| | |

चपातीच्या तव्यावर ऑम्लेट बनवत असाल तर या किचन टिप्स जरूर वापरा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या दैनंदिन आहारात अंड्याचा समावेश असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण अंड्यांमध्ये भरपूर पोषण असते. जे आपल्या शरीराची योग्यरीत्या काळजी घेण्यास सक्षम आहे. सध्या हिवाळा सुरू झाला आहे. यामुळे आपल्या शरीराला आतून उष्णता देणारे पदार्थ या दिवसात खाणे अत्यंत आवश्यक आहे. अंड आपल्या शरीराला प्राथमिक ऊर्जाप्राप्तीसाठी सहाय्यक आहे. मग ते ऑम्लेट असो, उकडलेले अंडे वा अंडा मसाला नाहीतर अंड्याची करी. असे कितीतरी वेगवेगळे पदार्थ लोक आवडीने खातात. पण, यात एक समस्या आहे.

अंडे बनवताना किंवा बनवल्यानंतर एक उग्र वास येतो जो अतिशय असहाय्य असतो. बहुतेक लोकांना या वासामुळे उलटीचा त्रास संभवतो. विशेषत: ऑम्लेट बनवताना अंड्यांचा वास येतोच. त्यात आपण जर चपातीच्या तव्यावर ऑम्लेट बनवलात तर यामुळे साहजिकच तव्याला दुर्गंधी येते. याचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होऊ शकतो. यामुळे आम्ही तुमच्यासाठी काही किचन टिप्स घेऊन आलो आहोत. ज्यांच्या वापराने तुम्ही अंड्याचा वास अगदी सहज घालवू शकता आणि हा तवा चपातीसाठी परत वापरू शकता.

१) अंड्याचा पिवळा भाग जळायला लागल्यावर बहुतेकदा जास्त वास येतो. त्यामुळे ऑम्लेट नेहमी मंद आचेवर बनवा. यामुळे थोडा वेळ लागेल पण संपूर्ण घरात वास पसरणार नाही.

२) काही अंडी जास्त काळ ठेवली जातात. अश्या अंड्यांना जास्त आणि उग्र वास येतो. यामुळे नेहमी ताजी अंडी खाण्याचा प्रयत्न करा.

३) ऑम्लेटसाठी अंड फेटतांना त्यात थोडे दूध घाला आणि तव्याला ऑइल चांगले ग्रीस करून थोडा जाडसर थर ठेवा. यानंतर गॅस मंद ठेवा आणि पॅन जास्त गरम होणार नाही याची काळजी घ्या.

४) तव्यावर ऑम्लेट टाकल्यावर त्यावर झाकण ठेवून शिजवून घ्या. यामुळे त्याचा वास येणार नाही आणि ऑम्लेट व्यवस्थित टम्म फुगेल.

५) ज्या भांड्यांमध्ये अंड फेटालं त्यात लिंबू टाकून ठेवा.

६) शक्यतो अंडी बनवताच भांडी पाण्याने धुवून टाका आणि यानंतर लिंबू घालून ठेवा.

७) अंड्याची भांडी इतर भांड्यांपेक्षा वेगळी धुवा आणि त्यात वापरलेले स्क्रबर नेहमी वेगळे असतील याची खात्री करा. अन्यथा हा वास सर्व भांड्यांना लागेल.