|

पावसाळ्याच्या दिवसात येणारा ताप डेंग्यू आहे कि व्हायरल हे कसे ओळखालं?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। पावसाळ्याच्या दिवसात हमखास डेंग्यू, मलेरिया आणि इतर अनेक प्रकारच्या विषाणूजन्य तापाचा धोका अतिशय तीव्र असतो. त्यामुळे पावसाळ्यातील बदलत्या हवामानानुसार प्रत्येकाने आपल्या शरीराची योग्य ती काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. अनेकदा असं होत कि, ताप येतो आणि उतरतच नाही. याउलट हा ताप सारखा कमी जास्त होत असतो. अश्यावेळी अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो कि, हा ताप साधा ताप आहे का आणखी काही. कारण विशेष करून अशा तापाचा अधिक परिणाम लहान मुलांवर दिसून येतो. त्यामुळे पालकांची चिंता साहजिकच द्विगुणित होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा टीप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला डेंग्यू आणि विषाणूजन्य ताप अगदी सहज ओळखता येतील. यासाठी, तुम्हाला या तापाची लक्षणे माहीत असणे गरजेचे आहे. जेणेकरून ताप आल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करू शकता.

० डेंग्यू तापाची सामान्य लक्षणे कोणती?
– पावसाळ्याच्या दिवसात पाणी साचल्यामुळे डासांची उत्पत्ती होते. यातील काही डास डेंग्यूचा प्रसार करण्यास कारणीभूत असतात. साहजिकच डेंग्यू ताप हा डास चावल्यामुळे होतो. असे मानले जाते, की डेंग्यू डास दिवसा चावतो आणि यानंतर डेंग्यू तापाची लक्षणे १-२ दिवसात दिसतात. त्यामुळे जेव्हा डेंग्यूची लागण होते तेव्हा खालील लक्षणे आधी आढळतात.
१) प्रथम डोळे लाल होऊ लागतात.
२) शरीरात रक्ताचा अभाव असतो.
३) शरीरात अशक्तपणा आणि चक्करही येऊ शकते.

– डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, डेंग्यू तापात रुग्ण शरीराच्या वेदनांची तक्रार करतो, तर व्हायरल ताप सहसा सर्दी झाल्यामुळे येतो.
– जर एखादा रुग्ण तापाने ग्रस्त असेल आणि शरीरदुखी असह्य असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा. कारण हा ताप डेंग्यूचा ताप असू शकतो.
– या तापादरम्यान रक्ताच्या प्लेटलेट्सची चाचणी करणे आवश्यक आहे. याचे कारण म्हणजे डेंग्यू झाल्यास प्लेटलेट्स वेगाने खाली येतात.
– डेंग्यू ताप उपचारांशिवाय बरा होणे कठीण आहे. तर सर्दीसह येणारा विषाणूजन्य ताप अगदी २-३ दिवस घरगुती उपचार केल्यास निघून जातो.

० डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक कारण ..
– सामान्य ताप किंवा विषाणूजन्य ताप दोघांची तीव्रता एका पातळीनंतर धोकादायक ठरते. त्यामुळे योग्यवेळी उपचार न केल्यास हा ताप डोक्यात जाऊन रुग्ण दगावू शकतो. त्याचप्रमाणे डेंग्यू रुग्णाचे शरीर कमजोर करीत त्यास अशक्त बनवतो. त्यामुळे ताप कमी होत नसेल किंवा शरीराचे तापमान सतत बदलत असेल तर निष्काळजी राहू नका आणि शक्य तितक्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपले उपचार सुरु करा.