| | |

जमिनीवर मांडी घालून बसा आणि निवांत जेवा, कारण…; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन| एक काळ होता जेव्हा शेणाने सारवलेली जमीन आणि त्यावर मांडलेल्या आसनावर मांडी घालून खाली बसून पाचही बोटांचा वापर करून जेवले जायचे. आता तुम्ही म्हणाल, आता त्यात काय एवढे? तेव्हा डायनिंग टेबल नव्हत आणि चमचेसुद्धा नव्हते म्हणून ते खाली बसायचे आणि हाताने जेवायचे. आता असे विचार असणाऱ्या व्यक्तीची कीव करावी का काय असा प्रश्न उभा राहतो.. कारण माणूस प्रगत झाला आधुनिक वस्तूंचा वापर करू लागला म्हणून या गोष्टींचा वापर वाढला. पण विज्ञान आणि परंपरा यांच्यातील मध्य हा आरोग्याशी संबंध ठेवणारा असल्यामुळे काही गोष्टी आजही मानणे गरजेचे आहे.

शतकानुशतके भारतात आजही अनेक राज्यांत ठिकठिकाणी अश्याच पद्धतीने जेवण करण्याची पद्धत आहे. याचे कारण म्हणजे या पद्धतीने जेवणाचे आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतात. अपचन दूर होते, रक्ताभिसरण चांगले होते. शिवाय ह्रदयाच्या आरोग्यासाठीदेखील ही पद्धती उपयुक्त आहे. विश्वास बसत नाही? चला तर सखोल फायदे जाणून घेऊया खालीलप्रमाणे:-

१) पचनक्रिया सुरळीत होते.
– जेव्हा आपण जमिनीवर बसून जेवतो तेव्हा आपण ताटाकडे वाकून जेवतो. जेवणाचा एक एक घास घेण्यासाठी पुढे वाकणे आणि मग परत मागे होणे या पद्धतीने आपण जेवण करतो. या स्थितीमुळे पोटाच्या स्नायूंना सतत कार्यरत रहा लागते. परिणामी पचनक्रिया उत्तमरित्या सुरळीत पार पडते. शिवाय आपण खात असलेल्या प्रत्येक पदार्थाचा शरीराला पूर्ण फायदा मिळतो.

२) रक्ताभिसरण सुव्यवस्थित होते.
– जमिनीवर बसून जेवल्याने रक्ताभिसरणाची क्रिया अतिशय व्यवस्थितपणे पार पडते यामुळे रक्तवाहिन्या आणि नसांमधील ताण कमी होतो. परिणामी ह्रदय रोगाच्या रुग्णांसाठी अश्या पद्धतीने जेवणे फायदेशीर ठरते.

३) शरीराची रचना चांगली राहते
जमिनीवर बसून जेवल्याने बॉडी-पॉश्चर म्हणजे शरीराची रचना व्यवस्थित राहते. यामुळे स्नायूंना बळकटी मिळते. त्याचबरोबर जमिनीवर बसून जेवल्याने शरीरातील रक्ताभिसरणदेखील उत्तम राहते. यामुळे ह्रदयावर कमी ताण येतो आणि ह्रदयाला कमी मेहनत करावी लागते.

४) ताण तणाव दूर होतो.
– जमिनीवर बसून जेवताना एका पायाला दुसऱ्या पायावर ठेवून बसावे लागते. ही एक प्रकारची आसनमुद्रा आहे. सुखासन वा पद्मासनाच्या या मुद्रेमुळे आपली एकाग्रता वाढते आणि मानसिक तणाव दूर होतो. त्यामुळे याच पद्धतीने जर जमिनीवर बैठक मारून भोजन केले तर याचा फायदा पचन क्रियेसोबत, स्नायू, रक्तवाहिन्या, पेशी आणि मेंदुलाही होतो.

५) सांधेदुखीपासून आराम
– जमिनीवर बसून जेवल्यामुळे गुडघ्यांनादेखील व्यायाम होतो. कारण बसताना आपल्याला गुडघे मोडून बसावे लागते. परिणामी सांध्यांमधील लवचिकता आणि वंगण चांगले राहते. यामुळे सांध्यांच्या दुखण्यापासून आराम मिळतो.

६) वजन नियंत्रणात राहते – जेवताना आपण ज्या स्थितीत बसतो ते एक प्रकारचे बैठे आसन असते. याला पद्मासन वा सुखासन म्हणतात. यामुळे पाचन क्रिया सुधारतेच. शिवाय अतिरिक्त खाण्यावर ताबा मिळवता येतो. यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.