| |

कितीही कंट्रोल केले तरीही फॅट्स वाढतात?; जाणून घ्या कारणे आणि उपाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन। जगातील सर्व समस्या एका बाजूला आणि लठ्ठपणा हि समस्या एका बाजूला. कारण एकदा लठ्ठपणा वाढला का मग कमी करताना नाकी नऊ येतात. दरम्यान आपण काय काय करतो. उपाशी राहतो, डाएट करतो, खाण्यापिण्यावर रोख, फक्त सलाड, टाईमटेबल, व्यायाम, योग, एरोबिक्स आणि अजून काय काय… बापरे! पण एवढं करूनही अनेकदा जाडी काही कमी होतच नाही. म्हणून लठ्ठपणा कमी करण्यासाठी वजन कमी करण्याच्या यंत्रावर लक्ष केंद्रित करू नका. कारण, झटपट वजन कमी करून लठ्ठपणा कमी करण्याचा प्रयत्न करणारे शरीरातील फॅट्स् कमी करून लठ्ठपणा कमी करीत नाहीत, तर शरीरातील पाणी कमी करून वजन घटवितात. यामुळे शरीराला विविध समस्यांचा सामना करावा लागतो.

० फॅट्स् म्हणजे काय?
– ऊर्जा मिळाल्याशिवाय कोणतेही काम होत नाही. आपल्या शरीराला विविध प्रकारची अंतर्गत आणि बाह्य स्वरूपाची कामे करण्यासाठी ऊर्जा लागतेच. हि ऊर्जा आपण खाल्लेल्या अन्नापासून मिळते. आपण अन्नाचे सेवन केल्यानंतर त्याचे पचन होते, तेव्हा त्यापासून ऊर्जा तयार केली जाते. त्यातील आवश्यक तेवढी ऊर्जा खर्च करून उर्वरित ऊर्जा साठवून ठेवण्याची आपल्या शरीरात खास सोय असते. या शिल्लक राहिलेल्या ऊर्जेचे फॅट्स्मध्ये रूपांतर होते आणि फॅट्स् साठवून ठेवले जातात. हे फॅट्स् शरीरात साठून राहणे म्हणजेच स्थूलपणा किंवा लठ्ठपणा वाढणे होय. आपल्या शरीरातील इतर पेशी, उत्ती, स्नायू आणि हाडे यांचा विचार केला तर त्यांच्या तुलनेत फॅट्सचे वजन खूप कमी असते.

वजन कमी करण्यासाठी शरीराची उपासमार केल्यास काही प्रमाणात चरबीचे वजन कमी होते. यामुळे हे फॅट्स् आपल्या शरीरात सर्व ठिकाणी त्वचेखाली साठतात. विशेषतः जिथे स्नायू जास्त असतात तिथे हे फॅट अधिक प्रमाणात साठवले जातात. जसे कि, पोट, नितंब, हनुवटीखालचा भाग, गळा, दंड, मांड्या, पोटऱ्या. त्यामुळे शरीराचा प्रमाणबद्ध आकार निघून जातो आणि शरीर बेढब दिसायला लागते. चला तर जाणून घेऊयात हे फॅट्स वाढण्याची नेमकी कारणे तरी काय? आणि हि कारणे जाणून घेतल्यानंतर त्यावर काम करू आणि सुदृढ शरीर आणि निरोगी आरोग्य मिळवू. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

० फॅट्स्/ चरबी वाढण्याची कारणे :-

१) मनावर ताण असेल वा चित्त समाधानी नसेल तर खाल्लेल्या अन्नाचं रूपांतर चरबीत होतं. अन्नाचे चरबीत रूपांतर करून ती आणीबाणीसाठी साठवून ठेवणे ही शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु यामुळे फॅट्सचे प्रमाण गरजेपेक्षा अधिक वाढते.

२) आहारात तेला – तुपाचा अतिरेक असणे.

३) गरजेपेक्षा जास्त खाणे.

४) एकाचवेळी खूप खाणे.

५) आहारात नेहमीच नको तितक्या गोड पदार्थांचा समावेश असणे.

६) व्यायामाच्या माध्यमातून मेद न जाळणे.

० शरीरात फॅट्स् चे प्रमाण योग्य राखण्यासाठी उपाय :-

१) मानसिक ताण- तणावावर नियंत्रण मिळवा.

२) आहारात तेलाचा आणि तुपाचा अतिरिक्त वापर टाळा.

३) शरीराच्या गरजेपेक्षा एक घासही अधिक खाऊ नका.

४) एकाचवेळी खूप खाण्यापेक्षा थोड्या थोड्या वेळाने थोडे – थोडे खा. दिवसभराच्या आहाराचे तुकडे करा.

५) गोड खा, पण आठवड्यातून एकदा आणि तेही अगदी प्रमाणात याचे भान ठेवा.

६) शरीरातील अतिरिक्त मेद जाळायचा असेल तर व्यायामाला पर्याय नाही.

७) याशिवाय शरीरातील केवळ पाणी कमी न होता, चरबी कमी कशी होईल. याकडे लक्ष द्या. अन्यथा वजन कमी करायच्या नादात आरोग्याचे नुकसान करून घ्याल.