| |

आपल्या लहान मुलांच्या हाती मोबाईल देताय? अतिवापरामुळे होऊ शकतो ‘या’ आजारांचा धोका !!!

हॅलो आरोग्य ऑनलाईन : कोरोना संपूर्ण दुनियाभरात अनेक उलथापालथ घडवून आणल्या आहेत. या महामारीने जगभरातील लाखो लोकांचा बळी घेतला. कोरोनाचा संसर्ग होत असल्याने अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम या संकल्पनेचा वापर करून कर्मचाऱ्यांकडून घरातूनच काम करून घेतले. त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रात कोरोनामुळे भूतो ना भविष्यती प्रकारचे बदल घडवून आणले. शाळेत जाऊन शिक्षण घेणे म्हणजे कोरोनाला स्वतःहून आमंत्रण दिल्यासारखे झाले. म्हणून झूम मिटिंग द्वारे शाळेचे वर्ग भरू लागले. परंतु नाण्याची दुसरी बाजू पण लक्षात घेणे गरजेचे आहे. ऑनलाईन क्लास झाल्यानंतर ब-याचदा लहान लहान मुलं तासनतास मोबाईलमध्ये घुसलेली असतात. हल्ली तर अभ्यास, मित्रमैत्रीणींसोबत संवाद आणि खेळ देखील मोबाईलमध्येच होतात. पण पालकांना हे माहित असणं फार गरजेचं आहे की मोबाईलच्या अतिवापराने मुलांना कोणते आजार होऊ शकतात आणि मोबाईल वापरणं किती धोकादायक आहे.
सध्याच्या मुलांना लहानपणापासून एक वेगळीच सवय लागते. त्यांच्या हातात मोबाईल असल्याशिवाय ते जेवायलाच बघत नाही. कार्टून बघत, गाणी बघत किंवा गेम खेळत जेवण करण्याची ही सवय अतिघातक आहे. अर्थात ही सवय लागण्याला पालक सुद्धा तितकेच जबाबदार असतात. लहान असताना तो जेवत नाही हे पाहून पालक त्याला मोबाईल दाखवून जेवण भरवायला सुरुवात करतात. तर मुलांना इथून पहिली मोबाईलची सवय लागते आणि मग पुढे पुढे जस जसे ते मोठे होत जातात ही सवय इतकी वाढते की त्या मुलांना मोबाईल शिवाय दुसरं काही सुचत नाही.

सतत २४ तास त्यांच्या हातात मोबाईल असतो. वेळीच पालकांनीही आवर न घातल्याने मूल सुद्धा मग ऐकून घेत नाही आणि नाईलाजाने पालकांना त्याचा हट्ट पुरवावा लागतो. पण मंडळी ही सवय अतिशय वाईट आहे. एवढ्या लहान वयात मोबाईलचा अतिवापर तुमच्या मुलाभोवती अनेक आजारांचा विळखा घालण्यास कारणीभूत ठरू शकतो. आज आम्ही तुम्हाला या विशेष लेखातून हेच सांगणार आहोत की असे काय आजार आहेत जे मोबाईलच्या अतिवापरामुळे तुमच्या मुलाला त्रस्त करू शकतात.

टीन टेंडोनाइटिस
जर मुलांना लहान वयातच मोबाईलची सवय लागली तर सगळ्यात पहिलं ते शिकतात मेसेज टाईप करायला. आपल्या आई वडिलांना पाहून त्यांना सुद्धा मेसेज पाठवण्याची सवय पडते. जस जसे मोठे होत जातात तस तशी चॅटिंगची सवय सुद्धा त्यांना लागते. पण यामुळे त्याला टीन टेंडोनाइटिस हा विकार होऊ शकतो. या विकाराला टीटीटी असेही म्हणतात. यात चुकीच्या स्थितीत बसून मोबाईल वापरल्याने बोटे, हात, पाठ आणि मानेत खूप वेदना होऊ शकतात. याला वेळीच आवर न घातल्यास पुढे अजून गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. याशिवाय यामुळे नजर सुद्धा प्रभावित होते.
तणाव.

पूर्ण दिवस फोनचा वापर केल्याने आणि सोशल मिडीयाच्या दुनियेत रमल्याने खऱ्या आयुष्यातले मित्र, खेळ यांच्या बाबतीत मुले दूर जाऊ लागतात. त्यांना आपले मोबाईलचे जग जास्त आवडू लागते. अनेक संशोधनातून हे दिसून आले आहे की मोबाईल जास्त वापरणाऱ्या मुलांमध्ये थकवा, ताण आणि तणाव मोठ्या प्रमाणावर असतो. काही प्रकरणांत तर यातून मानसिक आजार निर्माण झाल्याचे सुद्धा दिसून आले आहे. त्यामुळे हा धोका ओळखून आपल्या मुलाच्या मोबाईल वापरावर मर्यादा आणा.
झोप न येणे.

ही समस्या मोठ्यां माणसांना सुद्धा खूप सतावते आणि लहान मुलांना सुद्धा! अर्थात दोन्हीमध्ये मोबाईलचा अतिवापर हे कारण असते. सतत फोनवर असल्याने झोपेचे भान राहत नाही. हळूहळू झोपेची वेळ सुटते आणि कधीही रात्री अपरात्री झोप येते आणि सकाळी झोप पूर्ण सुद्धा होत नाही. मुलांना याचा मोठा फटका बसू शकतो. कारण झोप न आल्याने आणि ती पूर्ण न झाल्याने त्यांच्या शालेय जीवनावर मोठा परिणाम होऊ शकतो. मुलाची बौद्धिक क्षमता कमकुवत पडू शकते.
कॅन्सरचा धोका
आपला या गोष्टीवर विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे की मोबाईलच्या अतिवापरामुळे कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो. अनेक अभ्यासपूर्ण संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की मोबाईल फोन मधून निघणारी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडीएशन खूप काळ मोबाईलचा वापर केल्याने त्वचेतील उतीकांद्वारे शोषली जातात. लहान वयात या उतिका विकसित होत असतात, त्या तितक्या सक्षम नसतात. त्यामुळे या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडीएशनचा त्यांच्यावर मोठा परिणाम होऊन ब्रेन कॅन्सरचा धोका उद्भवतो.

सध्याचं युग हे सोशल मीडियाचं युग आहे आणि मुलं देखील त्यापासून दूर नाहीत. सोशल मीडियाचं जग जितकं मन रिफ्रेश करणारं आहे तितकंच ते चिंता वाढवणारं आहे. माझ्या फोटोला लाईक्स येत नाही. मी अजून कसा फेमस होऊ? माझा मित्र जास्त फेमस आहे. तो माझ्याशी बोलत नाही, ती माझ्याशी बोलत नाही. अशा अनेक गोष्टी मुलांच्या चिंता वाढवायला कारणीभूत ठरू शकतात आणि या चिंतेत अडकल्यावर डिप्रेशनमध्ये येऊन मुले काहीही करू शकतात. म्हणून त्यांच्या मोबाईलच्या अतिवापराला वेळीच आवर घाला आणि त्यांना सुरक्षित ठेवा.