|

मूळव्याध/पाइल्स पासून मुक्ती!!! प्रथम जाणून घ्या लक्षणे आणि कारणे (पूर्वार्ध)

हॅलो आरोग्य ऑनलाईन : असे म्हणतात कि सगळी दुखणी एका आणि मुळव्याधाचे दुखणे एका बाजूला. मुळव्याध हा रुग्णाला अंतर्बाह्य त्रास होणारा आजार आहे. आवडीचे पदार्थ इच्छा असूनही खाता येत नाहीत. प्रत्येकवेळी हे खाल्ल्यावर मग मला ‘त्याचा’ त्रास किती होईल हाच विचार करण्यात वेळ जातो. त्यामुळे  मुळव्याधाचा रुग्ण प्रचंड मानसिक तणावाखाली असतो. मुळव्याधामुळे रूग्ण बेजार मेटाकुटीला आलेला असतो.  कारण याची लक्षणे सुरूवातीला जाणवत नाहीत. शिवाय अवघड जागेवर असलेल्या मुळव्याधीचे निदान आणि उपचार करण्यासाठी अनेकांना नेहमी संकोच वाटतो. या कारणामुळे बऱ्याचदा मुळव्याधीकडे दुर्लक्ष केले जाते. जेव्हा मुळव्याधीमुळे दैनंदिन काम करणं अथवा बसणं कठीण जाऊ लागतं तेव्हा यावर उपचार करण्याकडे भर दिला जातो. तोपर्यंत मुळव्याधीची समस्या अधिकच वाढलेली असते. यासाठी प्रत्येकाला मुळव्याधीविषयी माहीत असणं फारच गरजेचं आहे. कारण वेळेवर उपचार केल्यास मुळव्याधीपासून नक्कीच मुक्तता मिळू शकते. मुळव्याधीवर वैद्यकीय आणि घरगूती अशा दोन्ही प्रकारे उपचार केले जातात.

मूळव्याध म्हणजे काय? (What Is Piles In Marathi)

मुळव्याध हा गुदद्वाराच्या मुखावर होणारा एक विकार आहे. आयुर्वेदानुसार या विकाराची दोन प्रकारात विभागणी करता येऊ शकते. एका प्रकारात गुदद्वारावर मोडासारखा भाग येत असल्यामुळे त्याला मोड मुळव्याध असे म्हणतात. तर दुसऱ्या प्रकारात गुदद्वारातून रक्त येत असल्यामुळे त्याला रक्त मुळव्याध अथवा असे म्हणतात. मोड मुळव्याधीचे रूपांतर रक्त मुळव्याधीत होऊ शकते. गुदद्वाराजवळ काही महत्वाच्या रक्तवाहिन्या असतात. अयोग्य आहारामुळे आणि बैठ्या जीवनशेैलीमुळे या रक्तवाहिन्यांना सुज येते आणि त्यातून रक्त येऊ लागते. गुदद्वाराजवळ मुळव्याध होत असल्यामुळे बऱ्याचदा रूग्णाला आपल्याला मुळव्याधीचा त्रास होत आहे हे समजण्यास वेळ लागतो. शिवाय प्रत्येकाच्या मुळव्याधीचा आकार आणि प्रकार हा निरनिराळा असू शकतो. शिवाय गुदद्वाराच्या आत आणि बाहेर अशा दोन्ही बाजूने मुळव्याधी होऊ शकते. मुळव्याधीमुळे अती रक्तस्त्राव झाल्यास तुम्हाला अशक्तपणा येऊ शकतो. बऱ्याचदा यामुळे इनफेक्शन होण्याचा धोकाही वाढतो. जर गुदद्वाराजवळ भेगा पडल्या असतील तर त्याला भगंदर अथवा फिशर असं म्हणतात. भगंदरच्या वेदना आणि दाह असह्य असतो. मुळव्याधीचा त्रास लहान मुलांना होत असेल तर त्याला रेक्टल प्रोलॅप्स असं म्हणतात. शौचाला त्रास झाल्यामुळे गुदद्वारीचे मांस बाहेर येण्याला रेक्टल प्रोलॅप्स असं म्हणतात.

