महाराष्ट्रातील पहिल्या फिरत्या एंडोस्कोपी रुग्णालयाचे आज लोकार्पण, नांदेडमधील अनोखा प्रयोग

हॅलो आरोग्य ऑनलाईन। एंडोस्कोपी करावी लागेल, असे डाॅक्टरांनी सांगितले तर सर्वसामान्यांच्या डोक्यात पहिला विचार येतो तो म्हणजे किती खर्च येईल..? आपल्याला स्वस्त एंडोस्कोपी कुठे करुन मिळेल याची माहिती अनेकजण काढतात, मात्र हाती निराशाच येते. शेवटी लांबचा प्रवास करुन पैसे खर्च करुन ही एंडोस्कोपी काहीजण करतात. तर काहींना पैशांअभावी ती करताच येत नाही. या पार्श्वभूमीवर नांदेड येथील एका डाॅक्टरांनी फिरते एंडोस्कोपी रुग्णालय सुरु केले आहे.

‘कोरोना होऊन गेल्यानंतर मला आयुष्याचं खरं मर्म कळालं’, असं म्हणत खेड्यापाड्यांतील गोरगरिबांना आरोग्याची सुविधा पुरवता यावी म्हणुन डाॅ. नितिन जोशी यांनी महाराष्ट्रातील पहिले तर देशातील तिसरे फिरते एंडोस्कोपी रुग्णालय सुरु केले आहे. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला याचे काम सुरु झाले होते. आज जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून गॅलॅक्सी हेल्थकेअर फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नांदेड येथे फिरते एंडोस्कोपी रुग्णालय याचा लोकार्पण सोहळा पार पडत आहे.

‘एंडो’ म्हणजे आत आणि ‘स्कोपी’ म्हणजे पाहणे. एखाद्या अवयवाच्या आत जाऊन परीक्षण करण्याच्या तंत्रास ‘एंडोस्कोपी’ म्हणतात. वैद्यकीय भाषेत सांगायचे झाले, तर ही एक नॉन- सर्जिकल प्रक्रिया आहे. ज्यामध्ये डॉक्टर विशेष उपकरणे वापरून रुग्णाच्या शरीरातील अंतर्गत अवयव पाहतात आणि त्यांच्यावर उपचार करतात. एंडोस्कोप एक लांबलचक, पातळ अशी ट्यूब असते. ज्याच्या एका बाजूला लाईट आणि दुसऱ्या बाजूला कॅमेरा असतो. या कॅमेराच्या सहाय्याने शरीराच्या आतील भागांचे परीक्षण करून त्याचे फोटोदेखील संगणकावर पाहता येतात. करंगळीपेक्षा लहान आकाराच्या दुर्बिणीच्या सहाय्याने आतड्यांची तपासणी व विविध आजारांचे उपचार केले जातात.

एंडोस्कोपीचा फायदा म्हणजे एंडोस्कोपी पद्धतीच्या ऑपरेशनमध्ये २ ते ३ छिद्रांमधून ऑपरेशन करण्यात येते. यामुळे रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर वेदना कमी होतात. तसेच पोटावर शस्त्रक्रियेचे डाग राहत नाही. मात्र अनेकदा हे ऑपरेशन करण्यासाठी मोठमोठ्या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात फि आकारल्या जातात. यामुळे ग्रामीण भागातील लोक आजही अश्या सुविधांपासून वंचित आहेत. म्हणूनच गॅलॅक्सी हेल्थकेअर फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नांदेड येथे फिरते एंडोस्कोपी रुग्णालय सुरु करण्यात आले आहे. ग्रामीण भागातही वैद्यकीय सुविधांची पूर्तता व्हावी आणि कुणीही या सुविधांपासून वंचित राहू नये असा यामागील हेतू आहे.

आज जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने या फिरत्या एंडोस्कोपी रुग्णालयाचे पदमभूषण डॉ. डी. नागेश्वर रेड्डी यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचे योजिले आहे. हि संकल्पना डॉ. नितीन जोशी यांची असून हे रुग्णालयात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पहिले तर देशातील तिसरे एंडोस्कोपी रुग्णालय आहे. चला तर जाणून घेऊया या फिरत्या एंडोस्कोपी रुग्णालयाच्या माध्यमातून कोणकोणत्या सुविधा पुरविण्यात येत आहेत.

० फिरत्या एंडोस्कोपी रुग्णालय व्हॅनमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा:

१. तोंडाद्वारे आणि गुदद्वारातून केली जाणारी दुर्बिण तपासणीचे अद्यावत एअर कंडिशन्ड शस्त्रक्रिया गृह आणि ऑलिंपस एन.बी. आय सिस्टम (Olympus NBI 170 endoscopes)

२. रक्त तपासणीसाठीची अद्ययावत स्वयंचलित उपकरणे.

३. एका बेडचा अतिदक्षता विभाग

५. डिफिब्रिलेटर

४. व्हेंटिलेटर

६. ईसीजी मशिन

७. व्हॅनमधून गॅलक्सी रुग्णालयात ऑनलाईन लाईव्ह एंडोस्कोपी रिले सुविधा.

० फिरते एंडोस्कोपी रुग्णालय कश्यासाठी..?

१) तरुण वयात पचन संस्थेच्या कँन्सरमुळे होणारे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. हे कमी करून जनसामान्यांचे जीवनमान वाढविण्यासाठी हि सुविधा अत्यंत आवश्यक आहे.

२) तसेच सामान्य जनतेमध्ये पचनसंस्थेच्या कॅन्सरच्या गाठींचे (तोंड, अन्ननलिका, जठर, लहान आतड्याचा सुरवातीचा भाग आणि मोठे आतडे) शेवटच्या निदान झाल्यामुळे उपचार करणे अवघड होते. मात्र एंडोस्कोपीच्या माध्यमातून या आजारांच्या गाठींचे निदान प्राथमिक अवस्थेतच (पहिल्या किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या टप्प्यातच) मिळेल. यामुळे लवकर उपचार सुरु होऊन आयुष्यमान वाढवता येईल.