| |

इअरफोनचा अतिवापर करू शकतो आरोग्यावर दुष्परिणाम; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। गाणी ऐकणे हा अनेकांचा छंद असतो. त्यामुळे एकदा का इअरफोन लावून गाणी ऐकायला लागलो कि मन उडू उडू होऊ लागत आणि कल्पनेत तर सगळेच डान्सिंग स्टार होऊ लागतात. कारण इअरफोन लावून गाणी ऐकण्याची मज्जाच काही और आहे. शिवाय कोणतही काम करताना आपण फोनवर बोलण्यासाठी इअरफोनचा अगदी सर्रास वापर करतो. पण मित्रांनो ती म्हण ऐकली आहात का? ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये. इथेही तसाच आहे. एखादी गोष्ट फायदेशीर आहे म्हणून तिचा अतिवापर आपल्यासाठी घातक ठरू शकते. इअरफोन निश्चित आपल्यासाठी सोयीस्कर आहे पण त्याच्या अति वापरामुळे दुष्परिणामदेखील खूप होतात. हेच दुष्परिणाम आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. खालीलप्रमाणे:-

१) कानात वेदना – इअरफोनचा अतिवापर तसेच कानात योग्यरित्या फिट न होणारा इअरफोन वापरल्यामुळे कानात वेदना निर्माण होतात. जे बहुतेकदा कानाच्या पडद्याचे दुखणे वाढवतात. यामुळे कानाच्या भोवतालच्या भागात असह्य वेदना निर्माण होतातच याचसोबत डोकेदेखील दुखू शकते.

२) कान सुन्न होतात – ज्या लोकांना मोबाईलचा व्हॉल्युम पूर्ण ठेवून गाणी ऐकायची सवय असते त्यांचे कधी कधी कान सुन्न पडतात. इतकाच काय तर त्यांची ऐकण्याची क्षमता काही काळासाठी सुन्न होते आणि पुन्हा सामान्य होते. हि सुन्नता आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकते आणि परिणामी बहिरेपण येऊ शकते.

३) कानाला संक्रमण होणे – इअरफोन आपल्या कानात हवेची ये-जा होण्यापासून रोखतो परिणामी कानाचे संक्रमण होऊ शकते. तसेच जेव्हा एकमेकांचे इअरफोन वापरले जातात, तेव्हा एका व्यक्तीच्या कानातील जीवाणू दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होतात आणि त्या व्यक्तीस कानाला गंभीर संक्रमण होते.

४) ऐकू न येणे – खूप जास्त आवाजामुळे नोडज इंड्युसड हिअरिंग लॉस (NIHL) हा आजार होतो आणि कानांची ऐकण्याची क्षमता हळू हळू नाहीशी होते. परिणामी बहिरेपण येते. हा आजार होण्यासाठी इअरफोन वापरण्याची सवयदेखील कारणीभूत ठरते.

५) चक्कर येणे – मर्यादेपेक्षा जास्त इअरफोन वापरला आणि त्याचा जास्त आवाज असेल तर कानावर ताण पडतो. परिणामी मेंदूच्या गतीवर परिणाम होऊन चक्कर येऊ शकते.

६) मेंदुवर परिणाम होतो – इअरफोनमुळे इलेक्ट्रोमॅग्नेटीक वेव्ह्स तयार होतात. या वेव्हस मेंदुवर परिणाम करतात. हाय डेसिबल आवाजामुळे कानातून मेंदूपर्यंत सिग्नल घेऊन जाणाऱ्या तंत्रिका तंतूपासून इन्सुलेशन मागे घेते. इतकेच काय तर कानाच्या संसर्गामुळेसुद्धा मेंदूवर परिणाम होतो.