| | |

शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे, हे कसे कळेल? जाणून घ्या लक्षणे, कारणे आणि उपाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपली हाडे मजबूत असतील, तर शारीरिक थकवा, सांधेदुखी, वात यांसारख्या समस्या उदभवत नाहीत. हाडांच्या चांगल्या आरोग्यासाठी त्यात कॅल्शियमची फार गरज असते. शिवाय ह्रदयाचे ठोके नियमित व सुरळीत ठेवण्यासाठीदेखील कॅल्शियम उपयोगी ठरते. आजकाल चुकीच्या जीवनशैलीचा प्रभाव हाडांवर होणे अगदी सर्वसामान्य बाब झाली आहे. वाढत्या वयानुसार अनेक महिलांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण कमी होत चालल्याचे दिसून येत आहे.

मुळात शरीरात कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्यास, अनेक आजार होण्याची शक्यता असते. यामुळे कॅल्शियमचे शरीरातील प्रमाण कमी झाले, कि आपल्याला डॉक्टर कॅल्शियमच्या गोळ्यांचे सेवन करण्यास सांगतात. मात्र योग्य वेळी जर हि समस्या आपल्या लक्षात आली तर यावर आपण उपाय करून मात करू शकतो. म्हणून आम्ही तुम्हाला शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्याची लक्षणे आणि कारणे सांगणार आहोत. याचसोबत करावयाचे उपाय देखील सांगणार आहोत.

* शरीरातील कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे:-
१) हाडे ठिसूळ होणे – हलक्या दुखापतीत फ्रॅक्चर होणे.
२) दात तुटणे – अचानक दात अर्ध्यातूनच तुटणे किंवा मुळापासून निखळणे. दात दुखणे.
३) अशक्तपणा येणे – दिवसभर शारीरिक थकवा जाणवणे. अंगातील त्राण निघून जाणे.
४) लहान मुलांना उशीरा दात येणे – लहान मुलांना अधिक काळापर्यंत दात न येणे.

* कॅल्शियमच्या कमतरतेची कारणे:-
१) दैनंदिन आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांची कमी – दैनंदिन जीवनात अनेकांना फास्टफूड खाणे सोयीचे आणि चविष्ट वाटते. यामुळे फळ, दूध आणि घरगुती आहाराकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी शरीरात कॅल्शियमची कमतरता होते.

२) ऊन तसेच शरीरिक कामाचा अभाव – काही लोकांची कामे फिरतीची किंवा उन्हातली असतात. यामुळे शरीरातुन पोषक घटकांचे आणि पाण्याचे विघटन होते.

३) अतिरिक्त गोड पदार्थांचे सेवन – काही लोकांना गोड पदार्थ प्रमाणापेक्षा जास्त आवडतात. त्यामुळे दिवसभरात किमान एकदातरी गोड खाल्ल्याशिवाय त्यांचा दिवस संपत नाही. पण याचा परिणाम थेट शरीरातील कॅल्शियमवर होत असतो. गोड पदार्थांमुले शरीरातील साखर वाढते आणि पोषक तत्वांचा ऱ्हास होतो.

४) स्त्रियांना मासिक पाळीत अधिक स्त्राव होणं – अनेक स्त्रियांना मासिक पाळीत विविध त्रास जाणवतात. यातील ज्या महिलांना या दिवसात अधिक स्त्राव होतो. परिणामी शरीरातील लोह कमी होते आणि त्यांचे शरीर लवकर थकते.

कॅल्शियमयुक्त आहार हाच मोठा उपाय:- आहारात काय खाल?

१) संत्र – संत्र्यामध्ये अधिक प्रमाणात कॅल्शियम असते. या फळाच्या सेवनाने शरीरात कॅल्शियमचे प्रमाण चांगले राहण्यास अथवा वाढविण्यास मदत होते.

२) अंजीर – अंजीरमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. शिवाय कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम इत्यादी घटकदेखील समाविष्ट असतात. साधारण दोन अंजीर खाल्याने आपल्या शरीराला ५५ ग्रॅम कॅल्शियम मिळू शकते.

३) सोया – सोया मिल्क, सोयाबिन तसेच टोफू या पदार्थांमधून आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळते. त्यासोबत यामधून लोह, मॅग्नेशियम आणि प्रथिने देखील मिळतात.

४) ब्रोकोली – ताजी ब्रोकोली खाल्याने ४७ ग्रॅम कॅल्शियम मिळते. शिवाय ब्रोकोलीच्या सेवनाने यकृताच्या कर्करोगाचा धोकादेखील टळतो.