| |

प्लेन ओट्स खाऊन कंटाळलात तर मग या हेल्दी रेसिपीज जरूर ट्राय करा; जाणून घ्या साहित्य आणि कृती

हॅलो आरोग्य ऑनलाईन। ओट्स हा एक असा पदार्थ आहे जो खायला चविष्ट आणि आरोग्याच्या दृष्टीने अतिशय हेल्दी मानला जातो. यामुळे अनेकजण आपल्या दैनंदिन नाश्त्यात वाफाळत्या दुधातला चवदार बेरी नट्स आणि फळांनी सजलेला ओट्सचा नाश्ता खाणे पसंत करतात. ओट्स हे सर्वोत्तम सप्लिमेंट आहे. आरोग्य आणि चव देणारे हे एकमेव उत्तम सुपरफूड आहे. ओट्स खाल्ल्यामुळे हृदय, किडनी, पोट आणि अगदी मेंदूच्या कार्यात सुधारणा होते. शिवाय ओट्समुळे ताण आणि तणाव देखील नियंत्रित राहतो. पण पोटभर ब्रेकफास्टसाठी, संध्याकाळच्या हलक्‍या नाश्त्यासाठी आणि रात्रीच्या अगदी हलक्या मात्र पौष्टिक डिनरसाठी ओट्स कितीही उत्तम असले तरीही रोज रोज तेच तेच आणि तसेच प्लेन ओट्स खाणं जिभेला नाराज करतं. यामुळे आम्ही तुमच्यासाठी ओट्सच्या अशा रेसिपी घेऊन आलो आहोत ज्या खाल तर खातच रहालं. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) ओट्सचा पौष्टिक उपमा

० साहित्य – २ कप ओट्स, १ वाटी बारीक चिरलेला कांदा, १ वाटी हिरवे वाटाणे आणि गाजर, १ बारीक चिरलेली भोपळी मिरची, १/२ कप उडीद डाळ, १ चमचा हिरव्या मिरचीचे तुकडे, २ चमचे किसलेले खोबरे, १ कढीपत्ताची काडी, १ चमचा मोहरी, १ चमचा हळद, चवीनुसार मीठ, कोथिंबीर सजवण्यासाठी.

० कृती – एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्या. आता त्यात ओट्स, हळद, थोडं मीठ आणि हिरव्या मिरच्या घाला. ओट्स हलके तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या. आता यात थोडं पाणी घालून झाकून ठेवा. पुढे ५ मिनिटे याला शिजू द्या. तोपर्यंत दुसऱ्या पॅनमध्ये थोडं तेल, मोहरी, उडीद डाळ घालून सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. आता यात थोडा कढीपत्ता, हळद, मीठ आणि कांदा घालून परतून घ्या. यानंतर चिरलेलं गाजर, वाटाणे आणि सर्व भाज्या मिक्स करून चांगलं शिजू द्या. सगळ्या भाज्या शिजल्या की मग शेवटी भोपळी मिरची घाला. यानंतर ओट्स चांगले शिजलेले दिसतील तेव्हा त्यात या भाज्या घाला. झाकण ठेवून मस्त एक वाफ येऊ द्या. झाला तुमचा ओट्सचा चविष्ट उपमा तयार. यावर शुभ्र किसलेले खोबरे आणि कोथिंबीर घालून उपमा सर्व्ह करा.

२) ओट्सची हलकी फुलकी इडली

० साहित्य – १ वाटी भाजलेले ओट्स, चवीनुसार मीठ, २ चमचे दही, १ वाटी किसलेले गाजर, १ चमचा मोहरी, ५-१० कढीपत्ताची पाने, १ चमचा चणा डाळ, १ चमचा उडीद डाळ, १ चमचा बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि थोडंसं तेल

० कृती – सुरुवातीला ओट्स कढईत भाजून नंतर त्याची बारीक पावडर तयार करा. आता किसलेलं गाजर ओट्सच्या पावडरमध्ये घालून मीठ आणि दही व्यवस्थित यात मिसळा. एका फ्राईंग पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून त्यात चणा डाळ, उडदाची डाळ, कढीपत्ता, मोहरी आणि हिरव्या मिरच्या टाका. यानंतर हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि मग ओट्स इडलीच्या पिठात घाला. हे मिश्रण चांगले फेटून घ्या आणि ते एकसारखे होऊ द्या. इडली पॅनला ग्रीस करा आणि ओट्सचं इडली पीठ त्यात घाला. नंतर १५ मिनिटे चांगले वाफवून घ्या. आता मस्त गरम गरम हलक्या फुलक्या ओट्स इडल्या नारळाची चटणी आणि सांबारसह सर्व्ह करा.