मूळव्याधाची सर्वसाधारण लक्षणे (Symptoms Of Piles In Marathi)

  • शौचास त्रास होणे.
  • शौच बाहेर पडताना वेदना आणि रक्त येणे.
  • गुदद्वाराजवळ खाज येणे.
  • गुदद्वाराजवळील मांस बाहेर येणे.
  • बसण्यास त्रास होणे.

मुळव्याधीची कारणे (Causes Of Piles In Marathi)

बद्धकोष्ठता (Constipation)

जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर त्यामुळे मुळव्याध होण्याची शक्यता आधिक वाढते. पोट स्वच्छ न झाल्यास बद्धकोष्ठता होते. बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्या लोकांनी वेळेत या समस्येवर उपाय न केल्यास भविष्यात मुळव्याध होण्याची शक्यता अधिक वाढते. वेळेवर शौचास न जाणे किंवा संडासाची कळ किंवा आवेग रोखून धरणे यामुळे बद्धकोष्ठतेमुळे गुदद्वाराजवळील मळ कठीण होतो. ज्यामुळे तो सहज बाहेर येऊ न शकल्यामुळे गुदद्वाराजवळच्या रक्तवाहिन्या कमजोर होतात. कुथूंन शौच बाहेर काढण्याच्या प्रयत्नांमध्ये मुळव्याधीचा त्रास हळू हळू वाढतच जातो.

बैठी जीवनशैली (Sitting For Long Periods Of Time)

ऑफिसमध्ये अथवा घरी तासनतास बसून काम करणाऱ्या लोकांना मुळव्याध होण्याची शक्यता अधिक वाढते. एक तर बैठी जीवनशैली असलेल्या लोकांची शारीरिक हालचाल कमी असते शिवाय त्यातूनही जर ते कोणताही व्यायाम करत नसतील तर त्यांना अपचन, बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवू लागतो. ज्यामुळे पुढे मुळव्याध होण्याची शक्यता अधिक असते.

अयोग्य आहार (Inappropriate Diet)

फायबरयुक्त आहार हा पचनासाठी योग्य आहार आवश्यक असतो. फळे,हिरव्या पालेभाज्या यांचा समवेत जर आहारात असेल तर आतड्यात पचल्यानंतर राहिलेले घटक विनासायास बाहेर पडतात. त्यासाठी कष्ट करावे लागत नाही पण अती तेलकट, तिखट, मसालेदार आणि मीठाचे पदार्थ खाणे अथवा आहारात मैद्यापासून बनवलेले पदार्थ खाणे, अती प्रमाणात मांसाहार, अती चहा अथवा कॉफी घेणे यामुळे तुम्हाला मुळव्याध होऊ शकतो. पण अशा पदार्थांमुळे पचनक्रियेवर भार पडतो आणि अपचन होते. ज्याचे रूंपातर पुढे मुळव्याधीमध्ये होऊ शकते.

मद्यपान अथवा धूम्रपान (Drinking and Smoking)

मद्यपान अथवा धूम्रपानाची सवय नेहमीच घातक ठरते. जे लोक अती प्रमाणात व्यसन करतात त्यांचे शरीर लवकर डिहायड्रेट होते. मध्यपानावेळी स्टाटर म्हणून किंवा ‘चकणा’ म्हणून तेलकट, मैद्याच्या आणि अतिरिक्त मिठाच्या पदार्थाचे सेवन हे अनेकदा मुळव्याधाचे कारण ठरते. वेळीच जर लक्ष दिले नाही तर  पाईल्स होण्याची शक्यता देखील नक्कीच वाढते.

जागरण (Staying Up All The Night)

रात्रपाळी करणाऱ्या कामगारांना किंवा नियमित अती जागरण करणाऱ्यानां मुळव्याधाचा धोका वाढतो.  जागरणासाठी चहा चे सेवन केले जाते त्यामुळे पचनसंस्थेवर ताण पडल्यामुळे तुम्हाला पाईल्स होऊ शकतो. कारण जागरणाचा परिणाम तुमच्या शरीर आणि पचनक्रियेवर होत असतो.

