| |

श्रावणी उपवास करत असाल तर हे पदार्थ खा आणि पूरक ऊर्जा मिळवा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। येत्या आठवड्यापासून श्रावण मासारंभ होत आहे. या महिन्याला भारतीय संस्कृतीत विशेष असे महत्व आहे. त्यामुळे श्रावणात अनेक उपवास केले जातात. विशेष करून स्त्रिया श्रावणी सोमवार अतिशय कडक पाळतात. त्यामुळे अख्खा दिवस कामाचा रगाडा कितीही असला तरीही खाणे पिणे होत नाही. काही लोकांना या उपासांचे पुढे गंभीर त्रास जाणवतात. मुळात बराच वेळ पोट रिकामी ठेवणे अतिशय चुकीची गोष्ट आहे. यामुळे शरीराचे आरोग्य बिघडते. इतकेच नव्हे तर यामुळे मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. मात्र श्रद्धेचा भाग असल्यामुळे उपवास करायचा का नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे.

परंतु सांगायचे कारण हे कि, पावसाळ्यात इतर हंगामाच्या तुलनेत पाचक प्रणाली अतिशय कमकुवत होते. त्यामुळे अशा हंगामात उपवास करणार्‍यांनी खबरदारी घेणे निश्चितच गरजेचे आहे. यात विशेषतः खाण्यापिण्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण जेव्हा पाचन तंत्रावर परिणाम होतो तेव्हा प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ लागते. म्हणूनच जाणून घेऊयात की श्रावणात उपास करताना कोणत्या पदार्थांचे सेवन केल्यास आपल्या शरीराला पूरक ऊर्जाही मिळेल आणि आरोग्याची हानीदेखील होणार नाही. खालीलप्रमाणे:-

१) उपवासाच्या दिवशी सकाळी १ ग्लास दूध प्यावे. यासोबत एखादे केळे किंवा मूठभर बदाम खावेट. यामुळे सतत भूक लागणार नाही आणि पोट बराचवेळ भरल्यासारखे राहील. कारण दुधात कॅल्‍शियम, प्रो‍टीन, व्हिटॅमिन बी – २ हे घटक असतात. तर केळ्यामध्ये पोटॅशिअम, व्हिटॅमिन सी आणि फायबर हे घटक समाविष्ट असतात. ज्यामुळे बॅड कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.

२) सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उपवास असला तरीही रिकाम्या पोटी बराच वेळ राहू नये. यामुळे अॅसिडिटी, पोटदुखी, डोकेदुखी, शारीरिक थकवा, डोळ्यांवर ताण, चक्कर इ. त्रास उद्भवू शकतात. मात्र कोणतेही तेलकट उपवासाचे पदार्थ खाण्यापेक्षा मुठभर सुका मेवा खावा. यात आपल्या आवडीनुसार, खजूर, खारीक, मनुके, काजू, बदाम, पिस्ता, सुके अंजीर यांचा समावेश करावा.

३) जर उपवासाच्या दिवशी भूक सहन होत नसेल आणि वारंवार पोट रिकामी होत असेल तर शिंगाड्याच्या पिठाचे पदार्थ खाणे योग्य ठरेल. शिवाय त्यात आढळणारे फायबर आरोग्याला फायदाच होईल. तसेच पुन्हा पुन्हा भूक जाणवणार नाही. परिणामी अशक्तपणा, कमकुवतपणा जाणवणार नाही आणि पोटदेखील भरलेले राहील.

४) याशिवाय अधिक पाण्याचा समावेश असणाऱ्या फळांचे सेवन करावे. कारण या दरम्यान शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी अशी फळे मदत करतात. शरीरातील पाणी कमी झाल्याने कमकुवत झाल्यासारखे जाणवते. शिवाय घसाही कोरडा पडतो आणि चालताना धाप लागते. त्यामुळे पाणीदार फळांचे सेवन करणे फायद्याचे ठरते. यात मोसंबी, संत्र, कलिंगड, खरबूज, पेर, लिची, स्ट्रॉबेरी, द्राक्ष, जांभूळ, डाळिंब या फळांचा समावेश होतो. या व्यतिरिक्त तुम्ही साध्या किंवा शहाळ्याचे पाणीदेखील पिऊ शकता.

५) उपवासामुळे शरीरातील पाणी कमी होऊन शरीर डिहायड्रेट होऊ शकते. यासाठी १ वाटी दह्याचे सेवन करणे उत्तम असते. मात्र दही लो फॅट असेल याची काळजी घ्यावी. यात आपण फळं आणि ड्राय फुट्स देखील मिसळू शकता. यामुळे शरीर हायड्रेटेड राहते आणि शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते.