| |

प्रत्येक दुखण्यावर पेनकिलर खात असाल तर आताच सावध व्हा; जाणून घ्या दुष्परिणाम

हॅलो आरोग्य ऑनलाईन। रोजची धावपळ आणि अस्ताव्यस्त जिवलशैली यांमुळे आपल्या आरोग्याची पुरती वाट लागून होते. एकंदरच काय तर सतत अशक्तपणा जाणवणे, सतत काही ना काही दुखणे खुपणे या समस्या जगूनच देत नाहीत. अश्यावेळी आपल्याला थोडासा जरी थकवा आला तरी आपण अस्वस्थ होतो. परिणामी अंगदुखी असो नाहीतर डोकेदुखी हा थकवा आणि दुखणे दूर करण्यासाठी आपण विविध प्रकारच्या पेनकिलर गोळ्या खाण्याचा मार्ग स्वीकारतो. यामुळे आपल्याला आराम मिळतो खरं. पण मित्रांनो तुमची हि आरामदायी सवय चूक ठरायला फार वेळ लागत नाही. कारण डोकेदुखी, ताप, अंगदुखी, मळमळ, उलटी यासारख्या लहान मोठ्या आजारांवर आपण डॉक्टरांचा सल्ला न घेता औषध गोळ्या घेतो आणि याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. म्हणूनच आज आपण हे दुष्परिणाम जाणून घेणार आहोत. म्हणजे पुढच्यावेळी पेन किलर खाताना तुम्ही किमान दोनवेळा विचार कराल.

१) कोरडे तोंड – पेनकिलर वारंवार घेतल्याने तोंडाला कोरड पडते. कधीकधी यामुळे उष्णतेचा त्रास देखील संभवतो. जर तुमचे तोंड कोरडे झाले असल्याचे जाणवले तर अशा परिस्थितीत आपण च्युइंगम खा वा डॉक्टरांशी संपर्क साधा.

२) बद्धकोष्ठतेचा त्रास – बहुतेक पेनकिलर जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठता डोकं वर काढते. अशा परिस्थितीत, आपले डॉक्टर आपल्याला हाय पावरच्या औषधांचे सेवन करण्यास सांगतात. मात्र त्यासोबत अँटासिड किंवा लॅक्सेटिव हि औषधे देखील देतात. ज्यामुळे कफ आणि अपचन होत नाही.

३) अल्सरचा धोका – अचानक ताप आल्यास अनेकदा आपण डॉक्टरांचा सल्ला न घेता पॅरासिटामॉल या गोळीचे सेवन करतो. परंतु, यामुळे अपचन किंवा अल्सर या आजारांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय परिस्थिती आणखी बिकट झाली तर रक्ताच्या उलट्याही होऊ शकतात.

४) उच्च रक्तदाबाची समस्या – आयबुप्रोफेन आणि पॅरासिटामॉल याचं मिश्रण करुन कॉम्बिफ्लेम ही गोळी बनवली जाते. बहुतेक लोक या गोळीचे सेवन करतात. परंतु या गोळीचे जास्त वा वारंवार सेवन केल्याने फुफ्फुसाची समस्या उद्भवू शकते.परिणामी दम्याचा त्रास होऊ शकतो. याव्यतिरिक्त हाय बीपी, प्रोस्टेट आणि थायरॉईड या समस्या देखील होऊ शकतात.

५) दृष्टी कमी होण्याचा धोका – कफ झाल्यावर अँटी हिस्टामाइन्स या औषधाचा वापर जास्त होतो. या औषधामुळे शिंका येणे, खोकला यांसारखे आजार बरे होतात. मात्र याचे जास्त सेवन केल्यास शरीरात सुस्तपणा वाढतो. या औषधात अनेक अँटी हिस्टामाइन्स असतात ज्यामुळे दृष्टी कमकुवत होण्याचा धोका देखील संभवतो. म्हणून सर्दी – कफ झाल्यास गरम सूप, स्टीम, व्हिटॅमिन सी घ्या. फार त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.