| |

अचानक टाच का दुखते?; जाणून घ्या कारणे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। हल्ली सतत धावपळ, दगदगीचे जीवन यामुळे कितीतरी विविध त्रास संभवतात. यातील एक त्रास म्हणजे टाचदुखी. उभे असताना किंवा अगदी बसले असताना अचानक टाचा दुखणे हि तक्रार फारच सामान्य झाली आहे. मुळात टाचा दुखतात म्हणजे काय? टाच हा आपल्या शरीराचा असा महत्वाचा अवयव आहे ज्यावर आपण चालत असताना आपल्या शरीराचा संपूर्ण भार तोलला जातो. त्यामुळे जर टाचेत वेदना होत असतील तर काही पावले चालणे देखील मुश्किल होऊन जाते. टाचेचा खालचा भाग, कडा वा पाठीमागचा घोटा या ठिकाणी अगदी कळा जाणे. याशिवाय सतत दुखणे. यामुळे उभे राहताना, चालताना अडचण निर्माण होते. हि समस्या अगदी कुणालाही होऊ शकते. यासाठी कोणतेही विशेष वय नाही. कारण टाचा दुखण्याची अनेक कारणे आहेत. यातील प्रमुख कारण म्हणजे आरामदायक चप्पल किंवा बूट न वापरणे. तसेच संधिवात, इन्फेक्शन वा एखादी दुखापत, यांमुळे टाचा दुखतात. चला तर जाणून घेऊयात टाच दुखण्याची इतर कारणे खालीलप्रमाणे:-

१) प्लांटर फसायटीस – प्लांटर फॅसिया नावाचा एक जाड टिशू पायाच्या तळव्यात असतो. हा एका बाणासारखा असतो आणि तळव्याच्या गोल भागाला आधार देतो. त्याला सूज आल्याने वेदना होतात. ह्या आजाराला ‘प्लांटर फसायटीस’ म्हणतात. सकाळी उठल्यावर पहिलं पाऊल टेकवून उभं राहताना तीव्र वेदना होणे, हि या आजारातील प्रमुख तक्रार आहे. शिवाय दिवसभर टाच दुखते. प्लांटर फसायटीस अनेक कारणांमुळे होतो. हि कारणे खालीलप्रमाणे:-

० वय – साधारण ४० ते ६० वयोवर्ष असणाऱ्या व्यक्तींना हा त्रास जाणवतो. परंतु योग्य व आरामदायक चप्पल वा बूट न वापरण्यामुळे हल्ली हे वय कमी होत चालले आहे. परिणामी शालेय वयोगटातील मुलांनाही हा त्रास जाणवतो.

० तळव्याची रचना – तळव्याच्या रचनेमुळे चालताना टाचांवर पूर्ण शरीराचा भार येतो. काही लोकांमध्ये जन्मतःच पायाचा तळवा सपाट असतो किंवा जास्त गोलाकार असतो. अश्या लोकांना प्लांटर फसायटीस हा आजार होऊ शकतो.

० कामाचे स्वरूप – ज्या व्यक्तींना कामाकरिता खूप जास्त उभे रहावे लागते, अशा लोकांना हा त्रास जास्त होतो. शिक्षक, फॅक्टरीत काम करणारे कामगार, सुरक्षा रक्षक अशी कामे करणाऱ्या लोकांना प्रामुख्याने प्लांटर फसायटीस होतो. कारण त्यांना खूप वेळ उभे राहून काम करावे लागते. ज्यामुळे टाचांवर ताण येतो.

० स्थूलता – स्थूल अर्थात जाड व्यक्तींमध्ये प्लांटर फसायटीसचे प्रमाण जास्त आहे. कारण टाचांवर आपल्या शरीराचा भर राखला जातो. यामुळे जास्त वजन पायावर भार देते आणि हा त्रास उद्भवतो.

२) काल्कानीयल बोन लिजन्स – टाचेच्या हाडाला हिल बोन वा कॅल्कनेस म्हणतात. त्या हाडाला दुखापत झाल्यास टाचदुखी वाढते. उदा. फ्रॅक्चर

३) काल्कानीयल बरसिटीस – टाचेच्या मागच्या भागात फ्लूइडयुक्त पिशवी असते. तिला बर्सा म्हणतात. याला सूज आली तर टाचेच्या मागच्या भागात तीव्र वेदना होतात.

४) फॅट पॅड – टाचेच्या सर्वात खालच्या भागात एक फॅट पॅड म्हणजेच चरबीचे आवरण असते. यामुळे जमिनीवर टाच टेकवल्यावर होणाऱ्या आघातांची तीव्रता कमी होते. पण जर काही कारणामुळे ह्या आवरणास सूज आली तर टाचेत तीव्र वेदना होतात.

५) टाचेच्या हाडाची वाढ – हाडांजवळ कॅल्शियम साठून टाचेच्या हाडाची वाढ होते. या स्थितीला हिल्स स्पर म्हणतात. त्यामुळे टाच दुखी होते.

६) इतर कारणे – संधिवात, गाऊट, स्नायूंना दुखापत होणे ह्या कारणांमुळे टाच दुखते.