|

त्वचा टॅन झाली असेल तर चिंता सोडा आणि हे उपाय करून पहा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपण आपल्या शारीरिक आरोग्याची जितक्या निष्ठेने काळजी घेतो तितकीच विशेष काळजी आपल्या त्वचेची घेणे अत्यंत आवश्यक असते. कारण, त्वचेकडे लक्ष न दिल्याने हळू हळू आपली त्वचा रखरखीत, निस्तेज आणि निर्जीव दिसू लागते. याशिवाय जर तुम्हाला सनबर्नची समस्या असेल तर ती आणखीच वाढण्याची शक्यता असते. याव्यतिरिक्त टॅनिंगमुळे, वृद्धत्वाची चिन्हे अकालीच दिसू लागतात.

टॅन फक्त चेहऱ्यावरच होत नाही तर टॅन आपल्या हातांवर आणि अगदी पायांवरही होतो. यामुळे त्वचा रूक्ष आणि खडबडीतसुद्धा होते. परिणामी आपले सौंदर्य हळूहळू निरस्त होऊ लागते. म्हणूनच टॅनची समस्या दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय करणे गरजेचे आहे. कारण यात कोणतेही केमिकल नसते ज्यामुळे त्वचेला हानी होण्याची चिंताच नाही. त्यात फार खर्चिक आणि वेळखाऊ नसणारे उपाय आपली टॅनची समस्या दूर होण्यास मदत करतील असतील तर अगदी सोने पे सुहागा। चला तर जाणून घेऊयात काही खास घरगुती उपाय.

१) लिंबाचा रस – लिंबाचा व्हिटॅमिन सी भरपूर असते. जे सूर्याकिरणांपासून त्वचेचे रक्षण करते. यासाठी एका भांड्यात कोमट पाणी घ्या आणि लिंबाचा रस मिसळा. सुमारे १५ मिनिटे आपले हात यामध्ये भिजवा. त्यानंतर हात मॉइश्चराइझ करा. लिंबू अम्लीय असल्यामुळे त्वचेचा जुन्यातला जुना टॅन निघून जातो.

२) खोबरेल तेल – हातावर असणारे टॅन काढण्यासाठी खोबरेल तेल फायदेशीर आहे. यासाठी रात्री झोपताना हाताला खोबरेल तेल लावून झोपावे.

३) दुधाची साय – हातावरचा कोरडेपणा दूर करण्यासाठी दुधाची साय हाताला लावावी. यामुळे हातावरील कोरडेपणा निघून जाण्यास मदत होते.

४) कोरफड जेल – कोरफड जेल कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. यासाठी गुलाब पाण्यात कोरफड जेल मिसळून त्याची पेस्ट संपूर्ण हाताला लावावी. यामुळे टॅन कमी होण्यास मदत होते.

५) बदाम पेस्ट – बदामामध्ये जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. जे त्वचेचा रंग उजळ करण्यासाठी मदत करतात. यासाठी रात्री ७-८ बदाम भिजवून सकाळी त्याची चांगली पेस्ट तयार करा आणि टॅन झालेल्या जागेवर लावा. यामुळे टॅन निघून जाण्यास मदत होते.

६) दही व हळदी पॅक – दहीमध्ये प्रोबायोटिक्स असतात. हे त्वचेचा रंग आणि आर्द्रता सुधारण्याचे काम करतात. यातील हळद त्वचेचा रंग सुधारते. तर दही त्वचेला चमक देते. यासाठी एका भांड्यात १ चमचा दही आणि १ चमचा हळद मिसळा आणि हातावर लावा. सुमारे २० मिनिटांनी हात कोमट पाण्याने धुवा.

७) चंदन व हळद पॅक – चंदन त्वचेचा रंग उजळण्यासाठी मदत करते. यासाठी २ चमचे चंदन पावडरमध्ये २ चमचे हळद मिसळून त्याची जाड पेस्ट बनवा. यानंतर त्यात थोडे गुलाब पाणी घाला आणि हा पॅक अर्धा तास टॅनिंगवर लावून ठेवा.

८) काकडीची पेस्ट – काकडीमध्ये जीवनसत्त्वे आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते. यामुळे त्वचा टवटवीत राहण्यास मदत मिळते. यासाठी काकडीचा रस आणि लिंबाचा रस मिसळून त्याची पेस्ट हातावर लावावी आणि सुमारे अर्ध्या तासानंतर पाण्याने धुवून टाका.