| | |

अस्सल नैसर्गिक गोडव्यासाठी मिठाईत साखरेऐवजी ‘हे’ पदार्थ वापरा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। नुकतीच दिवाळी मोठ्या उत्साहात पार पडली. नेहमीप्रमाणे सगळ्यांनीच दिवाळीच्या चार दिवसात मनसोक्त मिठाईचा आस्वाद घेतला असेल. पण आता या मिठाईमुळे वाढणारे वजन आणि इतर त्रास रोखायचे असतील तर खूप पळा, घाम गाळा हे असं काहीतरी करावं लागणार. पण मिठाई जर नैसर्गिक गोडवा देणारी असेल तर? तर काय? मिठाई खाल्ल्यानंतर का खाल्ली याचा पश्चाताप होणार नाही. कारण आज आम्ही तुम्हाला मिठाईतला गोडवा जपणारे असे काही पदार्थ सांगणार आहोत जे मिठाई बनवताना वापरले तर साखरेची गरजच भासणार नाही.

मिठाई खायला सगळ्यांनाच आवडते, पण जास्त गोड खाल्ल्याने वजन वाढण्याचा धोका असतो. त्याचबरोबर अनेकांना जास्त साखर खाल्ल्याने त्वचेची ऍलर्जी देखील होते. अशा वेळी मिठाईमध्ये साखरेऐवजी दुसरा पर्याय काय? असा प्रश्न पडतो. तर याच प्रश्नाचे उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. जाणून घ्या खालीलप्रमाणे :-

१) गूळ – गूळ हा साखरेसाठी उत्तम आणि तितकाच आरोग्यदायी पर्याय आहे. यामुळे मिठाई असो किंवा चहा बनवण्यासाठी साखरेला गूळ हा सुयोग्य पर्याय आहे. कारण यात लोह आणि फ्लोरिन भरपूर प्रमाणात असते. याशिवाय अनेक प्रकारच्या जीवनसत्त्वे आणि खनिजांचा गुळ खूप चांगला स्रोत आहे. यामुळे वजन कमी होण्यासाठीऊ देखील सहाय्य होते.

२) मध – मध निश्चितच साखरेसाठी नैसर्गिक असा निरोगी पर्याय आहे. कारण मधात कॅलरी जास्त असल्या तरी साखरेपेक्षा त्याचे ग्लायसेमिक इंडेक्स (GI) मूल्य कमी आहे. त्यामुळे रक्तातील साखर लवकर वाढत नाही. याशिवाय मधामध्ये कार्बोहायड्रेट्स, रिबोफ्लेविन, नियासिन, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन सी आणि अमिनो अॅसिड देखील आढळते.

३) नारळाची साखर – नारळातूनही साखर काढली जाते. या साखरेमध्ये नैसर्गिक गुणधर्मांसह लोह, झिंक, कॅल्शियम, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखे पोषक घटक असतात. यामुळे हि साखर नक्कीच पौष्टिकतेने परिपूर्ण आहे.

४) खजूर – खजुरात नैसर्गिक साखर समाविष्ट असते. सरासरी, एका मध्यम आकाराच्या खजुराच्या फळात साधारण ६ ग्रॅम साखर असते. परंतु ती फायबरने देखील भरलेली असते. या खजूरमध्ये फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर, तांबे आणि सेलेनियम यांसारख्या अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे साखरेला खजूर हा एक उत्तम पर्याय मानायला हरकत नाही.