| | |

ऋतू बदलाने केले केसांचे हाल? आता निर्जीव केसांची काळजी कशी घ्यालं?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सध्या ऋतूच चक्र असं काही बदललं आहे कि, हिवाळा सुरु आहे पण कधी पाऊस पडेल सांगू शकत नाही. या अश्या वातावरणाचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर, त्वचेवर आणि केसांवर होत असतो. थंडीमुळे आधीच लोक केस धुण्यात आळस करतात. अशावेळी आठवड्यातून एकदाच केस धुण्याला प्राधान्य देणाऱ्या व्यक्तींच्या टाळूवर घाण साचते. शिवाय केससुद्धा आठवडाभर घाम आणि धूळ, प्रदूषणामुळे त्रासलेले असतात. परिणामी केस कोरडे होतात आणि केसगळती वाढते. शिवाय हिवाळ्यात स्कॅल्प खराब होतो आणि यामुळे कोंड्याची समस्या देखील होते. अशावेळी केसांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. चला तर जाणून घेऊया केसांच्या समस्या आणि घ्यावयाची काळजी खालीलप्रमाणे:-

० केसांच्या समस्या
– हिवाळ्याच्या दिवसात केस आणि टाळूवर घाण साचते परिणामी केसांना कोरडेपणा येतो.
– कोरड्या टाळूमुळे कोंड्याची समस्या होते.
– हिवाळ्यात केस कोरडे होतात. परिणामी केसगळतीची प्रमाण वाढते.
– केसांची आर्द्रता कमी झाल्यामुळे केस निर्जीव होतात.

० अशी घ्या केसांची काळजी

१) केसांसाठी सौंदर्यप्रसाधने नको तर घरगुती उपाय करा.
– हिवाळ्यातील थंड वाऱ्यामुळे त्वचा, ओठ आणि केस कोरडे तसेच निर्जीव होतात. केसांची योग्य काळजी घेण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेली सौंदर्य प्रसाधने अशावेळी वापरू नका. याउलट केसांची काळजी घेण्यासाठी फक्त घरगुती उपाय वापरा. यामुळे केसांना आणि केसांच्या मुळांना तसेच स्कॅल्पला फायदा होतो.
यासाठी एका भांड्यात १ वाटी दह्यात २ लिंबू पिळून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट हलक्या हातांनी केसांच्या मुळांवर आणि टाळूवर लावा. तासाभराने कोमट पाण्याने केस धुवा. कोंडा दूर करण्यासोबतच केसही मऊ करण्यासाठी हा उपाय उत्तम आहे.

२) केसांची स्वच्छता
– आठवड्यातून एकदा केस धण्यामुळे आठवडाभर केसांमध्ये घाण साचून राहते. परिणामी त्यांचा पोत खराब होतो. यामुळे आठवड्यातून किमान दोनदा केस धुवा. ज्याने केस आणि टाळू स्वच्छ राहील. त्यामुळॆ केसांच्या वाढीस चालना मिळेल.

३) कोंडा टाळा
– हिवाळ्यात केस गळण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कोंडा. यामुळे केसांचे कोंड्यापासून संरक्षण करा आणि यासाठी सौम्य अँटी डँड्रफ शैम्पू वा दह्यात लिंबाचा रस घालून केसांना लावा.

४) कोरफड आणि आवळा
– कोंडा झाल्यामुळे केस तुटतात, फाटे फुटतात आणि परिणामी केसांची मुळे कमकुवत होतात. अशा परिस्थितीत केस मजबूत करण्यासाठी आवळा आणि कोरफडीचा केसांसाठी वापर करा.
यासाठी आवळ्याच्या रसात कोरफड गर मिसळून केसांच्या मुळांना लावा. यामुळे केस मजबूत आणि नैसर्गिकरित्या चमकदार होतात.

५) केसांना मॉइश्चरायझ करा
– केसांना मॉइश्चरायझ केल्यामुळे केसांची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी मदत मिळते. यासाठी ऑलिव्ह ऑईल वा बदामाचे तेल वापरून केसांना दररोज वा आठवड्यातून ३ वेळा केसांना मसाज करा.

६) केसांना कंडिशनिंग करा
– हिवाळ्यात स्प्लिट एंड्स सामान्य असतात. त्यामुळे वेळोवेळी केस ट्रिम करा. केस कोरडे होऊ नये म्हणून फक्त सौम्य शॅम्पू वापरा आणि त्यानंतर कंडिशनर लावायला विसरू नका.

७) स्कार्फचा वापर
– केसांना निर्जीव बनवण्यात प्रदूषण, धुळीचे कण आणि माती हे कारणीभूत असतात. धूळ, माती आणि प्रदूषणामुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात. अशा परिस्थितीत बाहेर जाताना केसांना स्कार्फने झाकणे फायद्याचे ठरते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *