| |

कमी वयातच चष्मा कसा लागतो? ‘हि’ आहेत कारणे आणि चष्मा घालविण्याच्या आधुनिक पद्धती

हॅलो आरोग्य ऑनलाईन : हल्ली चाळिशीच्या आतच- अगदी लहानपणापासून चष्मा लागण्याचे प्रमाण वाढले आहे. लहान वयात मुलांना किंवा तरुण वयात लागणारा चष्मा हि एक चिंताजनक गोष्ट झाली आहे. पूर्वीच्या वयस्कर लोकांना चष्मा दिसायचा तो आता बहुतेक जणांना दिसू लागला आहे. स्मार्टफोन, टेलिव्हिजन आणि तत्सम साधनांमुळे लहान मुलांचा स्क्रीन टाइम वाढला आहे. बैठ्या आणि आधुनिक जीवनशैलीमुळे आरोग्याच्या तक्रारी सोबत डोळ्यांच्या समस्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. आज आपण चष्मा का लागतो, त्याची कारणे आणि दृष्टी सुधारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध पद्धती यांची ही ओळख करून घेणार आहोत.

कमी वयातच चष्मा कसा लागतो?

जन्मत: बाळाच्या डोळ्याची लांबी २४ मिलिमीटर असते. ती जर त्यापेक्षा अधिक असली तर त्याला मोठा डोळा (काँजेनिटल मायोपिया) असे म्हणतात. डोळा चेंडूसारखा गोल असतो. बुब्बुळापासून डोळ्याच्या मागील बाजूच्या बिंदूपर्यंत काढलेली सरळ रेघ म्हणजे डोळ्याचा व्यास. हीच डोळ्याची लांबी. मोठय़ा डोळ्याच्या समस्येत नेत्रपटलावर प्रतिमा जिथे पडायला हवी त्याच्या थोडी अलिकडे पडते आणि व्यक्तीला मोठय़ा ‘मायनस’ क्रमांकाचा चष्मा असतो. डोळ्याची लांबी जरी मोठी नसली तरी डोळ्यांवर ताण पडत राहिल्यामुळे लहान क्रमांकाचा चष्मा लागू शकतो. वाचन, लिखाण, टीव्ही, काँप्युटर गेम्स, मोबाईल यामुळे डोळ्यांवर जो ताण येतो त्यातून लहान वयात हा ताणाचा चष्मा लागतो. त्याला सिंपल किंवा डेव्हलपमेंटल मायोपिया असेही म्हणतात.

जशी डोळ्यांची लांबी निसर्गत: जास्त असू शकते तशीच ती कमीही असू शकते. याला छोटा डोळा (हायपरमेट्रोपिया) असे म्हणतात. यात नेत्रपटलावर पडणारी प्रतिमा योग्य बिंदूच्या पलीकडे पडते आणि ‘प्लस’ क्रमांकाचा चष्मा लागतो. काही लहान मुलांना असा चष्मा लागलेला पाहायला मिळतो. खरे सांगायचे तर कोणत्याही बाळाच्या डोळ्याची लांबी निसर्गत: जेवढी असायला हवी त्यापेक्षा कमीच असते आणि जसे मूल मोठे होत जाते तशी ही डोळ्याची लांबी २४ मिलिमीटर होते. पण तरीही काही बाळांचा डोळा छोटा राहून जातो, तर काहींना डोळ्यांची लांबी अति वाढून मोठय़ा डोळ्याची समस्या उद्भवते.

चष्मा लागण्याचे आणखी एक कारण असू शकते. काही जणांचे बुब्बुळ निसर्गत:च वेडेवाकडे (अ‍ॅस्टिग्मॅटिझम) असते. पोळी करण्याचा तवा डोळ्यासमोर आणा. या तव्याला एक नैसर्गिक खोलगटपणा असतो. हा तवा जमिनीवर ठेवून त्याला ठोकले तर तो चेपला जाईल आणि त्याचा नैसर्गिक खोलगटपणा बिघडेल. अशी या लोकांच्या बुब्बुळाची परिस्थिती असते. त्यांना बिंदू हा बिंदूसारखा नव्हे तर धुरकट सरळ रेघेसारखा दिसतो. याला ‘सिलेंड्रिकल’ नंबरचा चष्मा असणे असे म्हणतात. यात कमी दिसण्याबरोबर रुग्णाच्या डोळ्यांवर ताण येतो, डोकेही दुखू शकते.

