Tongue Health
|

जिभेच्या रंगावरून ओळखा आरोग्याची स्थिती; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। मित्रांनो उत्तम आरोग्यासाठी आपल्या प्रत्येक अवयवाची काळजी घेणे गरजेचे असते. कारण उत्तम आणि निरोगी आरोग्याची स्थिती हि आपल्या अंतर आणि बाह्य इंद्रियांच्या अवस्थेवर आधारित असते. आपले डोळे, नखे आणि जीभ आपल्या आरोग्याची स्थिती नेहमी काय आहे हे निश्चित सांगू शकतात. तुम्हाला माहित आहे का? पूर्वीच्या काळी वैद्य, हकीम हे रुग्णाच्या जिभेचे आणि डोळ्यांचे तसेच नाडी परीक्षण करून योग्य औषधे देत असत. आपल्याला माहित नसल्यामुळे अनेकदा आपण या इंद्रियांच्या बदलत्या स्थितीकडे दुर्लक्ष करतो. आता अनेकदा दात घासताना तुम्ही जिभेच्या रंगात झालेला फरक पाहिला असेल. पण काहीतरी तर्क लावून याकडे नक्कीच दुर्लक्ष केले असेल. हो ना? पण जिभेचा बदलला रंग वा स्थिती आपल्या आरोग्यातील बिघाड दर्शवतो हे लक्षात ठेवा. यामुळे आपल्या वेळीच अनेक प्रकारच्या रोगांचा अंदाज लावता येतो. आता अनेक वेळा औषधांमुळे किंवा एलर्जी फूडमुळेदेखील काही वेळासाठी जिभेचा रंग बदलू शकतो. पण जर तुमच्या जिभेचा रंग बराच काळ बदलत असेल तर हि आरोग्यविषयक समस्येची सूचना आहे हे लक्षात घ्या. चला तर जाणून घेऊ निरोगी जिभेचा रंग कसा असावा आणि जिभेच्‍या रंगात होणारा बदल कोणते आजार दर्शवितो ते खालीलप्रमाणे:-

निरोगी जिभेचा रंग कसा असावा?

मित्रांनो निरोगी जिभेचा रंग हा साधारणपाने हलका गुलाबी असतो. तसेच यावर हलका पांढरा लेप असणे ही देखील अगदी सामान्य स्थिती आहे आणि सामान्य जिभेचा पोत किंचित अस्पष्ट असतो. जर तुमची जीभही अशीच असेल तर तुम्हाला कोणतीही काळजी करण्याची अजिबात गरज नाही. पण खाली दिलेल्या रंगांपैकी कोणताही रंग तुमच्या जिभेशी संबंधित असेल तर मात्र तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे.

खाली सांगितलेले जिभेचे रंग देतात गंभीर आजाराचे संकेत

काळी जीभ – जिभेचा काळा रंग कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. याशिवाय अल्सर वा फंगल इन्फेक्शन झाल्यासही जिभेचा रंग काळा होतो. तसेच धुम्रपान करणाऱ्यांच्या जिभेचा रंगही काळा होतो. तर अनेकदा तोंडाच्या अस्वच्छतेमुळे जिभेवर बुरशीजन्य बॅक्टेरिया जमा झाल्यास जिभेचा रंग काळा होतो.

Black & White Tongue

पांढरी जीभ – जिभेचा पांढरा रंग तोंडाची अस्वच्छता आणि शरीरात डिहायड्रेशनची समस्या दर्शवितो. याशिवाय जिभेवरील ठार कॉटेज चीजच्या थरासारखे दिसत असेल तर धूम्रपानाच्या सवयीमुळे ‘ल्युकोप्लाकिया’ रोज झाल्याची शक्यता असू शकते. तसेच फ्लूमुळेही जिभेचा रंग पांढरा होतो.

पिवळी जीभ – जिभेचा पिवळा रंग शरीरात पौष्टिक घटकांची कमतरता असल्याचे लक्षण आहे. याशिवाय आपल्या पचनसंस्थेतील बिघाड, आतड्यांच्या समस्या, यकृत किंवा पोटाच्या समस्या यामुळेही जिभेचा रंग पिवळा होतो.

Yellow & Brown Tongue

तपकिरी जीभ – जिभेचा तपकिरी रंग फुफ्फुसाच्या अकार्यक्षमतेचे लक्षण आहे. याशिवाय जे लोक जास्त प्रमाणात कॅफिनचे सेवन करतात त्यांची जीभदेखील तपकिरी रंगाची असू शकते. तसेच धूम्रपान करणाऱ्या लोकांच्या जिभेवर तपकिरी रंगाचा थर कायमस्वरूपी जमा होत असतो.

लाल जीभ – जिभेचा लाल रंग शरीरात फॉलिक अॅसिड किंवा व्हिटॅमिन बी-12′ ची कमतरता असण्याचे लक्षण असू शकते. जिभेवर लाल रंगाचे डाग किंवा तीव्र रेषा दिसल्यास त्याला ‘जियोग्राफिक टंग’ असे म्हणतात.

Red & Blue Tongue

निळी जीभ – जिभेचा निळा वा जांभळा रंग म्हणजे हृदयाशी संबंधित समस्या असण्याचे गंभीर लक्षण होय. कारण जेव्हा हृदय योग्यरित्या रक्त पंप करू शकत नाही तेव्हा जिभेचा रंग बदलू लागतो. याशिवाय रक्तातील ऑक्सिजन कमी झाल्यासही जिभेचा रंग निळा किंवा जांभळा होतो.