Dal In Pressure Cooker
| |

कुकरमध्ये डाळ शिजवताना त्याच पाणी निघून जात असेल तर ‘या’ स्टेप्स फॉलो करा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन| आपल्या आहार पद्धतीत दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात डाळ हा पदार्थ असतोच. याचे कारण म्हणजे डाळीमध्ये भरपूर पोषक घटक असतात जे आपल्या आहारातून आपल्या शरीराला मिळतात. डाळीच्या पाण्यामध्ये असणारे पोषक घटक हे शरीराच्या वाढीसाठी आणि मेंदूच्या विकासासाठी आवश्यक असतात. आता प्रत्येकाची डाळ शिजवण्याची पद्धत वेगवेगळी असते. यात काहीजण थेट भांड्यामध्ये डाळ शिजवताना तर काहीजण कुकरमध्ये. यातील कुकरमध्ये डाळ शिजवण्याची हमखास तक्रार म्हणजे डाळीचे पाणी कुकरबाहेर गळून जाते आणि डाळ कोरडी होते. यामुळे डाळीमध्ये पाणीच उरत नाही. तर मैत्रिणींनो आज आम्ही तुमच्या याच चिंतेचे निरसन घेऊन आलो आहोत. आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. या टीप्स तुमची डाळ कोरडी आणि बेचव होऊ देणार नाहीत.

० कुकरमधून डाळ बाहेर येण्याची कारणे काय?

कुकरमध्ये जास्त डाळ किंवा जास्त पाणी भरले की ती डाळीत मिसळते आणि शिट्टीवाटे जास्तीचे पाणी बाहेर येते.

साधारणपणे असे तेव्हा होते जेव्हा तुम्ही लहान कुकरसाठी मोठा गॅस बर्नर वापरता.

याशिवाय मोठ्या आचेवर डाळ शिजवली तरीही असे होते.

तसेच कुकरमधून जबरदस्तीने प्रेशर बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तरीदेखील डाळीचे पौष्टिक पाणी प्रेशरने बाहेर येऊ शकते.

० कुकरमध्ये डाळ शिजवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या अगदी स्टेप बाय स्टेप खालीलप्रमाणे:-

स्टेप १ –

मैत्रिणींनो डाळ कोणतीही असो, कुकरमध्ये शिजवण्यापूर्वी ती साधारण ३० मिनिटे पाण्यात भिजवा. यामुळे डाळ फुगते आणि चांगली शिजते. आता खूपच घाई असेल, तर डाळ शिजवण्यापूर्वी १५ मिनिटे गरम पाण्यात भिजवून घेतली तरीही चालेल.

स्टेप २ –

भिजवलेली डाळ कुकरमध्ये शिजवताना डाळीच्या प्रमाणानुसार पाणी घाला. पाण्याचे प्रमाण अर्धी वाटी डाळ असेल तर फक्त १ वाटी पाणी असे घ्या.

स्टेप ३ –

कुकरमध्ये डाळ शिजायला ठेवताना डाळीत मीठ, हळद आणि १/२ चमचा तेल वा तूप घाला. यामुळे डाळ लवकर शिजते आणि तेलकटपणामुळे ती कुकरला चिकटत नाही.

स्टेप ४ –

कुकरमध्ये डाळ घातल्यानंतर कुकरचे झाकण घट्ट बंद करा. कुकरमध्ये प्रेशर योग्य प्रकारे तयार होत असल्याची खात्री करून घ्या आणि गॅसची आच मंद ठेवा.

स्टेप ५ –

मैत्रिणींनो डाळ शिजवण्यापूर्वी भिजवली असेल तर एका शिट्टीत तुम्हाला हवी तशी मऊ डाळ आणि डाळीचे पाणी मिळेल. त्यामुळे एका शिट्टीनंतर गॅस बंद करा आणि कुकरमधून हवा निघून गेली की त्याचे झाकण उघडा.

स्टेप ६ –

आता तुमच्या आवडीनुसार राई, जीरं, हिंग, मीठ, लसूण, कांदा घालून छान फोडणी द्या. डाळ उकळल्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.

० महत्वाचे – लहान मुलांना नुसत्या शिजवलेल्या डाळीचे पाणी प्यायला द्या. यामुळे मुलांच्या मेंदूचा विकास व्यवस्थित होतो. शिवाय त्यांचे पोट बराच वेळ भरलेले असल्यामुळे मूल चिडचिड करत नाहीत.