| | |

पारंपरिक पौष्टिक अंबील कसे बनवालं?; जाणून घ्या साहित्य, कृती आणि फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असे अनेक पदार्थ आहेत जे वर्षानुवर्षे परंपरागत बनविले जातात आणि खाल्लेही जातात. मुख्य म्हणजे हे पदार्थ बनविताना त्यामध्ये तीच पारंपरिक चव जशीच्या तशी उतरलेली असते. कारण वर्षानुवर्षे अशा अनेक पारंपरिक पाककृतीचा आहे तसाच वापर केला जातो. आपल्या संस्कृतीला वारसा असणाऱ्या अशा अनेक पाककृती आता काळाच्या ओघात विस्मृतीत जात आहेत. फार कमी घरांमध्ये आजही अशा पाककृतींचा घमघमाट सुटतो. त्यांपैकीच एक म्हणजे अंबील होय. आता अनेकांना तर अंबील या पदार्थाविषयी कदाचित माहीतही नसेल. कारण, आजकाल फार कमी ठिकाणी अंबील या पदार्थाचे सेवन केले जाते.

खरं तर उष्ण हवामानात एक आदर्श आहार म्हणून अंबीलकडे पाहिले जाते. अंबील हा पदार्थ ज्वारी, बाजरी वा नाचणीपासून तयार केला जातो. हा एक घट्टसर पेयासारखा पदार्थ आहे. अंबील खाल्ल्यामुळे भूक आणि तहान दोन्ही शमते. आपल्या महाराष्ट्रात तसेच कर्नाटक राज्यामध्ये अंबीलचे सेवन अनेक भागांत केले जाते. तर काही देवालयांमध्ये अंबील प्रसाद म्हणून दिले जाते. चला तर जाणून घेऊयात अंबील बनवण्यासाठी लागणारे साहित्य, कृती आणि फायदे खालीलप्रमाणे:-

साहित्य
– हवामानानुसार ज्वारी, बाजरी किंवा नाचणीचे एक मध्यम वाटी पीठ,
– आंबट ताक साधारण पिठाच्या दुप्पट,
– आले,
– हवे असल्यास लसूण,
– हिरवी मिरची,
– फोडणीसाठी जिरे,
– हिंग,
– मीठ,
– साखर
– कोथिंबीर,
– तूप.

कृती
सर्वप्रथम कढईत तूप तापवून त्यात जिरे आणि हिंग घाला. यानंतर बारीक चिरलेले लसूण, मिरची, आले हे सर्व घाला. आता हे सर्व साहित्य किंचित हलके सोनेरी होईपर्यंत परतून त्यात पीठ घाला. आता हे पीठ चांगले परतून त्यात पाणी घालून भरभर ढवळून घट्ट शिजवून घ्या. शिजवताना पिठाची कच्ची चव पूर्ण गेली पाहिजे हे लक्षात ठेवा. शिजवलेले पीठ थंड करून आता यात ताक, मीठ, साखर आणि कोथिंबीर घालून साधारण पातळ करून घ्या. तुमचा पारंपरिक आणि पौष्टिक अंबील तयार.

फायदे

१) अंबील हे शक्यतो उष्ण हवामानात खाणे फायदेशीर ठरते. यामुळे पोटात उष्णतेमुळे होणारे त्रास कमी होतात.

२) अंबील बनवताना यामध्ये वापरली जाणारी पिठं हि सात्विक आणि पौष्टिक आहाराचा भाग असल्यामुळे शरीर निरोगी राखण्यास मदत होते.

३) अंबील खाल्ल्यामुळे सतत भूक लागत नाही. यामुळे वरवरचे खाणे टाळले जाते आणि वजन वाढत नाही.

४) अंबील हा पदार्थ पेय पदार्थ असल्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत होते. यामुळे तहानसुद्धा शमते.

५) पित्ताचा वारंवार त्रास होणाऱ्या लोकांनी अंबील प्रामुख्याने खावे. कारण हा पदार्थ गुणधर्मांची थंड असल्यामुळे पित्तावर गुणकारी ठरतो.

६) अंबील हे कोणत्याही वयातील व्यक्तीसाठी सर्वतोपरी उत्तम असा आहार आहे. फक्त यातील मिरची आणि लसणीचे प्रमाण हे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार असावे.