३) ओट्सची चविष्ट खीर

० साहित्य – १ कप ओट्स, १/२ लिटर दूध, आवडीनुसार साखर, ड्राय फ्रूट्स, फळं.

० कृती – सर्वप्रथम ओट्स पॅनमध्ये चांगले भाजून घ्या. पुढे दुसऱ्या पॅनमध्ये दूध गरम करून त्यात साखर घालून ढवळा. दूध कोमट झालं की त्यात ओट्स मिक्स करून ढवळत राहा. संपूर्ण मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात ड्रायफ्रूट्स काजू, बदाम, पिस्ता, खजूर घाला. ओट्सची ही खीर आणखी चवदार करण्यासाठी केळी, आंबा, चिकू वा तुमच्या आवडीची फळं बारीक चिरून घाला आणि मस्त चविष्ट ओट्सची खीर मिचक्या मारत खा.

४) ओटमील कुकीज

० साहित्य – ३ कप ओट्सची जाडसर पावडर, १ चमचा दालचिनी पावडर, २ अंडी, २ कप बटर, १ कप ब्राऊन शुगर, १ कप पांढरी साखर, १ चमचा बेकिंग सोडा, मीठ चवीनुसार, १/२ कप मैदा, १ कप बारीक पावडर केलेले ओट्स आणि व्हॅनिला अर्क.

० कृती – बटर, पांढरी साखर, ब्राऊन शुगर, दालचिनी पावडर, व्हॅनिला अर्क एका भांड्यात घेऊन व्यवस्थित एकाच बाजूने फेटा. पुढे यात एक एक अंडे हळूहळू फोडून फेटून घ्या. यानंतर मैदा, मीठ, बेकिंग सोडा आणि नंतर ओट्स असे सर्व जिन्नस एकत्र करून घ्या. यात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या. प्रत्येकी २ इंच अंतर राखून कुकीज बेकिंग ट्रेवर ठेवा. हा ट्रे प्रीहीटेड मायक्रोवेव्हमध्ये ठेवा आणि १७० डिग्री सेंटीग्रेडवर १० मिनिटे बेक करा. झाल्या तुमच्या खुसखुशीत ओटमील कुकीज तयार. हि कुकीज अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत सारेजण आवडीने खातात.

५) ओट्स केक

० साहित्य – १ कप ओट्स, १ १/२ कप गरम पाणी, १ कप ब्राऊन शुगर, १ कप पांढरी साखर, २ अंडी, १/२ कप लोणी, बेकिंग सोडा १ चमचा, ओट्स पीठ १कप, मैदा १/२ कप.

० कृती – यासाठी ओव्हन १७० डिग्री सेल्सियस प्रीहिट करा. यानंतर बेकिंग ट्रेला ग्रीस करून घ्या. पुढे एका बाऊलमध्ये उकळते पाणी आणि ओट्स मिसळून घ्या. ओट्स यात पूर्ण भिजवा. नंतर लोणी, ब्राऊनशुगर आणि पांढरी साखर एकत्र करून यात एकावेळी एकच अंडं घाला. नंतर दुसऱ्या भांड्यात बेकिंग सोडा, चिमूटभर मीठ आणि मैदा एकत्र करून चांगले मिसळा. या मिश्रणाचा अर्धा भाग लोण्याच्या मिश्रणात घालून भिजवलेल्या ओट्समध्ये घालायचा गुठळ्या होऊ नयेत याची काळजी घेत ढवळत रहा. हे मिश्रण चांगलं मिक्स झालं की उरलेले पीठ घालून चांगले तेही व्यवस्थित मिक्स करून घ्या. यानंतर ग्रीस करून ठेवलेल्या ट्रेमध्ये हे पिठ घालून ३०-३५ मिनिटे बेक करून घ्या. ओटमीलचा खुसखुशीत केक एकदम तयार.