| | |

मैद्याचे पदार्थ चवीने खाता, पण आरोग्याला होतोय याचाच धोका; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकाल बदलत्या जीवनपद्धतीत आपले राहणीमान आणि खाणेपिणे दोन्ही बदलून गेले आहे. घरातील जेवण कितीही पौष्टिक आणि चविष्ट असले जिभेचे चोचले आपल्याला जंक फूडकडे ओडून ओढून नेते. प्रामुख्याने जंक फूडमध्ये मैद्याचे प्रमाण जास्त असते आणि हे असे पदार्थ वारंवार खाल्ल्याने वजनात वाढ होऊ लागते. शरीरावर अनावश्यक चरबी साठते. अंगी लठ्ठपणा येतो. इतकेच नव्हे, तर यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाणदेखील प्रचंड वाढते. परिणामी विविध आजारांना साहजिकच निमंत्रण दिले जाते. म्हणूनच मैद्याचे पदार्थ कितीही चविष्ट असले तरीही ते खाण्यावर काही निर्बंध असणे अत्यावश्यक आहे. चला तर जाणून घेऊयात मैद्याच्या अति सेवनामुळे होणारे घटक परिणाम:-

१) फूड ऍलर्जी – मैद्यामध्ये ग्लूटन समाविष्ट असते. ते फूड शरीरात ऍलर्जी तयार करते. शिवाय ग्लूटन जेवणाला लवचिक करून त्याला मऊ स्वरूप देते. याचे दुष्परिणाम शरीराला भोगावे लागतात. तेच गव्हाच्या पिठात मोठ्या प्रमाणात फायबर आणि प्रोटिन असते. जे शरीरास उपयुक्त असते आणि मैद्यात या दोन्ही बाबी समाविष्ट नसतात.

२) रक्तातील साखरेत वाढ – मैद्याच्या सेवनामुळे रक्तातील साखर वाढते. यामुळे रक्तात ग्लुकोजचे गोळे होऊ लागतात. परिणामी शरीरात केमिकल रिअॅक्शन होते आणि कॅटरॅक्टपासून हृदयासंबंधित कोणताही आजार ओढावू शकतो.

३) हृदयाला धोका – मैदा रक्तातील साखर अतिशय प्रमाणात वाढवते. यामुळे रक्तात ग्लुकोजचे गोळे तयार होतात आणि हृदयाच्या समस्यांमध्ये वाढ होते. शिवाय मैद्याचे अतिसेवन ट्राय ग्लिसराईड आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवते आणि यामुळेही हृदयाला धोका निर्माण होण्याची शक्यता तीव्र असते.

४) हाडे ठिसूळ व कमकुवत होतात – मैद्याचे अतिरिक्त सेवन आपल्या हाडांसाठी अतिशय घटक असते. कारण मैद्यातील ग्लुटन हाडांवर विपरीत परिणाम करत असतो. मैदा तयार करताना त्यातील प्रोटीन काढले जाते. यामुळे मैदा निव्वळ ऍसिडीक होऊन हाडातील कॅल्शियम शोषून घेतो. परिणामी हाडे ठिसूळ आणि कमकुवत होण्याची शक्यता वाढते. यामुळे उत्तर वयात अधिक त्रास संभवतो.

५) कॅल्शियमची कमतरता – मैदा तयार करताना त्यातील प्रोटिन काढल्याने मैदा अॅसिडिक होतो. त्याचा परिणाम थेट आपल्या कार्यप्रणालीवर आणि हाडांवर होतो. यात हाडांतील कॅल्शियम मैदा शोषून घेतो आणि त्यामुळे सांधेदुखी सारखे त्रास बळावतात.

६) पीएच स्तर खालावतो – शरीर स्वास्थ्याचा पीएच स्तर ७.४ असला पाहिजे, असे डॉक्टर सांगतात. मात्र मैद्याच्या अति सेवनामुळे शरीरात अॅसिड तयार होते. यामुळे शरीरात कॅल्शिअमची कमतरता जाणवते. हाड कमकुवत होतात. पोटाच्या समस्या वाढतात. हृदय विकार होण्याची शक्यता बळावते. परिणामी शरीर स्वास्थ्याचा पीएच स्थर खालावतो.

७) पोटाच्या समस्या – मैदा पोटासाठी अत्यंत वाईट असतो. कारण मैद्यात फायबर असते आणि फायबरचे अधिक सेवन केल्यामुळे पोटाच्या नसा फुगतात.
परिणामी पोटाशी संबंधित आजार होतात. शिवाय पोट नीट साफ होत नाही. यामुळे अस्वस्थता निर्माण होते.

८) रोगप्रतिकारक शक्ती कमी होते – मैदा नियमित खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होते. परिणामी विविध आजार शरीराला ग्रासतात आणि वारंवार आजारपणाची शक्यता बळावते.

९) इतर आजार – मैद्याच्या अतिरिक्त सेवनामुळे अपचन, गॅसेस, मळमळ, पित्त, रक्तदाब, मधुमेह, प्रतिकार शक्ती कमी होणे, पोटाचे विकार, हृदय विकार अशा समस्या निर्माण होण्याची शक्यता बळावते.