| |

ब्लॅकहेड्स काढताना त्वचेची काळजी कशी घ्याल?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपला चेहरा इतरांपेक्षा सुंदर, तजेलदार आणि डागरहित असावा असे कुणाला वाटत नाही सांगा? यामुळे प्रत्येकजण आपल्या त्वचेची आपापल्या परीने काळजी घेत असतात. पण त्वचेसंबंधित काही समस्या अश्या असतात ज्यांना तोड शोधणे म्हणजे जणू अग्निपरीक्षा. यामध्ये सर्वात जास्त मोठी समस्या मानली जाते ती ब्लॅकहेड्सची. आपल्या त्वचेवर अगदी सूक्ष्म पुळ्यांप्रमाणे येणारे हे ब्लॅकहेड्स चेहऱ्याचे सौंदर्य मालिन करतात. यामुळे आपला चेहरा खराब दिसतो. त्यामुळे ब्लॅकहेड्सच्या त्रासापासून सुटका मिळविण्यासाठी अनेकजण घरगुती उपाय करताना दिसतात. तसं तर नाकावर जास्त ब्लॅकहेड्स दिसून येतात. पण हे ब्लॅकहेड्स त्वचेवर कुठेही येतात. त्यामुळे हे ब्लॅकहेड्स काढून टाकणं गरजेच आहे. पण घरातच सोप्या पद्धतीने जर ब्लॅकहेड्स काढायचे असतील तर असे करताना आपल्या त्वचेची काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे. ब्लॅकहेड्स काढणे सोप्पे जरी असले तरी आपल्या काही चुकांमुळे आपली त्वचा दुखावते. त्यामुळे ब्लॅकहेड्स काढताना त्वचेची काळजी कशी घ्यायची आणि कोणत्या चुका टाळायच्या हे आपण आज जाणून घेणार आहोत. खालीलप्रमाणे:-

१) बोटांनी दाबून ब्लॅकहेड्स काढणे टाळा.
– ब्लॅकहेड्स वाढले कि काही महिला अगदी उतावीळ होऊन ते काढण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या त्वचेचे नुकसान करतात. अनेकदा या महिला त्वचेवर दबाव देऊन आतील ब्लॅकहेड्स काढण्याचा प्रयत्न करतात. मात्र असे केल्याने आपल्याच त्वचेचे नुकसान होते हे जाणून घ्या. सर्वात पहिले जे ब्लॅकहेड्स आपल्या त्वचेवर दिसत आहेत त्यांच्यावर लक्ष केंद्रित करा आणि त्यांना रिमूव्हरच्या मदतीने काढा. त्यानंतर त्वचेच्या आतील ब्लॅकहेड्स काढण्याचा प्रयत्न करा. मात्र असे करताना त्वचेवर कोणताही जोर देऊ नका. यामुळे त्वचेवर काळे डाग पडतात आणि त्वचा काळी दिसते.

२) जोरजोरात स्क्रब करणे टाळा.
– आपली त्वचा स्क्रब केल्यास डेड स्किन सेल्स बाहेर निघून जातात. इतकेच नव्हे तर यामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल काढण्यासदेखील मदत मिळते. ज्यामुळे ब्लॅकहेड्स होत नाहीत आणि ते काढणेही सोप्पे होते. पण काही महिला ब्लॅकहेड्स काढण्यासाठी त्वचेला जोरजोरात रेटून स्क्रब करतात. यामुळे ब्लॅकहेड्स निघत नाहीतच. पण यासोबत त्वचेमध्ये जळजळ, रॅश येणे आणि अन्य समस्या निर्माण होतात.

३) ब्लॅकहेड्स काढण्यासाठी नखांचा वापर टाळा.
– ब्लॅकहेड्स दिसायला खूपच खराब दिसतात. त्यामुळे तरुण मुली याबाबत अति सतर्क असतात. या नादात कधी ना कधी ही चूक प्रत्येकाकडून होते. अनेकदा असे होते कि आपण चेहरा धुतो तेव्हा ब्लॅकहेड्स दिसतात आणि ते आपल्याला आवडत नाही. त्यामुळे आपण नखांनी ब्लॅकहेड्स काढण्याचा प्रयत्न करतो. पण मैत्रिणींनो कृपया असे करू नका. कारण यामुळे ब्लॅकहेड्स निघत नाहीतच. शिवाय त्वचेची हानी होते. त्यामुळे ब्लॅकहेड्स काढण्यासाठी ब्लॅकहेड्स रिमूव्हरचा वापर करा नखांचा नव्हे.

४) ब्लॅकहेड्स काढण्याआधी रिमूव्हर न विसरता स्वच्छ करा.
– अनेक लहान चुका मोठ्या परिणामांना बळी पाडतात. यापैकी एक म्हणजे ब्लॅकहेड्स काढण्याआधी रिमूव्हर स्वच्छ न करणे. यामुळे त्वचेला अधिक हानी पोहचू शकते. त्यामुळे ब्लॅकहेड्स काढण्यापूर्वी रिमूव्हर व्यवस्थित स्वच्छ करून घ्या. याचे कारण म्हणजे, तुम्ही ब्लॅकहेड्स रिमूव्हर स्वच्छ व नीट वापरले नाही तर त्वचा डॅमेज होते आणि संक्रमणाचा त्रास वाढतो.