| | |

नाश्त्यामध्ये अक्की रोटी खाल्ली कि, सारखी भूक लागणार नाही; जाणून घ्या साहित्य आणि कृती

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपण रात्री झोपल्यानंतर सकाळी जेव्हा केव्हा उठतो आपल्या पोटातून एक विशिष्ट प्रकारच्या ध्वनी निर्माण होत असतात. या ध्वनी लहरी आपल्याला भूक लागल्याचे संकेत देतात. याचे कारण असे कि रात्री आपण झोपल्यानंतर आपले पोट किमान ८ तास रिकामी असते. यामुळे साहजिकच सकाळी भूक लागते. पण अश्यावेळी जर नाश्ता टाळला तर अख्खा दिवस अस्वस्थ आणि निरुत्साही जातो. शिवाय दिवसभर भूक लागत राहते. त्यामुळे सकाळचा नाश्ता करणे कधीही आरोग्याच्या दृष्टीने गरजेचे आहे हे समजून घ्या. पण सकाळी नाश्ता म्हणून असं काय खावं ज्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जादेखील मिळेल आणि आपले पोट बराच वेळ भरलेले असल्यामुळे सतत भूक लागणार नाही असा रोजच ठरलेला प्रश्न असतो. या प्रश्नच उत्तर आज आम्ही तुम्हाला या लेखातून देणार आहोत.

भारतीय पदार्थांमध्ये कितीतरी विविध प्रकारच्या रोटीचे प्रकार आपण जाणतो. त्यामुळे वेगवेगळ्या धान्यांच्या रोटी आपल्यासाठी नव्या नाही. पण त्यासोबत वेगळी भाजी, चटणी वा लोणचे असे पदार्थ आणखी थोडी लज्जत वाढविण्यासाठी लागतात. पण तुम्हाला माहीत आहे का? घाईच्या वेळी आपण एक अशी रोटी बनवू शकतो ज्याच्याबरोबर तुम्हाला इतर कोणत्याही चवीच्या पदार्थांची गरज भासत नाही. या पदार्थाचे नाव आहे अक्की रोटी. हि रोटी तुम्ही अगदी नाश्ता, दुपारचे जेवण वा रात्रीच्या जेवणातसुद्धा खाऊ शकता. पण सकाळच्या नाश्त्यात हि रोटी खाल्ली का बराच वेळ पोट भरलेले राहते आणि परिणामी इतर कोणतेही अन्न पदार्थ खाण्याची गरज भासत नाही. चला तर जाणून घेऊयात या पौष्टिक अक्की रोटीसाठी लागणारे साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे:-

० साहित्य
१) तांदळाचे पिठ – १ कप
२) बारीक चिरलेला कांदा – १
३) खवलेले ओले खोबरे – ३ चमचे
४) चिरलेले गाजर – १ लहान
५) बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या – २
६) बारीक चिरलेली कोथिंबीर – २ चमचे
७) जिरे – १/२ चमचा
८) मीठ – चवीनुसार
९) बारीक चिरलेले आले – १/२ चमचा
१०) पाणी – आवश्यकतेनुसार
११) तेल – आवश्यकतेनुसार
१२) भिजवलेली चणाडाळ (पर्यायी) – १ चमचा

० कृती – अक्की रोटी बनविण्यासाठी त्याचे पीठ तयार करून घ्या. यासाठी तांदळाचे पीठ, खोबरे, जिरे, हिरवी मिरची, कोथिंबीर, कांदा, मीठ एका भांड्यात मिक्स करा. (जर रोटी पातळ हवी असेल तर, भाज्या बारीक चिरून घ्या) तुम्हाला आवडतील त्या भाज्या यात घालू शकता आणि भिजवलेली चणाडाळही आवड असेल तर मिसळून घ्या. परंतु यासाठी चणाडाळ किमान अर्धा तास आधी भिजवा आणि मिक्सरमधून वाटून घ्या.
आता हे सर्व मिश्रण पाण्याने व्यवस्थित भिजवून घ्या. अगदी थालिपीठाच्या अंदाजाप्रमाणे हे पीठ भिजवा. पुढे अगदी पातळही नाही आणि अगदी घट्टही नाही असे पीठ तयार करा. यानंतर पोळपाटावर प्लास्टिक कागद घ्या आणि त्यावर याचे गोळे थालिपिठाप्रमाणे थापा. लक्षात ठेवा अक्की रोटी लाटली जात नाही तर थापूनच करावी लागते. त्यानंतर तव्यावर तेल सोडून ही रोटी मस्त खरपूस भाजून घ्या. तेलाऐवजी तुम्ही बटरचाही वापर करू शकता. काळजीपूर्वक ही रोटी दोन्ही बाजूने शेकून झाल्यावर गरमागरम खायला द्या. ही रोटी तुम्ही नुसती खाऊ शकता. पण नुसती आवडत नसेल तर खोबऱ्याची चटणी, बटाट्याची भाजी वा टोमॅटो सॉस सोबत खाता येईल.

० अक्की रोटी खाण्याचे फायदे –
१) अक्की रोटीमध्ये समाविष्ट असणारे पदार्थ पौष्टिक असतात. त्यामुळे आरोग्यास हानी होत नाही.
२) या रोटीत विविध भाज्या असल्यामुळे त्याचे पोषणमूल्य वाढते. शिवाय चवीच्या बहाण्याने विविध भाज्या खाल्ल्या जातात. त्यामुळे लहान मुलांसाठी हा पर्याय अगदीच उत्तम.
३) अक्की रोटी नाश्त्यामध्ये खाल्ल्याने शरीराला सकाळी गरज असलेली पोषण मूल्ये आणि ऊर्जा प्राप्त होते.
४) अक्की रोटीचे सेवन केल्यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते. यामुळे बाहेरील अन्न पदार्थ खाण्याची इच्छा असली तरीही पोट यासाठी परवानगी देत नाही.

टीप – अक्की रोटीत प्रमुख पदार्थ तांदळाचे पीठ असल्यामुळे ही रोटी मस्त भाजून घेतल्यावर त्याचे काठ कुरकुरीत होतात. जर तुम्हाला अधिक कुरकुरीत रोटी हवी असेल तर मंद गॅसवर भाजा आणि तेलाऐवजी बटरचा वापर करा. यासाठी घरातील तुपाचाही वापर करता येईल. तेलापेक्षा बटर अथवा तूप वापरल्यास त्याचा अधिक चांगला स्वाद मिळतो.