|

आपल्याला मधुमेह आहे कि नाही ते कसे ओळखालं?; जाणून घ्या लक्षणे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। मुळात मधुमेह म्हणजे शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण वाढणे. लोक या आजाराला गांभीर्याने घेत नसले तरीही मधुमेह हा एक गंभीर रोग आहे. हा रोग तुम्हाला हळू हळू आतून पोकळ करतो. म्हणून त्याला ‘सायलेंट किलर’ असेही म्हणतात. दिवसेंदिवस याच्या रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. इंडियन डायबिटीज फेडरेशन (आयडीएफ) च्या मते, भारतात सुमारे ७० दशलक्ष लोक मधुमेहाच्या आजाराने ग्रासलेले आहेत. चुकीच्या जीवनशैलीमुळे सामान्यतः प्रौढ आणि वयस्कर व्यक्तींमध्ये आढळून येणारी मधुमेहाची समस्या तरूणांमध्येही दिसून येत आहे. शरीरातील साखरेची पातळी अनियंत्रित होताच मधुमेहाची लक्षणे डोकं वर काढतात. मात्र वेळीच हि लक्षणे न समजल्याने हि समस्या बळावते. त्यामुळे मधुमेहाची लक्षणे जाणून घ्या आणि आढळ्यास तातडीने रक्त तपासणी करा.

अ. सर्व सामान्य लक्षणे पुढीलप्रमाणे :-

१) अधिक थकवा- आपल्या वयातील इतरांपेक्षा तुम्हाला जास्त थकवा जाणवेल किंवा शुचिर्भूत होऊनही तुम्हाला थकवा जाणवत असेल तर तुम्हाला मधुमेह असण्याची शक्यता संभवते.

२) अधिक तहान- जर आपल्याला इतरांपेक्षा जास्त तहान लागत असेल, तर आपल्या शरीरात वाहणाऱ्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले आहे, हे समजून जावे.

३) वजनात घट होणे- जर आपले वजन वेगाने कमी होत असेल आणि यामुळे आपल्याला शरीरी थकवा जाणवत असेल तर मग हे मधुमेहाचे लक्षण असल्याचे समजून घ्या.

४) खूप भूक लागणे- मधुमेहाने ग्रासलेल्या व्यक्तीस सामान्य माणसापेक्षा जास्त भूक लागते. शिवाय, जर आपल्याला बर्‍याचदा सर्दी आणि खोकला होत असेल, तर आपण मधुमेहाने ग्रसित असू शकता.

ब. पायांमध्ये दिसून येणारी लक्षणे पुढीलप्रमाणे :-

१) पायाला आपोआप जखम होणे- जर तुमच्या पायांवर आपोआप जखम झाली असेल किंवा एखादी छोटी जखम मोठ्या जखमेचे रूप घेत असेल तर आपल्या रक्तातील साखर वाढल्याने पायांपर्यंत पुरेसा रक्तप्रवाह होत नाही हे समजून घ्या. यामुळे इन्फेक्शन होण्याचीही शक्यता असते.

२) पायाच्या तळव्यांना आगआग होणे- मधुमेहास यीस्ट इन्फेक्शन, कोरडी त्वचा या समस्या कारणीभूत असतात. यामुळे मुख्य करून तळपायाला जळजळ वा आगआग होते. त्यामुळे जर पायांना असा त्रास जाणवत असेल तर आपल्याला मधुमेह असण्याची शक्यता आहे.

३) पायांना सूज येणे- अचानक पायांना सूज चढणे हे मधुमेहाचे सर्व सामान्य लक्षण आहे. कारण रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने शरीरातील विविध भागांमध्ये रक्तपुरवठा होत नाही व त्यामुळे सूज येते.

४) पायांना हालचाल न जाणवणे वा पाय सुन्न होणे- आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने शरीराच्या रक्तवाहिन्या कमकुवत होऊ लागतात आणि त्यांची संवेदना कमी होते. परिणामी पाय सुन्न होण्याची समस्या होते.

लक्षात ठेवा – मधुमेहाचे कोणतेही लक्षण आढळ्यास त्वरित रक्ततपासणी आवश्यक आहे. शिवाय या रोगावर घरगुती उपचार करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.