| | | |

सर्वगुण संपन्न ‘कडूलिंब’!!! आपणांस माहीत आहेत का त्याचे अविश्वसनीय फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन । चैत्र महिन्याची सुरुवात ज्या दिवशी होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. महाराष्ट्रामध्ये साजरा होणारा गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. असेही म्हणतात की गुढी ही सर्व वाईट शक्तींना आपल्यापासून दूर ठेवून आपल्या घरामध्ये सुख आणि समृद्धीला आमंत्रित करते.

गुढीपाडवा हा दिवस मराठी माणसांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी आपण आपल्या घराला सुंदर फुलांनी सजवतो, आंब्याच्या पानांचे तोरण घराभोवती बांधतो . गुढी उभारण्याची प्रथा ही फार प्राचीन आहे .महाराष्ट्रीयन लोकांसाठी गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात आहे. त्या दिवशी कडूलिंबाची पाने आणि गूळ खाण्याची प्रथा आहे. कडूलिंबाला आयुर्वेदामध्ये खूप महत्व आहे. मागील वर्षातील सर्व कडू गोष्टी संपवून नवीन वर्षाची सुरुवात गोडव्याने करावी असे प्रथा सांगते. अंघोळीच्या पाण्यात कडूलिंबाची पाने टाकून त्या पाण्याने अंघोळ करतात.

आपल्या देशात सर्वत्र कडूलिंब आढळतो. अनेक रोगांपासून दूर राहण्यासाठी सर्वात उत्तम आणि घरगुती उपाय म्हणजे कडुलिंब. याची पाने चवीला कडु असली तरी त्याचे फायदे अनेक आहेत. शरीरातील अंतर्गत व्याधींपासून त्वचेच्या आजारापर्यंत कडूलिंब सर्वत्र उपयोगी पडतो. जणू काही निसर्गानं कडुलिंब बनवलं ते माणसाला निरोगी ठेवण्यासाठीच. रोज कडूलिंबाची दोन कोवळी पान खाल्ली तर आपलं आरोग्य उत्तम राहिलं. याशिवाय कोणताही आजार होणार नाही.

कडुलिंब हे एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण झाड आहे. कडुलिंबाच्या झाडामध्ये 130 पेक्षा जास्त वेगवेगळ्या जैविक दृष्ट्या सक्रिय संयुगे आहेत.  कडुलिंबाचे अनेक आश्चर्यकारक औषधी फायदे आहेत, परंतु सर्वात महत्वाची एक बाब म्हणजे ते कर्करोगाच्या पेशी नष्ट करते. प्रत्येकाच्या शरीरात कर्करोगाच्या पेशी असतात, परंतु सामान्यत: त्या विस्कळीत अवस्थेत असतात. पण , तुम्ही शरीरात काही विशिष्ट परिस्थिती निर्माण केल्यास त्या संघटित होतात. जोपर्यंत या पेशी एकट्याने फिरत आहेत तोपर्यंत काही अडचण नाही. जर त्या सर्व एका ठिकाणी एकत्र जमल्या आणि त्यांचे संघटन झाले तर ही एक समस्या बनते. हे क्षुद्र गुन्हेगारीपासून संघटित गुन्हेगारीकडे वळण्यासारखे आहे. ही एक गंभीर समस्या आहे. जर तुम्ही दररोज कडुनिंबाचे सेवन केले तर ते शरीरात कर्करोगाच्या पेशींची संख्या एका मर्यादेच्या आत ठेवते, जेणेकरून ते तुमच्या शरीर व्यवस्थेच्या विरूद्ध जाऊ शकणार नाहीत.

