|

टॉवेल अस्वच्छ असेल तर त्वचेचे नुकसान होणारच ना; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपले आरोग्य जपायचे असेल तर आधी आपली स्वच्छता राखणे अत्यंत गरजेचे आहे. कारण निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता हि प्रमुख बाब आहे. तसेच आपल्या त्वचेच्या बाबतीतही असते. त्यामूळे त्वचेची काळजी घेताना आपल्या त्वचेचा प्रकार जाणून त्वचेसाठी कोणत्या व कश्याप्रकारच्या वस्तू, उत्पादने वापरावी हे पाहावे. कारण त्वचेची निगा राखताना कशाही प्रकारची उत्पादने वापरुन चालत नाहीत. म्हणूनच त्वचेशी संबंध येणाऱ्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. अगदी रोजच्या वापरातील टॉवेल हा देखील स्वच्छ असेल तर त्वचेची काळजी घेणे सोपे जाईल अन्यथा आपल्या त्वचेचे नुकसान होणार यात काहीच वाद नाही. कारण टॉवेलचा उपयोग आपण हात, पाय, तोंड पुसण्यासाठी सतत करत असतो आणि हाच टॉवेल आपण अंघोळीनंतर संपूर्ण अंग कोरडे करण्यासाठी वापरात असतो. अनेकदा या टॉवेलची स्वच्छता राखणे काही जणांना अगदी नकोसे होऊन जाते. परिणामी अशा लोकांनी त्वचेसंदर्भात होणाऱ्या त्रासांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. जाणून घ्या अस्वच्छ टॉवेलमूळे काय त्रास होतात आणि कशी घ्याल टॉवेलची काळजी खालीलप्रमाणे:-

० अस्वच्छ टॉवेलमुळे होणारे त्रास

१) कोणाचाही टॉवेल वापरणे आपल्या त्वचेसाठी मुळीच चांगले नाही हे समजून घ्या. कारण जर एखाद्याचा वापरलेला टॉवेल वापरला तर यामुळे त्वचेवर पुळ्या आणि पुटकुळ्या येऊ शकतात.

२) एखाद्याच्या त्वचेवर आधीच पिंपल्स असतील आणि अशा व्यक्तीचा टॉवेल आपण वापरलात तर यामुळे त्वचेवर रॅशेस येऊ शकतात.

३) प्रत्येकाचे शरीर आणि त्या शरीराला होणारे त्रास वेगवेगळे असतात. त्यामुळे जर तुम्ही टॉवेल सतत धूत नसाल आणि तसाच रोज वापरत असाल तरी देखील त्वचेला अॅलर्जीचा सामना करावा लागतो.

४) अस्वच्छ टॉवेलमुळे त्वचेला बुरशी येते. ज्यांना पिंपल्सची समस्या आहे अशा लोकांनी खराब टॉवेल वापरल्यास पिंपल्समूळे झालेल्या जखमा चिघळतात. शिवाय ती जखम भरली नाही तर त्याला बुरशी सदृश्य डाग येण्याची शक्यता असते.

५) खूप जण जेवल्यानंतर एकच टॉवेल वापरुन तोंड पुसतात. दरम्यान तोंड व्यवस्थित पुसलेले नसेल तर तो मसाला तोंडाला लागण्याची शक्यता असते. असा मसाला त्वचेच्या दृष्टिकोनातून मुळीच चांगला नाही. त्यामुळे त्याचा वापर करु नका.

० टॉवेलची काळजी घ्या

१) त्वचेला जसे जपता तसे टॉवेलला जपा.

२) तुम्ही वापरत असलेला टॉवेल कोणासोबतही शेअर करु नका.

३) एखादा स्वच्छ धुतलेला टॉवेल फार तर एक दिवस वापरा. त्यानंतर तो धुणे हे कधीही चांगले.

४) शक्यतो अंघोळीनंतर टॉवेल धुवून चांगला वाळवा. यामुळे त्यात अडकलेली घाण निघून जाते आणि पुन्हा वापरासाठी स्वच्छ टॉवेल मिळतो.

५) टॉवेल हा नेहमी कोरडा वापरा. ओला टॉवेल त्वचेसाठी वापरु नका.

६) बाहेर गेल्यानंतर आपल्यासोबत कायम एक टॉवेल ठेवा जो तुम्ही कधीही आणि कुठेही वापरु शकाल.

७) चेहऱ्यासाठी टर्किश टॉवेलची निवड करा. कारण ते त्वचेवर फारच कोमल असतात. ज्यांच्या स्पर्श त्वचेला हानी पोहचवत नाही.