| | | |

स्त्रियांच्या आरोग्यासाठी जास्वंदाचा चहा अमृतासमान; जाणून घ्या साहित्य, कृती आणि फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आयुर्वेदामध्ये जास्वंदीच्या झाडाचे एक विशेष स्थान आहे. कारण या झाडाचा त्यात औषधी झाड म्हणून उल्लेख केलेला आहे. जास्वदाच्या मुळापासून ते फुलापर्यंत प्रत्येक भागाचा कोणत्या ना कोणत्या आजारापासून सुटका मिळवण्यासाठी लाभ होतो.

दिसायला साधं शुद्ध आणि मुळात म्हणजे देवपूजेसाठी हमखास वापरले जाणारे जास्वंदीचे फुल जितके सुंदर तितके आरोग्यदायी आहे. यामध्ये सर्वसाधारणपणे लाल जास्वंद अनेकांच्या बागेत पाहायला मिळते. मात्र गुलाबी, पांढरा, पिवळा आणि वांगी या रंगाची जास्वंद फार क्वचितच दिसतात. या फुलाला वैज्ञानिक भाषेत हिबिस्कस फ्लॉवर म्हणून ओळखले जाते.

जास्वंद हे एक पवित्र फुल असून औषधी सुद्धा आहे. कारण यात कॅल्शियम, लोह, विटामिन सी आणि फायबर हे पोषक घटक आढळतात. त्यामुळे जास्वंदाच्या फुलाचा वापर प्रामुख्याने स्त्रियांच्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे. यापेक्षा विशेष म्हणजे जास्वदांचा चहा बनविता येतो आणि हा चहा प्यायल्याने अधिक लाभ उपभोगता येतात. चला तर जाणून घेऊयात जास्वदांचा चहा कसा बनवायचा आणि त्याचे फायदे काय?

० जास्वंदाचा चहा कसा बनवालं?

– साहित्य :
जास्वंदाची फुले ५-७
लिंबाचा रस १ चमचा
मध १ छोटा चमचा
पाणी २ वाटी

– कृती : यासाठी २ कप पाण्यात जास्वंदीची फुलं आणि त्याची सुकी पानं टाकून हे पाणी उकळवावं. जेव्हा हे पाणी अर्ध राहतं, तेव्हा गॅसवरून खाली उतरवून गाळून घ्यावं. त्यानंतर यात १ चमचा लिंबाचा रस आणि १ लहान चमचा मध मिसळावे. अशा प्रकारे जास्वंदाचा स्वादिष्ट चहा तयार.

– सेवन : हा चहा दिवसातून २ ते ३ वेळा प्या. यामुळे तुम्हाला स्वतःत झालेले बदल सहज जाणवतील.

– फायदे :

१) वजन कमी होते.
– वजन कमी करण्यासाठी जास्वंदीचा चहा उपयोगी आहे. कारण जास्वंदीच्या चहामध्ये नैसर्गिक फॅट बर्न करणारे गुण असतात. शिवाय जास्वंदीच्या फुलांमध्ये भरपूर अँटी ऑक्सीडंट असतात जे शरीरातील मेटाबॉलिजम प्रक्रिया सुधारण्यासाठी मदत करतात. तसेच यात अँटी – इन्फ्लेमेटरी गुण असतात जे उच्च रक्तदाब आणि यकृताशी संबंधित समस्यांपासून सुटका होण्यासाठी मदत करतात.

२) मासिक पाळीच्या समस्यांपासून आराम मिळतो.
–  साधारणतः पाळीचं चक्र २८ दिवसांचं असतं आणि २८ – ३० दिवसांनंतर पुन्हा मासिक पाळी येतेच. त्यामुळे जेव्हा हे दिवस २८-३०-४० असे होतात आणि त्यानंतरही पाळी येत नाही, तेव्हा अनियमित पाळीची समस्या आहे हे समजून जावे. मुळात महिलांच्या शरीरामध्ये एस्ट्रोजनची कमतरता असल्यामुळे हार्मोन्स असंतुलित होतात आणि यामुळे पाळी येत नाही किंवा उशीराने येते. इतकेच नव्हे तर कधीकधी हेवी फ्लो झाल्यामुळे शरीर कमकुवत होते. त्यामुळे अशावेळी जास्वंदीचा चहा प्यायल्याने या समस्येपासून सुटका मिळते आणि लगेच आराम मिळतो.

३) त्वचेच्या समस्यांवर फायदेशीर.
– चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी जास्वंदी कोणत्याही वरदानापेक्षा कमी नाही. कारण ज्यांना त्वचेसंबंधित समस्या आहेत त्यांच्यासाठी जास्वंद फायदेशीर आहे. कारण यात लोह, विटामिन सी आणि अँटी ऑक्सीडंट गुणधर्म आहेत जे चेहऱ्यावरील पुरळ, पिंपल्स, काळे डाग, सुरकुत्या मिटवण्यासाठी मदत करतात. शिवाय त्वचेवरील काळेपणा दूर करून त्वचा चमकदार बनवतात.

४) अकाली वृद्धत्वावर प्रभावी औषधी.
– आजकालच्या अयोग्य जीवनपद्धतीमुळे वेळेआधी चेहऱ्यावर सुरकुत्या येतात, ज्यामुळे आपण म्हातारे दिसू लागतो. पण, तुम्हाला माहीत आहे का? जास्वंदीची पानं अकाली वृद्धत्वावर औषधाप्रमाणे काम करतात. वास्तविक जास्वंदीच्या पानांमध्ये फ्री रेडिकल्स काढून टाकण्याची क्षमता असते. ज्यामुळे वय वाढण्याची प्रक्रिया हळू होते आणि आपली त्वचा बऱ्याच काळापर्यंत तरूण राहते.

५) डागरहित त्वचेसाठी परिणामकारक उपाय
– जास्वंदीची पानं स्वच्छ पाण्याने धुवून एका भांड्यात उकळवून घ्या आणि त्यानंतर ती मिक्सरमधून वाटून घ्या. पुढे त्यात थोड मध घालून हलक्या हाताने आपल्या चेहऱ्यावर लावा आणि १५ – २० मिनिटांनंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्या. असं केल्याने चेहऱ्यावरील कोरडेपणा आणि डाग निघून जातात. शिवाय चेहरा उजळ होतो.