| |

जिभेवर साचलेला विषाणूजन्य थर कसा स्वच्छ करायचा?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन| आपल्या शरीराच्या आरोग्यासह तोंडाचे आरोग्य राखणे देखील अत्यंत गरजेचे आहे. मुख्य म्हणजे तोंडाचे आरोग्य केवळ दातांशी संबंधित नसते. तर, हिरड्या, जीभ आणि घसा यांच्याही संबंधित असते. अनेकदा आपण दात स्वच्छ करताना जीभ स्वच्छ करणे टाळतो. मात्र आपल्या जिभेची स्वच्छता तितकीच गरजेची आहे जितकी दातांची स्वच्छता महत्वाची आहे. कारण, जीभ नियमितपणे स्वच्छ केली नाही तर तोंडातून दुर्गंधी येऊ लागते. त्याचबरोबर जीभ नियमितपणे स्वच्छ न केल्याने तोंडात विषाणूंचा वावर वाढतो आणि याचा परिणाम आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेसह, पचनक्रियेवरही होतो. परिणामी आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते.

लहानपणी आई नेहमी आपले दात दोनवेळा स्वच्छ करायची. मात्र आपण मोठे झालो आणि कामाच्या व्यापात इतके बुडालो की सकाळी मोठ्या कष्टाने दात स्वच्छ करतो. या दरम्यान जीभसुद्धा स्वच्छ केली तर बरेच फायदे होतील. मुळात जीभ स्वच्छ करणे ही एक आवश्यक स्वच्छतेची प्राथमिक गरज आहे. जी त्वचेच्या मृत पेशी, अन्न कचरा, बुरशी, जीवाणू आणि त्याच्या पृष्ठभागावरुन विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.

० रोज जीभ स्वच्छ केली नाही तर काय परिणाम होईल?
– डॉक्टरही हेच सांगतात की, प्रत्येकाने दररोज जीभ स्वच्छ केलीच पाहिजे. कारण, जीभ नियमितपणे स्वच्छ न केल्याने तोंडात दुर्गंधी, दात गळणे, जिभेची चव खराब होणे, हिरड्यांमधून रक्त येणे, हिरड्या फाटणे, दात किडणे, पायरिया अश्या समस्या होऊ शकतात.

० जीभ स्वच्छ कशी करावी?
– संपूर्ण दिवसातून किमान दोनवेळा जीभेला चांगल्या स्क्रॅपरने स्वच्छ करावे. दरम्यान स्क्रॅपरला ‘U’ आकारात दुमडून जीभ पूर्णपणे स्वच्छ करणे सोप्पे आणि मदतयुक्त ठरेल. यासाठी जीभ बाहेर काढून स्क्रॅपरला जिभेवर जास्त अंतरावर ठेवा आणि स्क्रॅपरची दोन्ही टोके दोन्ही हातांनी धरून हळूवारपणे जीभ खरडा. यानंतर स्क्रॅपर धुवा आणि जीभ स्वच्छ होईपर्यंत पुन्हा हीच कृती करा. प्रत्येक वापरानंतर स्क्रॅपर कोमट पाण्याने धुणे अत्यंत गरजेचे आहे.

० जीभ दररोज स्वच्छ करण्याचे फायदे कोणते?

१) श्वासातील दुर्गंधी निघून जाईल.
– जीभेवरून जीवाणू, अन्नाचा कचरा, बुरशी आणि मृत पेशी जीभ स्वच्छ केल्यामुळे निघून जातात. परिणामी श्वासातील दुर्गंधी हळूहळू कमी आणि कालांतराने नष्ट होते. यासाठी एक चांगला टूथब्रश वापरणे अत्यंत गरजेचे आहे. मुळात हे लक्षात ठेवा की, जीभ घासल्याने साफ होत नाही. त्यासाठी चांगल्या स्क्रॅपरने जीभ स्वच्छ करा. एका संशोधनानुसार, यांत्रिकरित्या जीभ स्क्रॅप केल्याने जिभेवर जीवाणूंची संख्या ५०% कमी होते, म्हणून दर्जाचे स्क्रॅपर वापरावे.

२) शरीर निरोगी राहते.
– जीभेवर जमा होणारे हानिकारक विषाणू अस्वच्छ जिभेवर जमा होऊन थर तयार करतात. यामुळे आपल्याला विविध रोग होण्याची शक्यता बळावते. म्हणून, जीभ स्वच्छ ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शिवाय जीभ स्वच्छ केल्याने जिभेवरील विषाणूंचा मारा नाहीसा होतो परिणामी हे विषद्रव्य शरीरात शोषले जात नाही आणि शरीर निरोगी राहते.

३) जिभेची चव व्यवस्थित राहते.
– दररोज जीभ स्वच्छ न केल्याने, टेस्ट बड्स बंद होतात. अर्थात आपण खात असलेल्या अन्नाची मूळ चव जिभेला कळत नाही. परिणामी अन्नाची वासना शमते. दरम्यान जीभेची रोज दररोज स्वच्छता केल्याने तिच्या पृष्ठभागावर जमा होणारा विषाणूजन्य थर निघून जातो. परिणामी जिभेची चव ओळखण्याची शक्ती स्थिर राहते आणि अन्न अधिक चांगले पचण्यासही मदत होते.

४) दररोज दात स्वच्छ करा.
– दररोज दात स्वच्छ केल्याने तोंडात बॅक्टेरिया आणि विषारी पदार्थ साठत नाहित. यामुळे तोंडात होणारे विषाणूंचे संक्रमण थांबते. परिणामी शरीर निरोगी ठेवण्यासाठी मदत होते. शिवाय, दात किडणे, हिरड्याचे संक्रमण, पीरियडॉन्टल समस्या आणि दात खराब होण्यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.