| |

मुंबई महानगरपालिकेच्या हाती मोठं यश; प्रभावी लसीकरणामुळं कोरोनाचा प्रसार नियंत्रणात

हॅलो आरोग्य ऑनलाईन। गतवर्षापासून कोरोना नामक महाभयंकर विषाणूने प्रत्येकाच्याच जीवनमानावर मोठा परिणाम केला आहे. कोरोनामुळे अक्षरशः मानवी जीवन ठप्प होण्याच्या टोकावर असतानाच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लसीकरण मोहीम जरी करण्यात आली. कोरोना विषाणूची प्रतिबंध करणारी हि लसीकरण मोहीम सुरुवातील धीम्या गतीने सुरु होती मात्र आता या मोहिमेने चांगलाच वेग धारण केला आहे. मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक झपाट्याने वाढत होती. अश्यात लसीकरण हा जालीम ठरला आणि त्यानुसार, सर्वत्र लसीकरण केलं जात आहे. अशातच कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत १०० टक्के मुंबईकरांना पहिला डोस देण्याचे मोठे लक्ष्य मुंबई महानगर पालिकेने गाठलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी १३ नोव्हेंबर २०२१ च्या दुपारपर्यंत एकूण ९२ लाख ३९ हजार ९०२ नागरिकांनी पहिला डोस घेतल्याची नोंद ‘कोविन’ ॲपवर झाली आहे. तर ५९ लाख ८३ हजार ४५२ नागरिकांनी दोन्ही डोस घेतल्याची माहिती मिळत आहे. लस घेणाऱ्यांमध्ये मुंबईबाहेरील नागरिकांचादेखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे. मुंबईत १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या महामोहिमेला सुरुवात करण्यात आली. यासाठी १८ वयोवर्षावरील एकूण ९२ लाख ३६ हजार ५०० लाभार्थी आहेत.

पहिल्या टप्प्यात आरोग्यसेवक, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस देण्यात आली होती. यानंतर योजनापूर्वक ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेले, गर्भवती महिला, स्तनदा माता, अंथरुणाला खिळलेले रुग्ण अशा सर्वांचेच लसीकरण टप्प्याटप्प्याने आणि तितक्याच वेगाने सुरू करण्यात आले. या लसीकरण मोहिमेत पालिका आणि सरकारी केंद्रांबरोबरच खाजगी रुग्णालयांनीही मोठे योगदान दिले आहे. सप्टेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका वारंवार वर्तविण्यात येत होता. यामुळे नोव्हेंबर महिन्यापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य महापालिका प्रशासनाने ठेवले होते. मात्र मधल्या काळात लसींची उपलब्धी न झाल्यामुळे हि महालसीकरण मोहीम थंडावली होती. यामुळे संपूर्ण मुंबईकरांचे दोन्ही डोस आता जानेवारी २०२२ च्या अखेरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे, अशी माहिती मिळत आहे.

लसीकरण आकडेवारीनुसार माहिती खालीलप्रमाणे:-

० १८ वर्षांवरील एकूण लाभार्थी – ९२ लाख ३६ हजार ५००

० पहिला डोस घेणारे – ९२ लाख ३९ हजार ९०२ (मुंबईबाहेरील नागरिकांचाही मोठा समावेश)

० दुसरा डोस घेणारे – ५९ लाख ८३ हजार ४५२

० दुसरा डोस शिल्लक – ३२ लाख ५३ हजार ४८