काय आहेत कडूलिंबाचे फायदे

 1. पोटात जंत किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन होत असतं. सतत बाहेरचं आणि अवेळी खाण्यानं अशा समस्या उद्भवतात अशा वेळी कडुनिंबाची पाने खूप उपायकारी असतात. कडुनिंबाच्या पानाच्या रसामध्ये थोडे मध आणि काळी मिरी पावडर घालून घेतल्यास पोटाचे सर्व आजार बरे होतात.
 2. चेह-यावर पुळकुट्या येणं, चेहरा काळवंडणं यासारख्या समस्यांचा सामना प्रत्येकानं कधी ना कधी केलाच आहे. या समस्येतून सुटका करून घ्यायची असेल, तर अनेक जण सौंदर्यप्रसाधनांचा वापर करतात. पण प्रसाधनांचा अतिवापर केल्यामुळे त्वचेला हानी पोहोचण्याची शक्यता असते. पण आजीबाईच्या बटव्यामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्या वापरामुळे तुम्ही या समस्यांवर मात करू शकता. त्यापैकीच एक म्हणजे कडुनिंबाचा पाला.
 3. कडुलिंबामध्ये अँटीसेप्टिक गुण असल्यामुळे जर कडुलिंबाची सालं, पाने आणि फळं या सर्वांची पेस्ट करून जर चेहऱ्यावर लावली तर चेहऱ्यावर येणारे फोड, पुरळ यापासून मुक्तता मिळते.कडुनिंबाच्या पाल्यामध्ये अनेक उपयुक्त घटक आहेत. कडुनिंबाच्या वापरामुळे त्वचेसंदर्भातील अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.
 4. कडूनिंबामध्ये अँटी बॅक्टेरिअल हे गुणधर्म आहेत. कडुनिंबाचे हेच गुणधर्म त्वचेसाठी फायदेशीर असतात. त्यामुळे त्वचेसंदर्भातील कुठल्याही समस्येवर कडुनिंबाचा वापर करायला हवा. कडुलिंब कुठेही आणि केव्हाही उपलब्ध होतो. त्यामुळे दिलेल्या टिप्स अंमलात आणणं काही कठीण नाही.
 5. तरूण वयातील प्रत्येकानं एकदा तरी पिंपल्सचा सामना करावा लागला आहे. या पिंपल्समुळे चेहऱ्यावर डाग किंवा खड्डे निर्माण होतात. पण हे डाग दूर करायचे असल्यास कडुनिंबाची पानं आणि तुळशीची पाने एकत्र करून लेप तयार करावा. हा लेप गुलाब पाण्यात मिसळून याचा लेप चेहऱ्यावर लावावा. सुकल्यानंतर गार पाण्यानं चेहरा स्वच्छ धुवावा. कडुनिंबाची पानं बारीक करून दही आणि मुल्तानी मातीमध्ये मिसळून पेस्ट करावी यामुळे देखील चेहऱ्यावरील डाग कमी होतील.
 6. तुमची त्वचा कोरडी असेल तर अशा त्वचेसाठी कडूनिंबाचा लेप फायदेशीर आहे. कडुनिंबाच्या पानांच्या पेस्टमध्ये थोडं मध मिसळून हा लेप १५ मिनिटं चेहऱ्यावर लावावा. त्यानंतर पाण्यानं नीट चेहरा धुवावा. यामुळे तुमच्या त्वचेतील ओलावा टिकून राहील.
 7. सतत उन्हामध्ये फिरल्यानं त्वचा काळवंडली जाते. त्वचेचा रंग उजळण्यासाठी कडुनिंबाच्या पानांचा वापर करावा. काही पानं आणि गुलाबाच्या पाकळ्या एकत्र करून त्याची पेस्ट करावी. ही पेस्ट गुलाब पाण्यात मिसळून तो लेप चेहऱ्यावर लावावा. एका तासानंतर लेप साध्या पाण्यानं धुवून टाकावा.
 8. कडुनिंबाच्या पानांची पेस्ट बनवा आणि त्यामध्ये थोडीशी हळद घाला. हा लेप शरीराला लावावा. लावलेला लेप सुकल्यानंतर तो भाग पुन्हा व्यवस्थित चोळावा आणि मग आंघोळ करावी. असे केल्यानं घामोळ्याच्या समस्येपासून सुटका होईल.
 9. उकळत्या पाण्यात मुठभर कडूलिंबाची पानं टाकावीत. त्यानंतर हे पाणी गाळून घ्यावे आणि एका बाटलीमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवावं. यातील थोडेसे कडूलिंबाचे पाणी दररोज आंघोळीच्या पाण्यामध्ये एकत्र करावे. ज्यामुळे घामाच्या दुर्गंधीच्या समस्येतून सुटका होईल.
 10. केसामधील कोंड्याच्या समस्येनं अनेक जण त्रस्त असतील. यासाठी कडूलिंबाची पानं पाण्यात टाका आणि उकळा. त्यानंतर हे पाणी गाळून घ्या. याचा वापर कंडिशनर म्हणून करा. यामुळे तुम्हाला असलेली कोंड्याची समस्या दूर होईल.
 11. जर पोटात जंतू झाले असतील तर कडूलिंबाच्या पानाच्या रसात मध मिसळून चाटण घ्यावं. याशिवाय कडूलिंबाच्या पानात थोडं हिंग मिसळून चाटण घ्यावं. यामुळे देखील पोटातील जंतू नष्ट होतील.
 12. आयुर्वेदानुसार दातांच्या आणि तोंडातल्या इतर आजारांसाठी क़डुलिंब सर्वोत्तम आहे. कडुलिंब दातांसाठी सुद्धा खूप उपयोगी आहे. रोज कडुलिंबाच्या काडीने दात घासले असता दात स्वच्छ आणि निरोगी राहतात.
 13. कानामध्ये कडुलिंबाचे तेल टाकले असता कान दुखणे किंवा कानातून पाणी येणे हे सर्व आजार बरे होतात. केसांमध्ये उवा झाल्या असतील तर कडूलिंबाचं तेल लावावं.
 14. या व्यतिरिक्त घरामध्ये ठेवलं जाणारं धान्य अथवा कडधान्यांचं किडे, उंदीर घुशीपासून संरक्षण करण्यासाठी कडुलिंबाचा पाला ठेवावा. त्यामुळे धान्यही सुरक्षित राहिल आणि नासाडी पण होणार नाही.
 15. कडूलिंबाचे पानांचा उपयोग शरीरातील शर्करा नियंत्रणात ठेवण्यासाठी होतो. त्यामुळे मधुमेहाचा त्रास असणाऱ्या रुग्णांना कडूलिंबाच्या पानांचा रस अत्यंत फायदेशीर ठरतो. कफ, खोकला आणि श्वास नियंत्रित करण्यासाठी कडूलिंबाचा वापर होतो. श्वसन विकारांवर कडुलिंब दीर्घकाळापर्यंत आराम देतं.