तर मग ताटात पाहायलाही काही उरणार नाही याची गॅरंटी. पण काही मोह गंभीर त्रास होण्याआधीच टाळलेले बरे नाही का? पण कितीही नाय, नो, नाही, नको, म्हटले तरीही हे खाण्याचा मोह कोणालाच आवरत नाही. पण या पदार्थाचे सतत आणि अतिसेवन केले तर स्थुलपणा वाढतो. त्यातील बटाटा आणि तेल अख्ख शरीर काबीज करत आणि स्थूलपणासोबत इतर आजारांनाही आमंत्रण देते.

३) बटर – भैय्या थोडा ज्यादा बटर देना। पावभाजी म्हटलं का एक्स्ट्रा बटर मागवून खायची अनेकांना सवय असते. पण बटरमध्ये विरघळलेला पाव आणि पावभाजीवर आलेला बटरचा तवंग पोटासाठी बरे नाही. कारण त्यामुळे पोट सुटते. बटरच्या अतिरिक्त सेवनामुळे पोट वाढते. शिवाय बटरमुळे पोट साफ होण्यास अडथळा येऊ शकतो.

४) नुडल्स – काही लोकांना काहीच मिनिटांत तयार होणारे नूडल्स खूपच आवडतात. म्हणून रोज दिवसातील २ मिनिटे काढून हे लोक नूडल्स बनवतात आणि खातात. पण हे इन्स्टंट नुडल्स मैद्यापासून तयार झालेले असतात आणि मैदा शरीरात चिकटून राहतो. त्यामुळे फॅट वाढते आणि वाढलेले फॅट व चरबी कालांतराने गळणाऱ्या पोटावर दिसते.

५) पिझ्झा – पिझ्झा हा असा पदार्थ आहे जो कितीही महाग असला तरी थोडं पेरिपेरीं आणि थोडं चिली फ्लेक्स टाकून टाकून चवीने मिचक्या मारत खाल्ला जातो. मात्र पिझ्झा मुळातच मैद्यापासून तयार केलेला असतो. त्यात मैदा शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतो. त्यामुळे पिझ्झा खाणे साहजिकच शरीरास अपायकारक ठरते.

६) शेवपुरी, रगडापेटीस, भेलपुरी चाट पदार्थ – चाटच्या सगळ्या पदार्थांमध्ये बटाट्याचा अधिक वापर केला जातो. शिवाय मैदाच्या पुऱ्या, शेव असे तळलेले विविध पदार्थ यात घातले जातात. काही जणांना अगदी रोज चाट खायची सवय असते. जणू चाट न खाता राहिल्याने यांना झोप आणि भूक दोन्ही नाही लागणार. लिंबू पिळलेले, मस्त चटक मटत चटणी घातलेले विविध चाट अनेकांचे जीव कि प्राणच. पण यांच्या नित्य सेवनामुळे शरीरातील फॅटसुद्धा अटक मटक करत पटकन वाढतो. तसे आठवड्यातून दोनदा चाट खाण्यास काहीच हरकत नाही. पण ते खाण्याचे योग्य प्रमाण असेल तर उत्तम.