| |

ओले मटार कसे साठवल्यास खाण्यायोग्य राहतात?; लगेच जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। मटार ही भाजी खूपच लोकप्रिय भाज्यांपैकी एक भाजी आहे. कारण मटारचे दाणे भाजी, पुलाव, कुर्मा, कबाब अश्या विविध अन्न पदार्थांमध्ये वापरले जातात. मटार दिसायला अतिशय आकर्षक, खायला चविष्ट आणि आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी असतात. कारण मटारमध्ये प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर आणि कार्बोहायड्रेड मुबलक प्रमाणात असतात. ज्यामुळे मटारचे दाणे खाणे फायदेशीर ठरते. प्रामुख्याने हि भाजी हिवाळ्यात अतिशय स्वस्त मिळते मात्र हिवाळ्यानंतर ही भाजी महागही होते. तसे पाहता बाजारात फ्रोजन मटार बारा महिने उपलब्ध असतात. मात्र ते लवकर शिजत नाहीत. शिवाय ते अधिक काळ टिकावे यासाठी त्यांच्यावर रासायनिक प्रक्रिया केली जाते. यामुळे ते खाण्यासाठी हितकारक नसतात. याकरिता ओले मटार वर्षभर घरच्या घरी टिकवायचे असतील तर काय करायचे असा प्रश्न गृहिणींना पडतो. या प्रश्नाचे उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

० मटार साठवण्याची सोपी पद्धत म्हणजे ताजे मटारचे दाणे फ्रीजमध्ये साठवून ठेवा. यासाठी काय कराल ते जाणून घ्या
एक किलो मटार आणि दोन चमचे साखर हे इतके प्रमाणाचे साहित्य पुरेसे आहे.

० मटार साठवण्याची प्रक्रिया – बाजारातून मटारच्या शेंगा विकत घेताना सुकलेल्या, किडलेल्या, ओलसर नसतील याची काळजी घ्या. मटारचे दाणे सोलून घ्या आणि स्वच्छ धुवून काढा व एखाद्या चाळणीत निथळत ठेवा ज्यामुळे ते कोरडे राहतील. यानंतर एका भांड्यात मटारचे दाणे बुडतील एवढं पाणी उकळा. पाण्याला उकळी आल्यावर त्यात दोन चमचे साखर घाला. पुढे या उकळत्या पाण्यात मटारचे दाणे टाका आणि फक्त २ मिनीटे हे दाणे पाण्यात ठेवा. यानंतर गॅस बंद करा आणि मटारच्या दाण्यांमधील पाणी काढून टाका व एका थंड पाण्याच्या भांड्यात मटारचे दाणे टाका. मटार थंड झाल्यावर ते पुन्हा चाळणीत निथळून घ्या. यानंतर निथळलेले मटारचे दाणे कोरड्या कापडावर पसरून पूर्णपणे कोरडे करा आणि पाणी सुकून कोरडे झालेले मटारचे दाणे प्लास्टिकच्या झिप लॉक बॅगमध्ये भरून दीप फ्रिजमध्ये ठेवून द्या. यानंतर हे मटारचे दाणे तुम्ही वर्षभर वापरू शकता. फक्त हे दाणे वापरासाठी काढताना हवे तितके काढून लगेच फ्रिजमध्ये ठेवा आणि ओले हात लावू नका.

० मटारचे दाणे साठवण्यासाठी सोप्या टिप्स जाणून घ्या खालीलप्रमाणे:-
१) मटारचे दाणे छोट्या झिप लॉक बॅगमध्ये भरून डिप फ्रिजरमध्ये ठेवा.
२) मटारच्या दाण्यांमध्ये उकळताना साखर घातल्यामुळे त्याचा रंग आणि चव तशीच राहते. परंतु साखरेचे अति प्रमाण करू नये.
३) मटार उकळत्या पाण्यात फक्त २ मिनीटेच ठेवा. कारण त्यापेक्षा जास्त वेळ मटार उकळले तर ते शिजतील आणि टिकणार नाहीत.
४) उकळत्या आणि नंतर थंड पाण्यात टाकल्यामुळे मटार शिजण्याची प्रक्रिया त्वरित थांबते आणि मटार टिकतात.
५) मटार थंड करण्यासाठी थंड पाणी वा बर्फाचे पाणी वापरणे फायद्याचे ठरते. यामुळे मटार शिजण्याची प्रक्रिया त्वरित थांबते शिवाय मटारचे रंग बदलत नाही.
६) मटार साठवण्यासाठी हवाबंद डब्बा किंवा झिपलॉक बॅग वापरल्यास ते जास्तीत जास्त काळ आहेत तसेच राहतात आणि रंग, चव सोडत नाहीत.