फास्ट फूड आणि अवेळी जेवणे (Eating Unhealthy)

प्रत्येक मानवी शरीराचे एक बायोलॉजिकल घड्याळ कार्यरत असते. त्या त्या वेळेत तुम्हाला त्याच क्रिया करायची एकप्रकारे सवय लागलेली असते किंवा त्याचवेळी शरीर तुम्हाला अचूकतेने खान पान विषयी जाणीव करून देत असते पण तुम्ही याकडे कामामुळे जर वारंवार दुर्लक्ष करत असाल, तुम्ही नेहमी अवेळी जेवत असाल तर तुमच्या शरीराला अन्नाचे पचन करणे कठीण जाते. याचप्रमाणे फास्ट फूड रोजच्या आहारात समावेश जर करत असाल तर मात्र त्याची घटक हे आपली वाटचाल मुळव्याधीकडे घेऊन जातात. ज्यामुळे तुम्हाला भविष्यात पाईल्स अथवा मुळव्याध होऊ शकतो.

अनुवंशिकता (Heredity)

जर तुमच्या आई अथवा वडीलांना मुळव्याधीचा त्रास असेल किंवा घरातील वडीलधाऱ्या मंडळींना जर मुळव्याधाचा त्रास असेल तर आपण अधिक सतर्क राहायला हवे. कारण अनुवंशिकतेने तुम्हालाही मुळव्याधी होऊ शकते.

शिळे अन्न खाणे (Eating Stale Food)

शिळे अन्न पचायला जड जाते. पचन चांगले होण्यासाठी आणि निरोगी शरीरासाठी नेहमी ताजे अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र काही जणांना अन्न वाया जाऊ नये यासाठी शिळे अन्न खाण्याची सवयच लागलेली असते. शिळे अन्न सतत खाण्याने तुम्हाला  मुळव्याधीचा त्रास होऊ शकते.

गरोदरपणातील कालावधी (Pregnancy Period)

गरोदरपणात पोटाचा आकार वाढल्याने अपचन आणि बद्धकोष्ठता या समस्या वारंवार जाणवतात. जर गरोदरपणी तुम्ही अयोग्य आहार घेतला तर तुम्हाला त्यामुळे मुळव्याधीचा त्रास होऊ शकतो. शिवाय गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीनंतर गुदद्वारावर गर्भाचा ताण आल्यामुळेदेखील मुळव्याधीचा त्रास होण्याची शक्यता वाढते.  प्रसूतीदरम्यान बाळ बाहेर येण्यासाठी जोर लावला जातो अप्रत्यक्षरित्या त्यामुळे सुद्धा मूळव्याध होऊ शकते. अनेक महिलांना गरोदरपणात मुळव्याधाच्या समस्येला सामोरे जावे लागते. कारण गरोदरपणात शारीरिक हालचालींवर मर्यादा आलेल्या असतात. शिवाय आहारामध्ये तेलकट किंवा मद्याचे पदार्थाचे प्रमाण जर जास्त असेल तर मात्र मूळव्याध होण्याची शक्यता बळावते.

अती जुलाब (Chronic Diarrhea Or Constipation)

जुलाब आणि अतिसारामुळे तुम्हाला मुळव्याधीचा त्रास होऊ शकतो. कारण जुलाब अथवा अतिसाराच्या समस्येमुळे पोटातील पाणी शौचावाटे पूर्णपणे निघून जाते. ज्यामुळे तुम्ही डिहायड्रेट होता आणि गुदद्वाराचे मांस बाहेर येते. ज्यामुळे मुळव्याधीचा त्रास सुरू होतो.

अती वजन उचलणे (Heavy Weight Lifting)

जी माणसे अती वजन उचलण्याचं काम करतात त्यांच्या गुदद्वारावर ताण येतो. या ताणाचा परिणाम तुम्हाला मुळव्याध होण्यामध्ये होऊ शकतो.

सदरच्या  लेखात आपण मुळव्याधाची कारणे जाणून घेतली, पुढील लेखात त्यावरील उपचार माहिती करून घेणार आहोत. (पूर्वार्ध)