चाळिशीच्या आत लागलेला चष्मा सतत वापरा

 • अगदी लहान बाळापासून तरुणांपर्यंत चष्मा लागण्याची कारणे प्रामुख्याने वर नमूद केल्यासारखीच असतात. पण सर्वाधिक लोक लांबचे कमी दिसणारे म्हणजे मायनस क्रमांकाच्या चष्म्याचे असतात.  ज्यांना प्लस क्रमांकाचा चष्मा असलेल्यांना त्यांना चष्मा न घालताही डोळ्यांना ताण देऊन पाहण्याची सवय असते. त्यामुळे अनेकदा डोळ्यांना प्लस क्रमांक आहे हे लवकर लक्षातही येत नाही.
 • ज्याला मायनस क्रमांचा चष्मा त्याला लांबचे कमी दिसते आणि प्लस क्रमांकाचा चष्मा असलेल्याला जवळचे कमी दिसते हे अर्धसत्य आहे. वयाच्या ५ व्या वर्षांपासून अगदी ३५ व्या वर्षांपर्यंत लांबचे कमी दिसत असले तर तो मायनस किंवा प्लस असा दोन्ही स्वरुपाचा असतो. म्हणजे जशी लांबची दृष्टी कमी असते तशीच जवळची दृष्टीही कमी असते. चाळीशीच्या आत लागलेला चष्मा सतत वापरायला सांगतात ते यामुळेच.
 • चाळिशीच्या आत लांबचे कमी दिसणाऱ्या व्यक्तीस जवळचे चष्म्याशिवायही छान दिसत असले तरी ते पाहण्यासाठी नकळत डोळ्यांवर अधिक ताण द्यावा लागत असतो.त्यामुळे डॉक्टरांनी चष्मा सतत वापरण्यास सांगितल्यास ते पाळलेले चांगले.
 • आपल्याला चष्मा नसेल तरी डोळ्यांची योग्य काळजीघ्यायला हवी. वाहन चालवताना ‘फोटोक्रोमॅटिक’ झीरो नंबरचा चष्मा जरुर वापरावा. त्यामुळे धूळ, वारा, सूर्यप्रकाशाचा त्रास होणार नाही.

चष्मा घालावा की लेन्स?

 • ज्यांना चष्मा नको वाटतो त्यांनी लेन्सेस वापरण्यास काहीच हरकत नसावी. मोठा मायनस क्रमांकाचा चष्मा असणाऱ्यांना चष्म्याच्या फ्रेमच्या बाजूचा परीघ नीट दिसत नाही.
  काँटॅक्ट लेन्स घातल्यावर अधिक विस्तारित परिघातले जग पाहता येते. खूपच मोठा- म्हणजे मायनस १० किंवा १२ क्रमांकाचा चष्मा असतो त्यांना वस्तू इतरांपेक्षा लहान दिसतात. अशा लोकांनाही लेन्स लावल्याने फायदा होतो. दोन्ही डोळ्यांनी एकत्र बघण्याची प्रक्रिया लेन्स घातल्यावर सुधारते.
 • असे असूनही काही जणांना लेन्स घातल्यावर त्रास होतो. लेन्स ही शेवटी डोळ्यात बाहेरुन घातली जाणारी गोष्ट असते. काही जणांच्या डोळ्यांच्या पेशींना ती सुसह्य़ होते, तर काहींचा डोळा लेन्सला सहजपणे स्वीकारत नाही.
 • डोळे सतत लाल होणे, डोळ्यांना अ‍ॅलर्जी येणे, खाज सुटणे तसेच डोळे कोरडे असणे असे त्रास असणाऱ्यांनी काँटॅक्ट लेन्स वापरणे टाळावे.
 • लेन्सेस वापरणाऱ्या व्यक्तीनेही वाहन चालवताना झीरो नंबरचा गॉगल वापरावा.

चष्मा घालवण्याच्या आधुनिक पद्धती

 • आजही लेसर उपचार हीच चष्मा घालवण्यासाठीची आधुनिक पद्धत आहेत. त्यात विविध प्रकार आहेत. यात लेसर प्रकाशकिरणाचा झोत बुब्बुळाच्या मध्यबिंदूवर टाकला जातो. या उपचारात बुब्बुळाची प्रकाशकिरणांचे केंद्रीकरण करण्याची शक्ती (रीफ्रॅक्टिव्ह पॉवर) बदलते आणि चष्म्याचा नंबर बदलता येतो. या लेसर उपचारांना ‘फोटो रिफ्रॅक्टिव्ह कॅरॅटेक्टॉमी’ (पीआरके) म्हणतात. पूर्वी ही पद्धत अधिक वापरली जात असे.
 • पीआरके लेसर उपचारांनंतर ‘लॅसिक’ नावाचे लेसर उपचार वापरले जाऊ लागले. यात बुब्बुळावरचा कांद्याच्या पापुद्रयासारखा पातळ पापुद्रा (लेंटिक्यूल) शस्त्रक्रियेद्वारे काढला जातो, बुब्बुळावर लेसरचा झोत टाकला जातो आणि काढलेला पापुद्रा परत पूर्ववत बसवला जातो.
 • सर्वात अत्याधुनिक लेसर उपचारांमध्ये बुब्बुळाचा पापुद्रा बाजूला काढण्यासाठी शस्त्रक्रियेद्वारे कापही घ्यावा लागत नाही. शस्त्रक्रियेशिवाय लेसर प्रकाशकिरण टाकूनच ते काम केले जाते. आधुनिकतेबरोबर शस्त्रक्रिया अधिक सोपी आणि अचूक होते. तसेच रुग्ण पुन्हा पूर्ववत पाहू लागण्यासाठी लागणारा वेळही कमी- कमी होत जातो.
 • लेसर उपचारांमध्ये चष्म्याचा क्रमांक कमी करता येतो किंवा तो पूर्णही घालवता येतो.
 • लेसर उपचारांनी डोळ्याला इजा तर होणार नाही ना अशी भीती अनेकांच्या मनात असते. शेवटी ही एक प्रकारची शस्त्रक्रिया असते हे लक्षात घ्यायला हवे. इतर कोणत्याही शस्त्रक्रियेतजितका धोका असू शकतो तसा ‘छुपा धोका’ या शस्त्रक्रियेतही असतो. पण त्यामुळे घाबरुन जाण्याचे कारण नाही. सामान्यत: चष्मा घालवण्यासाठीचे लेसर उपचार सुरक्षित समजले जातात.