| | | |

हिरवीगार कोथिंबीर प्रत्येक अवयवासाठी वरदान; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। कोणताही पदार्थ असो.. चव आणि सजावट हे दोन मुद्दे असतील तर कोथिंबीर शिवाय पर्यायच नाही. बघायला जालं तर बाजारात अगदी ५ रुपयांपासून ५० रुपयांपर्यंत कोथिंबीरीचा भाव केला जातो. पण हीच हिरवीगार कोथिंबीर आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे याबाबत आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. हिरव्यागार कोथिंबीरमध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, जीवनसत्त्वे ए, बी, सी आणि के मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळेच कोथिंबीर आणि धणे या दोन्हींचा वापर स्वयंपाकासाठी केला जातो. चला तर जाणून घेऊयात कोथिंबीर खाण्याचे फायदे खालीलप्रमाणे:-

१) रोग प्रतिकारक शक्तीत वाढ – आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी कोथिंबीर उपयुक्त आहे. खरं तर, कोथिंबीरीमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात जे की फ्री रॅडिकल्समुळे होणारे सेल्युलर डॅमेजला आळा घालतात.

२) हृदयरोगापासून बचाव – कोथिंबीर वा धणे हे एक मुत्रवर्धक औषध आहे. यामुळे त्याच्या सेवनाने शरीरातून अतिरिक्त सोडियम वा मीठ बाहेर फेकले जाते आणि रक्तदाब कमी होतो. परिणामी हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.

३) पचनक्रिया व आतड्यांची काळजी – कोथिंबिरीच्या बिया अर्थात धण्यांमुळे पचनक्रिया गतिमान होते आणि त्यामुळे सुलभ पचन होते. यामुळे पोटात दुखणे, सूज येणे, अस्वस्थता आणि वेदनांपासून लक्षणीय आराम मिळतो.

४) लिवरचे रक्षण – लिवरशी संबंधित समस्यांसाठी कोथिंबीर वा धणे खूप फायदेशीर आहेत. कारण कोथिंबीरीच्या पानांमध्ये अल्कलॉइड्स आणि फ्लेव्होनॉइड्स असतात जे पित्ताचे विकार आणि कावीळ हे आजार बरे करतात.

५) सूजेवर मात – सूज येण्याची समस्या ही हृदयरोगापासून अनेक प्रकारच्या समस्यांशी संबंधित आहे. यात कोथिंबीर सूज कमी करण्यासाठी खूप मदत करते. यासाठी तुम्ही कोथिंबिरीचा रस किंवा धन्याचे पाणी पिऊ शकता.