| | | |

तुम्हीही त्रस्त आहात का घोरण्याच्या समस्येमुळे, ‘या’ उपायांनी नक्कीच लागेल आपणास शांत झोप

 

हॅलो आरोग्य ऑनलाईन । काय ‘घोरत’ पडला आहेस असे वाक्य आपल्या कानावर अनेक वेळा पडला असेल. यातील विनोदाचा भाग सोडला तर ज्यांच्या घरात एखादी व्यक्ती जर जोरजोरात घोरत असेल, तर त्यालाच विचारावे की त्याच्या झोपेची कशी ‘वाट’ लागत असते. आज आपण बघूयात की घोरणे म्हणजे नक्की काय आणि त्याची शास्त्रीय कारणे. तर घोरणे म्हणजे श्वासोच्छवास करताना येणारा आवाज. याचे प्रमाण स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त आहे. झोपल्यानंतर श्वासोच्छवासात काहीसा अडथळा निर्माण झाल्यावर एक विशिष्ट असा ‘बेसुर’ आवाज निर्माण होतो त्याला घोरणे असे म्हणतात. मात्र कधी कधी याचे स्वरूप अधिक तीव्र आजाराचे असू शकते.घोरणे ही अगदी सामान्य गोष्ट असली तरी त्याचा त्रास स्वत: घोरणाऱ्यालाच होतो असे नाही तर भोवतालच्या लोकांनाही होतो. वयाच्या तिशी नंतर घोरण्याची सवय हळू-हळू वाढू लागते.  आणि त्याचा त्रास घरातील इतरांना होतो त्यामुळे याकडे लक्ष देणे आणि त्यावर उपाय करणे गरजेचे आहे.

घोरणे कसे घडते :

जेव्हा तुम्हाला झोप लागते, तेव्हा आधी हलकी आणि मग गाढ झोप लागते आणि हळू हळू तोंडातील टाळू, घसा आणि जिभेचे स्नायू शिथिल होतात आणि घशातील श्वासन मार्गात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे तेथील ऊती (टिश्यू) थरथरून कंप पावू लागतात आणि तो मार्ग जितका अरुंद तितका कंप पावण्याचा आवाज जास्त मोठा.

त्यामुळेच, जर तुम्ही अतिस्थूल असाल किंवा तुमची पडजीभ जर जास्त लांब असेल तर हवेचा मार्ग आणखीनच अरुंद होतो. घोरण्यावर उपाय शोधण्यासाठी त्याचे कारण शोधायला हवे. एकदा घोरण्याचे कारण समजले की त्यावर उपाय करणे सोपे जाते.

 

घोरण्याची कारणे :

 • मानसिक ताण किंवा रक्ताभिसरणाची समस्या
 • सायनस किंवा नाकाशी संबंधित इतर त्रास
 • स्थूलता
 • धूम्रपान
 • झोपण्यापूर्वी केलेले मद्यपान
 • असंतुलित आहार
 • कुटुंबातील व्यक्तींचे घोरण्याचे प्रमाण
 • विशिष्ट औषधे
 • अॅलर्जी / वावडे असणे
 • मोठी जीभ किंवा टॉन्सिल्स किंवा नाकासंबंधी समस्या उदा. नाकातील फोड / माळीण, नाकाचा सरकलेला पडदा
 • वाढलेले वय ( स्नायू सैल पडणे, वजन वाढणे)

घोरण्याचे दुष्परिणाम:

घोरणे ही फक्त एक वाईट सवय आहे असे नाही. घोरण्याची कारणे समजून घेतल्यानंतर आता आपण हे बघू की त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्याचा भोवतालच्या लोकांवर कसा परिणाम होतो आणि त्याचे सामाजिक परिणाम काय होऊ शकतात?

 • झोपेचा अभाव आणि याचा परिणाम म्हणून हृदय विकाराचा झटका येऊ शकतो.
 • तुमच्या घोरण्याचा परिणाम होणाऱ्यांच्या आरोग्याच्या समस्या.
 • झोपेची गुंगी, वाढलेली चीडचीड, वैतागणे.
 • श्वासात अनियमितपणा किंवा श्वासमार्गात अडथळा निर्माण झाल्यामुळे धाप लागणे, गुदमरणे.
 • घसा बसणे, काही वेळा छातीत दुखणे.
 • दूरगामी परिणामांची वाढती शक्यता – अर्धांगवायूचा झटका, हृदय विकार.
 • मशीनवर काम करणारे, वाहन चालवणारे यांना धोका, कारखान्यातील अपघातांची शक्यता.
 • एकाग्रता न होणे.
 • कामवासना कमी होणे.

एका संशोधनात दिसून आले की सोबत झोपलेल्या व्यक्तीचा घोरण्याचा आवाज ऐकून रक्तदाब वाढू शकतो.

घोरणे शांत करा :

शस्त्रक्रिया किंवा घोरणे थांबवण्यासाठी विशिष्ट उपकरणांचा वापर असे उपचाराचे अनेक मार्ग आहेत. पण योगाचा मार्ग सुरक्षित आणि इतर दुष्परिणाम नसलेला म्हणून सुचविला जातो. योगाने घोरणे कमी होण्यास किंवा त्यावर नियंत्रण करण्यास मदत होऊ शकते आणि तुमच्या इतर उपचारांपेक्षा हे सुरक्षितपणे करू शकता. काही विशिष्ट योगासनांनी चोंदलेला श्वास्मार्ग मोकळा  होऊ शकतो.

करायला सोपे आणि रोज करायला मजा येणाऱ्या आसनांचा परिणाम बघून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. नियमित सरावाने चांगला फायदा होऊ शकतो. शरीरयष्टी सुधारेल आणि लवचिकता येईल.

