| | | |

थंडीच्या दिवसात बहुगुणी आवळ्याचे सेवन कसे करावे?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सध्या ऋतुचक्रानुसार थंडीचा हंगाम अर्थातच हिवाळा सुरू झाला आहे. या हंगामातही विविध आजार आणि आरोग्यविषयक समस्या होण्याची शक्यता असते. यामुळे आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देण्यास प्राधान्य देणे गरजेचे मानले जाते. आवळा हे एक असे फळ आहे ज्यामध्ये अनेक विशेष औषधी गुणधर्म समाविष्ट असतात. यामुळे अगदी हिवाळ्यातसुद्धा आवळ्याचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते. मुळात आवळा व्हिटॅमिन सी’चा उत्कृष्ट स्रोत आहे. शिवाय आवळ्यात अँटिऑक्सिडंट्सदेखील भरपूर प्रमाणात आहेत. यामुळे हिवाळ्यात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवळ्याचे सेवन करणे फायदेशीर आहे. दरम्यान आवळ्याचे सेवन केल्यास थंडीच्या समस्या जसे की – हिवाळ्यात केस गळणे, ऍसिडिटी, वजन वाढणे इ. समस्यांवर मात करण्यासाठी आवळा फायदेशीर आहे. पण थंडीमध्ये याचे सेवन कश्या पद्धतीने करावे याबाबत अनेक लोक संभ्रमात असतात. तर हा लेख पूर्ण वाचा आणि जाणून घ्या:-

० हिवाळ्यात आवळ्याचे सेवन कसे कराल?

१) हिवाळ्यात आवळा पावडरचे सेवन करता येईल. यासाठी १ चमचा मध वा कोमट पाण्यात आवळ्याची पावडर मिसळून खा. त्यामुळे अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत होईल.

२) याशिवाय हिवाळ्यात आवळ्याचा रसदेखील घेऊ शकता. यासाठी १ चमचा आवळ्याचा रस १ कप गरम पाण्यात मिसळून प्या.

३) आवळ्याचा रस किंवा पावडर आवडत नसल्यास आंबट गोड असं आवळ्याचं लोणचं वा मुरंबा खा.

४) तसेच आवळ्याची कॅडीदेखील खाता येईल. यासाठी आवळ्याची हिरवी फळे कापून उन्हात वाळवा आणि त्यातील सर्व पाणी सुकल्यावर भांड्यात साठवा.

५) बाजारात आवळ्याचे च्यवनप्रशदेखील उपलब्ध असते. ते खाल्ल्यास देखील लाभ होतो. यासाठी एक ग्लास कोमट दुधात १ चमचा आवळ्याचे च्यवनप्राशन घोळून प्या.

६) आवळा असाच हलके मीठ लावूनही खाता येतो. आपल्या आवडीनुसार आवळ्याचे सेवन करावे.

० हिवाळ्यात आवळा खाण्याचे फायदे कोणते?

– रोगप्रतिकार शक्तीत वाढ
हिवाळ्यात आवळ्याचे सेवन केल्याने अनेक प्रकारचे फायदे मिळतात. आवळ्याचे च्यवनप्राश खाल्ल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे संक्रमण, सर्दी आणि खोकला यासारख्या हिवाळ्यातील सामान्य समस्या दूर ठेवण्यास मदत होते.

– बद्धकोष्ठता दूर होते
थंडीमध्ये बद्धकोष्ठता ही समस्या सामान्य आहे. अशा परिस्थितीत आवळा खाल्ल्यास बद्धकोष्ठता दूर ठेवण्यासाठी मदत होते. यामुळे आवळा कोणत्याही प्रकारे खाल्ल्यास पचनसंबंधीत आजार दूर करून पोट निरोगी ठेवण्यास मदत होते.