| | |

झोपण्यापूर्वी या सवयी असतील तर रोगप्रतिकार शक्ती होईल कमकुवत; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सुदृढ आणि निरोगी आयुष्यासाठी आपल्या शरीराची रोग प्रतिकारशक्ती मजबूत असणे गरजेचे असते. कारण रोग प्रतिकारक शक्ती कमी असेल तर कोणताही विषाणू अगदी सहज आपल्या शरीरात समावेश करून आरोग्याच्या तक्रारी वाढवू शकतो. त्यामुळे हा विषय अत्यंत नाजूक आहे. आपल्या दैनंदिन जीवनात अश्या काही सवयी असतात ज्या आपल्याला खूप महागात पडतात. विशेष करून झोपण्याआधी काही गोष्टींच्या सवयी थेट आपल्या रोगप्रतिकार क्षमतेवर हल्ला करीत असतात. या सवयीनवर वेळीच रोख लावणे गरजेचे आहे. म्हणूनच आज आम्ही या संदर्भातील माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. चला तर जाणून घेऊयात झोपण्याआधीच्या कोणत्या सवयी रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत करतात, खालीलप्रमाणे:-

१) दारू पिणे आणि धूम्रपान करणे.
– कोणत्याही प्रकारची अमली नशा आपल्या शरीराला आतून पोखरत कमकुवत करत जाते. परिणामी आपले शरीर कमकुवत, अशक्त आणि प्रतिकारशक्तीहीन होऊ लागते. त्यामुळे दारू आणि धूम्रपान यापासून लांब राहणे कधीही उत्तम. शिवाय रात्री झोपण्याआधी ध्रुम्रपान करणे फुफ्फुसांवर गंभीर परिणाम करते. तर दारूमुळे आतडे आणि किडनीवर गंभीर परिणाम होतो.

२) चहा किंवा कॉफीचे सेवन करणे.
– अनेक लोकांना झोपण्याआधी चहा किंवा मग कॉफी पिण्याची सवय असते. या सवयीचा वाईट प्रभाव थेट रोग प्रतिकारक शक्तीवर होत असतो. कारण या पेयांमध्ये समाविष्ट असणारे कॅफिन झोपण्यापूर्वी ग्रहण करणे अपायकारक आहे. यामुळे झोप उडू शकते आणि निद्रानाशाचा त्रास संभवतो. परिणामी कमी झोपेमुळे प्रतिकारशक्ती क्षीण होते.

३) प्रोसेस फूड खाणे.
– प्रोसेस फूड अर्थात प्रक्रिया केलेले खाद्य रात्री झोपण्याआधी खाणे शरीरावर वाईट परिणाम करतात. यामध्ये साखर, मीठ, रिफाइन्ड कार्ब्स आणि प्रिजर्वेटिव्स असतात, परिणामी रोग प्रतिकारकीशक्ती कमकुवत होते.

४) रिफाइन्ड फूड खाणे.
– रात्री झोपण्याआधी रिफाइन्ड फूड्चे सेवन केल्याने रोग प्रतिकारकशक्ती कमकुवत होते. यात प्रामुख्याने मैदा, पांढरा ब्रेड, साखर हे पदार्थ समाविष्ट असतात. ज्या गोष्टी शरीराला अपायकारक असतात.

५) फास्ट फूड खाणे.
– अनेक लोक फास्ट फूड अति प्रमाणात आवडीने खातात. यात पिज्जा, बर्गर, फ्रेंच फ्राईज, फ्रँकी यांचा समावेश असतो. हे पदार्थ अति खाणे शरीरासाठी हानिकारक असतात. तसेच रात्री झोपण्याआधी खाल्ल्याने पचन प्रक्रियेत बिघाड होऊ शकतो. इतकेच नव्हे तर याचा थेट परिणाम प्रतिकारशक्तीवर होतो. यात जीवनसत्त्वे आणि प्रथिने यांचे प्रमाण अत्यल्प असते. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती क्षीण होऊ लागते.