घोरण्याला रोखण्यासाठी खालील आसने नियमितपणे करा.

१. प्राणायाम : यामुळे घशातील आणि चेहऱ्याच्या स्नायुंना बळकटी येईल. भ्रामरी व उज्जयी प्राणायाम

२. सिंह गर्जना

३. ॐकार साधना

झोपेच्या सवयींना पूरक अशी जीवनशैली स्विकारणे.

आणखी काही पूरक गोष्टी म्हणजे वजन कमी करणे, मद्यपान आणि धूम्रपान वर्ज्य करणे, चोंदलेळे नाक व घसा यासाठीची औषधे दीर्घकाळ न घेणे. कुशीवर झोपाण्यानेही फायदा होऊ शकतो. आयुर्वेदानुसार योग्य तो आहार घेण्यानेही फायदा होतो.

आरोग्याच्या विविध अंगांवर, स्वास्थ्यावर, आणि स्वत:च्या आणि इतरांच्या रोजच्या दिनचर्येवर याचा परिणाम होत असल्याने यावर योग्यवेळी उपाय करणे इष्ट. योग आणि ध्यान यांची सुयोग्य शिस्त आणि झोपेच्या बाबतीतले आरोग्य सांभाळून स्वत:ला आणि भोवतालच्या माणसांना घोरण्याच्या त्रासापासून दूर ठेवा.

योगसाधनेमुळे शरीर आणि मन यांचा विकास होतो आणि त्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. पण तरीही तो औषधास पर्याय नाही. प्रशिक्षित तज्ञ आणि प्रशिक्षित योग शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली योगासने शिकणे आणि  करणे महत्वाचे आहे. जर काही व्याधी असेल तर डॉक्टर आणि योग शिक्षक यांचा सल्ला घेतल्यानंतरच आसने करणे चांगले.

घोरणे — घरगुती उपाय

घोरणे ही अनेक जणांची समस्या आहे. अनेक कारणांमुळे घोरण्याचा आजार होऊ शकतो.

काही सावधगिरी बाळगुन आणि घरगुती इलाज करुन घोरण्यावर नियंत्रण आणता येऊ शकते. आज आपण पाहणार आहोत अशाच काही टिप्स ज्या घोरण्याची समस्या दूर करण्यात मदत करतील.

 1. पंखा किंवा एसी खाली झोपू नका. पंखा किंवा एसीची सरळ हवा लागल्याने श्वास नलिका आकसतात.
 2. भरपूर पाणी प्या, शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे नाक आणि गळ्यामध्ये कफ वाढतो. ज्यामुळे श्वास घेण्यात अडचण येते. दिवसभर ३-४ लिटर पाणी प्या.
 3. योग करा, घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी कपालभाति आणि प्राणायम फायदेशीर आहे.
 4. आहारावर नियंत्रण ठेवा, रात्रीच्या वेळी जास्त खाणे टाळा. झोपण्याआधी कफ वाढवणारे पदार्थ, जसे की दुध, ऑयली फूड, चॉकलेट किंवा गोड खाऊ नका.
 5. रक्त दाबावर नियंत्रण ठेवा, जर रक्त दाब सामान्यांपेक्षा जास्त असेल तर यामुळे घोरण्याची समस्या होऊ शकते. रक्त दाब नियंत्रणात असावा.
 6. वजन कमी करा, घोरणे टाळण्यासाठी वजनावर नियंत्रण असणे खूप आवश्यक आहे. जास्त वजन असल्याने घोरण्याची समस्या होते.
 7. लसूण मोहरीच्या तेलाने मालिश, २-३ पाकळ्या लसूण मोहरीच्या तेलात टाकून गरम करा आणि या तेलाने छातीची मालिश करा. फायदा होईल.
 8. मध प्या,रोज झोपण्याआधी एक चमचा मध प्यायल्याने गळ्याच्या रक्तवाहिन्यांना आराम मिळतो. घोरण्याची समस्या दूर होते.
 9. मिठाच्या पाण्याने गुळण्या करा, मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने, वाहिन्यांमधील सूज बरी होते आणि घोरणे बंद होते.
 10. थंड पदार्थ खाऊ नका, गार पाणी प्यायल्याने किंवा पदार्थ खाल्ल्याने घशाच्या वाहिन्या आकसतात. ज्यामुळे घोरण्याची समस्या होते. यापासून दूर रहा.
 11. डाव्या कुशीवर झोपा,झोपण्याची बाजू बदला. पाठ किंवा पोटावर झोपण्याऐवजी डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा.
 12. धुम्रपान सोडा,धुम्रपान, घोरण्याचे सर्वात मोठे कारण असू शकते.
 13. नाक स्वच्छ करून झोपा, सर्दी-पडसे किंवा धूळ-माती नाकात गेल्यानेसुद्धा श्वास घेण्यात अडचण येऊ शकते. झोपण्याआधी नाक स्वच्छ करा.
 14. गरम पाण्याची वाफ घ्या,रात्री झोपण्याआधी गरम पाण्यात बाम टाकून वाफ घेतल्याने श्वासनलिका मोकळ्या होतात आणि घोरणे टाळता येते.
 15. कोमट पाणी पिणे, रात्री झोपताना नियमित एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने श्वासाची नळी मोकळी होते आणि घोरण्यापासून आराम मिळतो.

हे उपाय करूनही जर घोरणे बंद होत नसेल तर मात्र काहीतरी गंभीर कारण असणार हे मात्र 100% त्यानंतर वेळ न दवडता डॉक्टरांना भेटून पुढील इलाज केलेला उत्तमच.