| |

लहान वयात थ्रेडींग आणि वॅक्सिंग करणे कितपत योग्य? जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकालच्या तरुणाईत सौंदर्याबाबत अत्यंत गैरसमज आहेत. अनेकांना असेच वाटते कि सध्याच्या काळाची गरज म्हणजे बाह्य सौंदर्य. यामुळे अनेक तरुण आणि तरुणी महागडे उपचार आणि औषधे करून आपल्या त्वचेवर नाहीनाहीते प्रयोग करतात. खरंतर आपली त्वचा अत्यंत संवेदनशील असते. मात्र लोकांसाठी त्वचेहून अधिक सौंदर्य हा विषय अगदीच प्राधान्यावर आहे. यामुळे अनेकजण त्यांच्या पर्सनॅलिटीवर खूप काम करतात. तर काही जण, मेकओव्हरचे क्रेझ बाळगतात. मुख्य म्हणजे तरुणीचं नव्हे तर अगदी १२ ते १६ वर्षांच्या मुलींमध्येही हे वेड पाहायला मिळते. त्यामुळे अनेक लहान वयात मुली ब्युटीपार्लरकडे ओढल्या जातात. दरम्यान कित्येक मुली थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग करु लागतात. मात्र या लहानग्या वयात खरंच थ्रेडींग आणि वॅक्सिंग करणे योग्य आहे का ? असा सवाल उपस्थित राहतो.

* मुलींना थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग का करावे वाटते?

मुळात बाह्य सौंदर्य हि एक मानसिकता आहे. यामुळे इतर कुणाचे बाह्य रूप आपल्यापेक्षा जास्त सुंदर असले कि मानसिकतेनुसार आपल्या मनात स्वतःच्या सौंदर्याविषयी न्यूनगंड निर्माण होतो. इथूनच सुरुवात होते अट्टाहासाची. यामुळे अनेक मुली त्यांच्या मेकओव्हरकडे विशेष लक्ष देण्याच्या नादात थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग करण्यापासून सुरुवात करतात. विशेष म्हणजे शाळेतील किंवा मैत्रिणींपैकी कुणीही एकीने हा प्रयोग केला असेल तर अन्य मुली आपोआपच याकडे आकर्षित होतात आणि पालकांकडे हट्ट करू लागतात. त्यामुळे अश्यावेळी त्या मुलींच्या आईने किंवा मोठ्या बहिणीने हि बाब त्यांच्यासाठी घातक असल्याचे त्यांना समजावून देणे आवश्यक आहे.

* पुढील बाबींचा विचार करणे आवश्यक –

अनेकदा पालक म्हणून आपल्या मुलांचे हट्ट पुरवण्यासाठी पालक हतबल होऊन जातात. याबाबतीतही असेच आहे. मुली हट्ट करतात म्हणून त्यांची आई त्यांना ब्युटी पार्लरमध्ये नेणे सोयीचे समजते. यानंतर मुलींना पार्लरची सवय लागते. थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग केल्यानंतर ठराविक काळाने पुन्हा त्या जागी नवे केस येतात. त्यामुळे प्रत्येक वेळी केस आल्यावर थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग करणे गरजेचे वाटू लागते आणि स्वतःच लावलेल्या सवयीमुळे मग तुम्ही मुलींना अडवू शकत नाही.

त्यामुळे लहान वयातच मुलींनी कितीही हट्ट केला तरी ही परवानगी देऊच नका. त्यामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या समस्यांना तोंड देण्याची पाळी तुमच्यावर येणार नाही. याउलट, जर मुलींना खरंच हेअर रिमुव्हरची गरज असेल तर प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यानुसारच पुढील निर्णय घ्या. तसेच ब्युटीपार्लरमध्ये जाण्यापेक्षा त्याला पर्याय म्हणून असलेल्या हेअर रिमुव्हर क्रिम किंवा अन्य घरगुती उपायांचा अवलंब करा. म्हणजे मुलीही नाराज होणार नाहीत आणि तुमची चिंताही मिटेल.