| |

आता उजळ त्वचा मिळविणे झाले सोप्पे; जाणून घ्या घरगुती उपाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन। बदलते जीवनमान आणि व्यस्त जीवनशैली यांमुळे आपल्याला आपल्या शरीराची व त्वचेची काळजी घ्यायला वेळच मिळत नाही. पण वेळ मिळत नाही हे आरोग्याची हेळसांड करण्यासाठीचे कारण नक्कीच असू शकत नाही. मुख्य म्हणजे एखाद्या सणासुदीला देखील जर आपला चेहरा निस्तेज आणि थकलेला दिसत असेल तर अनेकजण येऊन येऊन विचारतात कि बरे वाटत नाहीये का? मग उत्तर काय द्यायचं असा सवाल पडतो. म्हणूनच दिवसातून थोडा वेळ काढून आपल्या त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण सुंदर त्वचा आपला आत्मविश्वास वाढविण्यास देखील मदत करते. काळजी करू नका तुम्हाला यासाठी कोणत्याही पार्लरमध्ये जाऊन महागडे ट्रीटमेंट करा असे आम्ही तरी सांगणार नाही. हो पण असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत जे वापरल्यानंतर तुमचा चेहरा अगदी सहज उजळेल.

१) एलोवेरा जेल
– कामातील व्यग्रतेमुळे सकाळच्या वेळी आपली घाई असते पण रात्री? रात्री आपल्याकडे झोपण्याआधी किमान १० मिनिटे नक्कीच असतात. या वेळेत तुम्ही चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी कोरफड जेल किंवा ताज्या कोरफडीचा गर रात्री चेहऱ्यावर लावा आणि झोपा. यामुळे लगेच परिणाम दिसून येतो.

२) बर्फ आणि मॉइश्चरायजर
– रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर आइस क्यूब फिरवा आणि चेहरा तसाच ओला साधारण १० मिनिटांपर्यंत सोडा. यानंतर चेहरा धुवा आणि मॉइश्चरायझिंग क्रीम लावा. यामुळे चेहऱ्यावरील पुरळ आणि डाग निघून जातील.

३) फेस वॉश
– दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपला चेहरा स्वच्छ पाण्याने पूर्ण धुवा आणि चेहरा धुताना फेस वॉश वापर. फेस वॉशने आपला चेहरा किमान ५ मिनिटे रब करा. यानंतर, मॉइश्चरायझिंग क्रीम लाऊन झोपी जा. यामुळे चेहरा फ्रेश आणि स्वच्छ दिसेल.

४) रोझ वॉटर
– कुठूनही बाहेरुन आल्यावर आपला चेहरा स्वच्छ धुणे गरजेचे आहे. तसेच अख्ख्या दिवसात शक्य असेल तेव्हा चेहरा स्वच्छ करावा. यासाठी स्प्रे बॉटलमध्ये रोझ वॉटर अर्थात गुलाब पाणी साध्या पाण्यात मिसळून भरून ठेवा. हि बॉटल आपल्या सोबत ठेवा आणि चेहरा स्वच्छ करताना चेहऱ्यावर स्प्रेचा वापर करा. असे केल्याने चेहऱ्यावरील ताजेपणा टिकून राहतो.

५) सनस्क्रीन क्रीम
– कोणत्याही ऋतूमध्ये चेहरा निस्तेज होऊ नये म्हणून घरातून बाहेर पडताना चेहऱ्यावर सनस्क्रीन क्रीम लावावी. तसेच चेहरा टॅन होऊ नये म्हणूनही हि क्रीम फायदेशीर आहे. याशिवाय चेहरा आणि हात पूर्णपणेझाकलेला असेल याची काळजी घ्या, म्हणजे चेहऱ्याला अति उन्हाचा त्रास होत नाही.

६) ऑलिव्ह ऑइल मसाज
– अंघोळीआधी संपूर्ण त्वचेवर ऑलिव्ह ऑइलने मसाज करावा. यानंतर १० मिनिटांनी अंघोळ केल्यामुळे त्वचेस एक नैसर्गिक चमक प्राप्त होते.

७) उटणे
– शक्यतो साबणापेक्षा उटण्याने अंघोळ करणे कधीही चांगले. कारण उटण्यामध्ये अनेको औषधी मिसळलेल्या असतात. ज्याचा त्वचेला लाभ होतो. तर यासाठी सलग आठवडाभर उटणे लावा. हे उटणे कोणत्याही दुकानातून खरेदी करण्याची गरज नाही. हे उताणे घरातल्या घरात तयार करा.
साहित्य :- ३ चमचे बेसन, १ चमचे मैदा, १/२ चमचा हळद, १/२ चमचा मलई, ३ केशरची पाने, १ चमचा ऑलिव्ह ऑइल, १/२ चमचा गोड तेल आणि गुलाब पाणी गरजेनुसार.
कृती :- वरील सर्व साहित्य एकमेकांमध्ये व्यवस्थित मिसळा. यानंतर, त्यात गुलाब पाणी घालून फेसपॅक प्रमाणे पातळ करा.
वापर :- हे उताणे फेसपॅकप्रमाणे त्वचेवर लावावे आणि किमान ५ ते ७ मिनिटांसाठी असेच ठेवावे. ते सुकल्यानंतर कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ करावी.

८) दही बेसन पॅक
– दही आणि बेसन एकत्र करून त्वचेवर लावल्यानं त्वचेचे टॅनिंग काढणे सोप्पे जाते. यासाठी
साहित्य :- १ चमचा दही आणि १ चमचा बेसन
कृती :- दही आणि बेसन एकमेकांत व्यवस्थित मिसळून घ्या आणि लगेच वापरा.
वापर :- हे मिश्रण चेहऱ्यावर लावून ठेवा आणि अगदी ५ मिनिटांत किंचित ओले असताना आपल्या हाताच्या बोटांनी घासून काढा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. याचा परिणाम अगदी आठवड्याभरातच जाणवतो.